तरुण भारत

गुहागरातही कोटय़वधीची व्हेलची उलटी जप्त

कोकणात व्हेलच्या उलटी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ चिपळूण

Advertisements

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरमधील शिंदे-आंबेरी येथे गुरूवारी दुपारी करण्यात आलेल्या कारवाईनंतर पोलीस न वनविभागाच्या पथकाने रात्री गुहागर तालुक्यातील वेळंब येथेही 2 कोटीहून अधिक किंमतीची उलटी जप्त केली. दिवसभरात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण सव्वाआठ कोटीची उलटी जप्त करतानाच एकूण 7जणांना बेडय़ा ठोकल्या आहेत. रक्तचंदनानंतर कोकणातील व्हेल माशाच्या उलटीच्या मोठय़ा तस्करीचा पर्दाफाश यानिमित्ताने झाला आहे.

  व्हेल माशाच्या उलटीची तस्करीची खबर अज्ञात व्यक्तीने दिल्यानंतर गुरूवारी दुपारी वनविभाग व पोलिसांच्या पथकाने लावलेल्या सापळय़ात महामार्गावर संगमेश्वरजवळील शिंदे-आंबेरी येथे दुपारी 2 वा. इर्टिगा कारमध्ये 6 किलो 200 ग्रॅम वजनाची उलटी सापडली. त्याची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सव्वासहा कोटी रूपये किंमत होत आहे. कारवाईत रत्नागिरीतील प्रसाद प्रवीण मयेकर. काखरतळे-महाड येथील नरेंद्र वसंत खाडे, माणगांव येथील सत्यभामा राजू पवार व गुहागरमधील असगोली येथील अजय राजेंद्र काणेकर या चौघांना कारसह ताब्यात घेतले.

 दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अन्य एका ठिकाणी व्हेल माशाच्या उलटीबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे दुसरे पथक गुहागरकडे रवाना झाले. रात्री 9 च्या सुमारास वेळंब येथे वनविभागास स्थानिक पोलिसानी लावलेल्या सापळय़ात आणखी तिघेजण अडकले. तौफीक याकुब अलवारे (38, परचुरी, गुहागर), अब्दूल मजिद इस्माईल तांबे (56, मिरजोळी, चिपळूण), चंद्रकांत शंकर कातळकर (51 वेळंब, गुहागर) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 किलो 150 ग्रॅम वजनाची व्हेलची उलटी आणि गुन्हय़ात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. या तिघांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

  उलटी तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7जणांना शुक्रवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सरकारी वकील आर. डी. जाधव यांनी वनविभागाची बाजू मांडली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, चिपळूण विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग आणि स्थानिक पोलीस पथकाने केली.

 कोकणातील तस्करीचे मोठे रॅकेट उघड

सुगंधी द्रव्यासाठी मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने जागतिक बाजारपेठेमध्ये व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत मिळत असल्याने तिची तस्करी मोठय़ा प्रमाणात केली जाते. कोकणात रत्नागिरी जिल्हय़ात प्रथमच अशा प्रकारची कारवाई झाली. दोन ठिकाणी लावलेल्या सापळय़ात 7जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून कारसह सव्वाआठ कोटीची उलटी जप्त करण्यात आली आहे. यातील सहभागी आरोपी हे रत्नागिरीसह रायगड जिल्हय़ातील असल्याने साहजिकच या तस्करीत मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच करण्यात आलेल्या कारवाईतून तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

Related Stories

रत्नागिरी : या तालुक्यातील काेराेना रुग्णांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयातच होणार उपचार – आ. योगेश कदम

Abhijeet Shinde

चिपळूणकरांच्या डोक्यावर वाढीव कराचा बोजा

Patil_p

सिंधुदुर्गात नव्या शैक्षणिक विकासाची नांदी

NIKHIL_N

एसटी फेऱ्या बंदमुळे शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटली

Abhijeet Shinde

विद्युतीकरणानंतर रत्नागिरीत हवी लोकोशेड, डिझेल टँक!

Patil_p

रायपाटण ग्रामीण रूग्णालयाची वीज कापली!

Patil_p
error: Content is protected !!