तरुण भारत

सुपर कूल धोनी, सुपर अग्रेसिव्ह विराट!

का नेमावा लागला महेंद्रसिंग धोनी नामक मेंटर!

यंदाच्या आयसीसी टी-20 वेश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटला प्रथमच मेंटर अर्थात मार्गदर्शक मिळाला आहे आणि तो ही दस्तुरखुद्द धोनीच्या रुपात! शांत, संयमी, चेहऱयावरील रेषही हलू न देता दडपण हाताळणारा धोनी आणि प्रत्येक बाबीवर रिऍक्ट होणे, हा आपला अधिकारच आहे, असे मानणारा सुपर अग्रेसिव्ह विराट, यांचे नवे समीकरण भारताला सोनेरी यश मिळवून देऊन जाईल, अशी तमाम क्रिकेटरसिकांना अपेक्षा आहे. कर्णधार नात्याने विराट व मेंटर-मार्गदर्शक या नात्याने धोनी यात जेतेपद मिळवून देत यशस्वी ठरले तर हे श्रेय दोघांचेही असेल. पण, मुळातच असा मेंटर नियुक्त करण्याची का गरज पडली, हा खरा प्रश्न! त्याचीच ही कारणमीमांसा!

Advertisements

तसे पाहता, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली ही दोन्ही भारतीय क्रिकेटमधील दोन विरोधी टोके. एकीकडे, कितीही दडपण असले, कितीही प्रतिकूल स्थिती असली तरी धोनी मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ताही लागू देत नाही तर दुसरीकडे, विराटचे मन कदाचित त्याच्या चेहऱयावरुनच वाचता येते!

पण, क्रिकेटच्या मैदानात फक्त खेळाडूचे मनच वाचून अजिबात चालत नाही. विराट कोहलीसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूसाठी तर अजिबातच चालत नाही. त्याच्या चेहऱयावर त्याची जिद्द दिसून येते आणि जोवर विराट क्रीझवर आहे, तोवर आपल्याला झगडावे लागेल, हे मैदानावरील प्रतिस्पर्ध्यांनाही उत्तम ज्ञात असते.

विराटने आतापर्यंतच्या प्रदीर्घ वाटचालीत आपला स्टॅमिना, तंत्रकौशल्ये आणि उर्जा यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने जिममध्ये कित्येक तास घाम गाळत स्टॅमिना वाढवला आहे आणि मैदानात कित्येक तास कठोर परिश्रम करत एकेक फटके अनेक हजार वेळा अक्षरशः घोटवले आहेत. महान फलंदाज सहजासहजी घडत नसतात. ते घडण्यामागे त्यांनी त्यासाठी प्रचंड कष्ट उपसलेले असतात आणि तेव्हा कुठे असा खेळाडू घडत असतो.

जी बाब विराटची, तितकीच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सर बाब धोनीची! हेलिकॉप्टर शॉट, हा आवडता फटका खेळणे म्हणजे डाव्या हातचा मळ असलेल्या धोनीचा क्रिकेटिंग ब्रेन देखील तितकाच शार्प! विराट-धोनी यांच्या विचार करण्यातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे धोनी विचार करतो, कोणाला खेळवायचे आणि विराट विचार करतो, कोणाला वगळायचे!

अगदी अलीकडे यजुवेंद्र चहलला वर्ल्डकप संघातून वगळले गेले, हे त्याचे अतिशय ज्वलंत आणि सर्वोत्तम उदाहरण!

अन् येथेच खरी मेख लपली आहे की, धोनीला मेंटर म्हणून नियुक्त करण्याची गरज का पडली!

भारतीय क्रिकेट अक्षरशः कोळून पिणारे रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक, आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज विराट कोहली संघाचा कर्णधार, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक, उपकर्णधार रोहित शर्मा, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर इतका सारा कडेकोट ताफा असताना देखील मागील 3 आयसीसी स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाही.

इतके सारे तज्ञ असताना जे झाले नाही, ते करुन दाखवायचे, या जिद्दीपोटीच धोनीची नियुक्ती झाली आणि ज्या पदावर धोनीला बसवले गेले, त्या पदाचे बारसे झाले, ते म्हणजे संघाचा नूतन मेंटर!

मेंटर अर्थात मार्गदर्शक-प्रवर्तक! अपेक्षा ही असेल की, या मेंटरने विजयासाठी कानमंत्र द्यावा! धोनी अर्थातच त्यात मास्टर आहे. धोनीला परिस्थिती वाचता येते आणि खेळाडूही वाचता येतात, प्रत्येक स्थितीची, प्रत्येक खेळाडूची पारख करता येते. साहजिकच, कोणत्या वेळी कोणत्या खेळाडूला संधी द्यायची आणि त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी करवून घ्यायची, यात धोनीचा हात आजच्या घडीला कोणीही धरु शकणार नाही. पण, मैदानाबाहेर बसून मार्गदर्शन करणारा धोनी खरच यश मिळवून देऊ शकेल का?

सकृतदर्शनी याचे उत्तर होकारार्थी आहे आणि त्याचीही स्वतंत्र कारणे आहेत.

यापूर्वी धोनीने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना आपल्याभोवती एक मर्यादा आखलेली होती. तो फक्त यष्टीरक्षण आणि फलंदाजी यापुरता मर्यादित होता. तो काही वेळा क्षेत्ररक्षण जरुर लावायचा, गोलंदाजाला चेंडू कसा टाकायचा, हे देखील सांगायचा. पण, त्याने आपली मर्यादा आपल्या मनात आखून ठेवली होती! ती त्याने कधीच ओलांडली नाही.

मात्र, आता मेंटर म्हणून कार्यरत होताना त्याचा आवाका मोठा असेल. पूर्वी तो कर्णधार विराटच्या निर्णयात हस्तक्षेप करत नसे. आता तो फलंदाजांची क्रमवारी निश्चित करण्याची सूचना करेल. चौथ्या स्थानी कोणी उतरायचे हे ठरवेल, नाणेफेक जिंकल्यावर काय करायचे, हे सांगेल आणि अश्विनला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी द्यायची की मधल्या षटकात, हे देखील निश्चित करेल!

बीसीसीआयने दिलेली सुपर पॉवर ही त्याची जमेची बाजू असेल आणि मागील 3 आयसीसी स्पर्धांमधील अपयश मागे सारत यंदा जेतेपद मिळवून देणे ही त्याच्यावरील मुख्य जबाबदारी असेल.

सुपर कूल धोनी आणि सुपर अग्रेसिव्ह विराट यांचे नवे समीकरण यामुळेच भारतीय चाहत्यांसाठी अधिक आशादायी असणार आहे. जेतेपद आपल्याला आतापासूनच खुणावत असणार आहे! यश नेहमी वीरश्रीला जेतेपदाची माळ घालते, असे म्हणतात. तेव्हा ब्रेव्हो टीम इंडिया! लगे रहो!

Related Stories

सुमित नागल मुख्य ड्रॉमध्ये

Patil_p

फजल खलील केएससीए निवड समितीचे अध्यक्ष

Patil_p

अफगाणसमोर बहरातील पाकिस्तानचे आव्हान

Amit Kulkarni

शेफिल्ड युनायटेड खेळाडूंची वेतन कपातीला मान्यता

Patil_p

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी मालिका जूनमध्ये

Patil_p

माजी हॉकी प्रशिक्षक श्रीधर शेणॉय कालवश

Patil_p
error: Content is protected !!