तरुण भारत

वास्कोतील मासे विक्रेत्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश

मागण्या पूर्ण करण्याचे मुख्याधिकाऱयांचे आश्वासन  लेखी हमीनंतरच जुने मार्केट सोडणार

प्रतिनिधी /वास्को

Advertisements

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या वास्कोतील मासे विक्रेत्यांच्या प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघालेला असून मासे विक्रेत्यांनी जुने मासळी मार्केट सोडण्यासाठी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुरगाव पालिकेने मासे विक्रेत्यांना दिले आहे. मासे विक्रेत्यांनी केलेल्या मागणीनुसार या मासे विक्रेत्यांना लेखी आश्वासन मिळणार असून पुढील तीन ते चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतरच मासळी मार्केट खाली करू, असे आश्वासन मासे विक्रेत्यांनी मुरगाव पालिका मुख्याधिकाऱयांना दिले आहे.

वास्को शहरात जुन्या मासळी मार्केटच्या जागी नवीन मासळी मार्केट बांधण्यासाठी  जुने मार्केट खाली करण्याची आवश्यकता असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुरगाव पालिका अधिकाऱयांकडून त्यांची मनधरणी करण्यात येत होती. दबावही आणण्यात येत होता. त्यामुळेच दोन दिवस या मासळी मार्केटच्या ठिकाणी पोलीसही दाखल झाले होते. मात्र, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय जुने मासळी मार्केट सोडणार नसल्याची ताठर भूमिका मासे विक्रेत्या महिलांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता. या प्रश्नाने गेले काही दिवस काहीसा तणावही निर्माण केला होता. त्यामुळे अधिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी काल शुक्रवारी प्रशासनाने मार्केट सोडण्यासाठी मासे विक्रेत्या महिला व फळ विक्रेत्यांवर दबाव आणण्याचे टाळले. मात्र, गरज पडल्यास कडक कारवाई करण्यासाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या पथकाने सकाळी मासळी मार्केटजवळ संचलनही केले. त्यामुळे मासळी मार्केट बळजबरीने खाली केले जाण्याची शक्यता बळावली होती. मात्र, तसे काही झाले नाही. वातावरण शांतच होते.

मासे विक्रेत्यांच्या समर्थनार्थ राजकीय नेत्यांचीही हजेरी

येणाऱया विधानसभा निवडणुकांमुळे गोव्याचे राजकारण सध्या तापलेले आहे. याचे पडसाद काही प्रमाणात वास्कोतील मासळी मार्केटच्या प्रश्नावर उमटल्याचे शुक्रवारी दिवसभरात दिसून आले. नुवेतील एक समाजसेवक आणि राजकारणात प्रवेश केलेले राजू काब्राल यांनी सकाळी या मासे विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आणि मुरगाव पालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. संध्याकाळपर्यंत ते मासे विक्रेत्यांसोबत होते. गोंयचो आवाज या पक्षाचे कॅप्टन विरीयतो फर्नांडिस हेसुध्दा मासे विक्रेत्यांच्या समर्थनार्थ हजर होते. काँग्रेसचे पुढारी आणि रापणकारांचे नेते ओलान्सीयो सिमोईस, अखिल भारतीय असंघटीत कामगार काँग्रेसचे गोवा राज्य प्रमुख देवसुरभी यदुवंशी, तृणमुल काँग्रेसचे जयेश शेटगावकर मासे विक्रेत्यांच्या समर्थनार्थ हजर होते. मासे विक्रेत्यांच्या समर्थनार्थ जमलेल्या नेत्यांनी मासे विक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून मासे विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले.

मासे विक्रेत्यांना विश्वासात घ्या, मागण्या पूर्ण करा

दुपारी तीन वाजता या प्रश्नावर मासे विक्रेत्यांसमवेत चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांच्या कार्यालयात पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांनी बैठक बोलावली होती. त्यामुळे पालिका इमारतीखाली मासे विक्रेत्या महिला व फळ विक्रेते मोठय़ा संख्येने जमले होते. मुख्याधिकाऱयांनी काही मोजक्याच मासे विक्रेत्या, फळ विक्रेत्या व त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या समाजसेवकांसोबत या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, जी सुडाचे अभियंते व मासळी मार्केटशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. वास्कोत नवीन मासळी मार्केट उभारण्याची का आवश्यकता आहे याचे स्पष्टीकरण मुख्याधिकाऱयांनी दिले. इतर शहरात उभारण्यात आलेल्या मार्केट प्रकल्पांबाबतही मुख्याधिकाऱयांनी माहिती दिली. वास्कोतही चांगले मार्केट होणे आवश्यक असल्याने जुने मार्केट खाली करण्याची गरज मुख्याधिकाऱयांनी व्यक्त केली. मासे विक्रेत्यांसाठी उपलब्ध केलेल्या तात्पुरत्या मार्केटबाबतही त्यांनी माहिती दिली. यावेळी मासे विक्रेत्यांतर्फे ओलान्सीयो सिमोईस, विरीयतो फर्नांडिस, मच्छीमार किस्तोद डिसोजा तसेच देवसुरभी यदुवंशी यांनी बाजू मांडली. नवीन मार्केट उभारणीला कोणाचाही विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले व मासे विक्रेत्या जुने मासळी मार्केट खाली करण्यास का तयार नाही याची कारणे मांडली. त्यांना विश्वासात घ्या व त्यांच्या मागण्या पूर्ण करा, अशी सूचना त्यांनी केली.

प्रशासनाप्रति अविश्वासामुळे मासे विक्रेत्यांच्या मनात साशंकता

या बैठकीच्यावेळी प्रशासनाप्रति मासे विक्रेत्यांना विश्वास नसल्याचे दिसून आले. अविश्वासाच्या वातावरणामुळे मासे विक्रेत्या आतापर्यंत मासळी मार्केट सोडण्यास तयार झालेल्या नाहीत. दीड वर्षांत मार्केट उपलब्ध होईल की नाही, सर्व मासे विक्रेत्यांना त्या मार्केटमध्ये संधी मिळेल की नाही याबाबत त्यांच्या मनात साशंकता आहेत. या बैठकीत त्यांनी वास्को शहरात होणारी बेकायदा मासे विक्री कायमची बंद होणार की नाही याबाबतही साशंकता व्यक्त करून आमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्याची सूचना मुख्याधिकाऱयांना केली. तोपर्यंत मार्केट सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्याधिकाऱयांनी मासे विक्रेत्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. मासळी मार्केटपासून दोन किलो मीटर अंतरापर्यंत मासे विक्री होणार नाही यासाठी पोलिसांकरवी कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी मासे विक्रेत्यांना दिले. पालिकेकडे नोंद असलेल्या सर्वांची सोय नवीन मार्केटमध्ये होईल याची हमी दिली. त्यासाठी नवीन प्रक्रिया पालिका व मासे विक्रेत्यांमध्ये होणार आहे. सर्व मागण्या पूर्ण करण्याची हमी लेखी स्वरूपात देण्याची तयारी मुख्याधिकाऱयांनी दाखवलेली असून पुढील तीन ते चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या आश्वासनानंतर या प्रश्नाला तात्पुरता विराम मिळालेला आहे.

Related Stories

मुरगाव तालुक्यात कडक लॉकडाऊनची मागणी वाढतेय

Amit Kulkarni

बेतोडा भागात पाणी समस्या तीव्र

Omkar B

चार पालिकांसाठी पहिल्या दिवशी दहा अर्ज

Amit Kulkarni

काजू फेणीवरील स्पेशल कव्हरचे प्रकाशन

Omkar B

गोवा माईल्स रद्द करा अन्यथा पर्यटन मंत्री आणि पर्यटन महामंडळाच्या चेअरमनना घरी पाठवू : टेक्सी व्यवसाईकांचा इशारा

Amit Kulkarni

फोंडा पालिकेवर भाजपाचे संख्याबळ दहा होणार

Patil_p
error: Content is protected !!