तरुण भारत

14 वर्षांनी वाढणार ‘काडेपेटी’चे दर

डिसेंबरपासून 1 रुपयाची पेटी 2 रुपयांमध्ये मिळणार

वृत्तसंस्था / मदुराई

Advertisements

14 वर्षांमध्ये अशीच एक गोष्ट राहिली जिने तुमचा खिसा हलका केला नव्हता. महागाईच्या भारात ती काहीशी ‘हलकी’ अवश्य झाली, पण तिचे दर वाढले नव्हते. पण आता 14 वर्षांनी काडेपेटीचे (माचिस किंवा आगपेटी) दर वाढणार आहेत. ही काडेपेटी एक रुपयाने महाग होणार आहे. पुढील महिन्यापासून काडेपेटी 2 रुपयांमध्ये मिळणार आहे. 5 प्रमुख काडेपेटी उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी सर्वसंमतीने 1 डिसेंबरपासून काडेपेटीची एमआरपी 1 रुपयांवरून वाढवत 2 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी काडेपेटीच्या दरात 2007 मध्ये बदल झाला होता. त्यावेळी याची किंमत 50 पैशांवरून वाढवत 1 रुपये करण्यात आली होती. काडेपेटीच्या किमतीतील वृद्धीचा निर्णय शिवकाशीमध्ये ऑल इंडिया चेम्बर ऑफ मॅचेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

उद्योगाच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या किमतीत अलिकडच्या काळात झालेल्या वृद्धीला दरवाढीचे कारण ठरविले आहे. काडेपेटी तयार करण्यासाठी 14 प्रकारच्या कच्च्या मालांची गरज असते. एक किलोग्रॅम लाल फॉस्फरस 425 रुपयांवरून आता 810 रुपयांमध्ये मिळत आहे. याचप्रकारे मेण 58 रुपयांवरून 80 रुपये, बाहेरील बॉक्स बोर्ड 36 रुपयांवरून 55 रुपये तर आतील बॉक्स बोर्ड 32 रुपयांवरुन आता 58 रुपयांमध्ये विकत घ्यावा लागतोय. कागद, स्प्लिंट्स, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरच्या किमतीत देखील 10 ऑक्टोबरपासून वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढलेल्या दरामुळेही भार आल्याचे प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

600 काडेपेटींचे बंडल 300 रुपयांमध्ये

उत्पादक 600 काडेपेटींचे (एका बॉक्समध्ये काडेपेटीच्या 50 काडय़ा) एक बंडल 270 रुपयांवरून 300 रुपयांपर्यत विकत आहे. आम्ही आमच्या कारखान्यांमधून विक्रीमूल्य वाढवून 430-480 रुपये प्रतिबंडल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 12 टक्के जीएसटी आणि वाहतूक खर्च सामील नसल्याची माहिती नॅशनल स्मॉल मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही. एस. सेथुरथिम यांनी दिली आहे.

4 लाख लोक कार्यरत

पूर्ण तामिळनाडूत या उद्योगात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात सुमारे 4 लाख लोक कार्यरत आहेत. तर प्रत्यक्ष कर्मचाऱयांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक महिला आहेत. उद्योग कर्मचाऱयांना चांगले वेतन देत एका अधिक स्थिर कार्यबळाला आकर्षित करण्याची अपेक्षा आहे. मनरेगा अंतर्गत काम करण्यास लोक अधिक स्वारस्य दर्शवित आहेत, कारण तेथील मजुरी याहून अधिक आहे. काडेपेटी तयार करणाऱयांना बॉक्स निर्माण करण्याच्या क्षमतेच्या आधारावर पैसे दिले जातात. महिलांना प्रतिदिन 240 ते 280 रुपये तर पुरुषांना 300 ते 350 रुपये मिळतात.

निर्मितीत तामिळनाडू आघाडीवर

देशात सर्वाधिक काडेपेटय़ांची निर्मिती तामिळनाडूत होते. काडेपेटी निर्मितीची केंद्रे शिवकाशी, विरुधुनगर, गुडियाथम आणि तिरुनेलवेली येथे आहेत.

Related Stories

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र का?

Patil_p

मासे सांगणार नदी प्रदूषणाची पातळी

Patil_p

भाजपच्या 77 आमदारांना केंद्रीय सुरक्षा

Patil_p

उत्तर प्रदेशात अपघातात 12 भाविकांचा मृत्यू

Patil_p

21 व्या शतकातील शालेय शिक्षण बैठकीत उद्या नरेंद्र मोदींचे भाषण

Rohan_P

होमवर्कने त्रस्त मुलीची ‘मोदी साब’कडे तक्रार

Amit Kulkarni
error: Content is protected !!