तरुण भारत

बलाढय़ ऑस्ट्रेलियाची द. आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी

वृत्तसंस्था/ अबु धाबी

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू खेळाच्या जोरावर बलाढय़ ऑस्ट्रेलियाने शनिवारच्या चुरशीच्या सामन्यात चिवट दक्षिण आफ्रिकेचा केवळ दोन चेंडू बाकी ठेवून पाच गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 118 धावा जमवित ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 119 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकात 5 बाद 119 धावा जमवत निसटता विजय मिळविला.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या आणि मधल्याफळीतील फलंदाजांना लवकर बाद करण्यास यश मिळविले. या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर उशिरा येत असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आले नाही.

ऑस्ट्रेलियातर्फे हॅजलवूड, झाम्पा आणि स्टार्क हे प्रभावी गोलंदाज ठरले. हॅजलवूडने 19 धावांत 2, झाम्पाने 21 धावांत 2 तर स्टार्कने 33 धावांत 2 गडी बाद केले. कमिन्सने तसेच मॅक्सवेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेतर्फे मार्करेमने एकाकी लढत देत 36 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 40 धावा जमविल्या. मुल्डरने 18 चेंडूत 16, केसनने 13 चेंडूत 2 चौकारांसह 13, कर्णधार बवूमाने 7 चेंडूत 2 चौकारांसह 12, डी कॉकने 1 चौकारांसह 7 तर रबाडाने 23 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 19 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 2 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाला बऱयापैकी सुरूवात झाली. कर्णधार बवुमाने ऑफ साईडच्या देशेने दोन चौकार पहिल्याच षटकांत मारले. स्टार्कचे हे पहिले षटक थोडे महागडे ठरले. पण मॅक्सवेलने आपल्या पहिल्या षटकात बवुमाचा त्रिफळा उडविला. ऑस्ट्रेलियाच्या हॅजलवूडने दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डेर डय़ुसेनला दोन धावांवर झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज डी कॉकने मॅक्सवेलच्या षटकांत मिडॉनच्या दिशेने चौकार ठोकला. पण हॅजलवूडने त्याचा 7 धावांवर त्रिफळा उडविला.

दक्षिण आफ्रिकेची स्थिती यावेळी 3 बाद 23 अशी होती. दक्षिण आफ्रिकेच्या क्लासनने 2 चौकार मारले. पण, त्यानंतर तो कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. फिरकी गोलंदाज झाम्पाने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 14 व्या षटकात 2 गडी बाद केले. त्याने डेव्हिड मिलर आणि प्रेटोरियस यांचे बळी मिळविले. दक्षिण आफ्रिकेने यावेळी  6 बाद 82 धावा जमविल्या होत्या. केशव महाराज चोरटी धाव घेण्याच्या नादात खाते उघडण्यापूर्वी धावचीत झाला.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने चांगलेच रोखले होते. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची जरूरी होती. ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिसने प्रिटोरियसच्या या षटकांत दोन चौकार ठोकून आपल्या संघाला दोन चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. तत्पूर्वी 16 व्या षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 81 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात स्टीव्ह स्मिथ आणि मॅक्सवेल यांनी चौथ्या गडय़ासाठी 42 धावांची भागीदारी केली.

स्मिथने 3 चौकारांसह 31 चेंडूत 35 तर मॅक्सवेलने 21 चेंडूत 1 चौकारांसह 18 धावा जमविल्या. सलामीच्या वॉर्नरने 15 चेंडूत 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. मॅथ्यू वेडने 10 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 15 तर स्टोईनिसने 16 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 24 धावा झळकावल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा, केशव महाराज, शम्सी यांनी प्रत्येकी 1 तर नोर्त्झेने 21 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या डावात 13 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 20 षटकात 9 बाद 118 (बवुमा 12, डी कॉक 7, व्हॅन डेर डय़ुसेन 2, मार्करेम 40, क्लासन 13, मिलर 16, रबाडा 19, स्टार्क 2-33, झाम्पा 2-21, हॅजलवूड 2-19. कमिन्स आणि मॅक्सवेल प्रत्येकी एक बळी)

ऑस्ट्रेलिया 19.4 षटकात 5 बाद 121 (वॉर्नर 14, फिंच 0, मार्क 11, स्टीव्ह स्मिथ 35, मॅक्सवेल 18, स्टोईनिस नाबाद 24, वेड नाबाद 15, नोर्त्झे 2-21, रबाडा, केशव महाराज आणि शम्सी प्रत्येकी एक बळी.

Related Stories

फलंदाजीत विराट-रोहित, गोलंदाजीत बुमराह आघाडीवर

Patil_p

कोरोनामुळे BCCI कडून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

prashant_c

बेंगळूर युनायटेडची मोहम्मेडनवर मात

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्स हंगामात चौथ्यांदा पराभूत

Omkar B

रोहितचा आत्मघाती फटका, भारत बॅकफूटवर

Patil_p

भारत-ओमान फुटबॉल सामना बरोबरीत

Patil_p
error: Content is protected !!