तरुण भारत

क्रिकेटच्या रणांगणात आज भारत-पाक ‘महायुद्ध’

भारताचे मेगास्टार विरुद्ध पाकचे युवा खेळाडू यातच होणार मुख्य युद्ध

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

भारत व पाकिस्तान हे कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी आज (रविवार दि. 24) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या साखळी लढतीत आमनेसामने भिडणार असून यंदाच्या विश्वचषकातील ही सर्वात मोठी लढत असणार आहे. भारताचे मेगास्टार विरुद्ध पाकिस्तानची युवा पिढी, यातच खरी रस्सीखेच अपेक्षित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

सीमारेषेवरील तणावाचे प्रतिबिंब क्रिकेटमध्येही उमटत राहिले असल्याने भारत-पाकिस्तानचे संघ मागील कित्येक दशकात ज्या-ज्यावेळी आमनेसामने भिडले, त्या-त्यावेळी उभय संघातील सामने जणू क्रिकेटचे महायुद्धच ठरत आले आहेत आणि आजचा सामनाही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.

2007 मध्ये टी-20 वर्ल्डकपला प्रारंभ झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात 5 लढती झाल्या असून या प्रत्येक वेळी भारतानेच बाजी मारली आहे आणि योगायोगाने यात प्रत्येक वेळी धोनीच कर्णधार राहिला आहे.

अगदी ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर व बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी देखील भारत-क्रिकेट लढतीची अवघ्या क्रिकेट जगताला उत्कंठा लागून असते, हे अधोरेखित केले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आपला स्टारडम सिद्ध करण्यासाठी नव्याने सज्ज असेल तर पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी नव्या चेंडूवर खळबळ उडवून देण्याच्या महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरेल.

तूर्तास, दोन्ही संघातील खेळाडूंसाठी हा केवळ एक सामना असला तरी त्याकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे, याबद्दल काहीच साशंकतेचे कारण नाही. पाकिस्तानविरुद्ध 2017 आयसीसी चॅम्पियन्स चषकातील फायनलच्या पराभवाचे उट्टे काढण्याचे लक्ष्य विराट, रोहित, बुमराह यांच्यासमोरही असणार आहे.

अलीकडील कालावधीत इंग्लंड, न्यूझीलंड या दिग्गज संघांनी पाकिस्तान दौऱयावर जाणे टाळले असून पाकिस्तानला आपले घरचे सामने मुख्येत्वेकरुन युएईमध्येच खेळावे लागले आहेत आणि हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे.

फलंदाजीत रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव व रिषभ पंत या पहिल्या 5 खेळाडूंवर भारताची भिस्त असेल. शाहीन आफ्रिदी, रौफ, हसन, इमाद वासिम व शदाब खान यांचा समाचार घेण्यात यश आले तर ही बाब निश्चितपणाने भारताच्या पथ्यावर पडणार आहे.

अष्टपैलू हार्दिक पंडय़ा अलीकडे गोलंदाजी करु शकला नसल्याने भारतासमोर सहाव्या गोलंदाजाचा सक्षम पर्याय उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हाणामारीच्या षटकात 10 चेंडू 20 धावा, असे वगैरे आव्हान असल्यास हार्दिक पंडय़ा आजही विस्फोटक फलंदाजी करु शकतो, हे विसरुन चालणार नाही. मागील लढतीत त्याने याची छोटीशी चुणूक दाखवून दिली आहे.

गोलंदाजीच्या आघाडीवर भारताची भिस्त बुमराह, रविंद्र जडेजा, शमी व वरुण चक्रवर्ती यांच्यावर असू शकते. भुवनेश्वर कुमारचा अनुभवही बऱयापैकी उपयुक्त ठरु शकतो. शार्दुल ठाकुरचे वैविध्य प्रतिस्पर्ध्यांना पेचात टाकू शकते. दडपण हाताळण्याचा उत्तम अनुभव असणारा रविचंद्रन अश्विन हा त्या तुलनेत नवोदित राहुल चहरपेक्षा बराच प्रभावी ठरु शकतो.

पाकची शाहीनवर भिस्त

पाकिस्तानची मुख्य भिस्त कर्णधार बाबर आझम व युवा जलद गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्यावरच असणार आहे. यापैकी बाबर आझम हा टी-20 क्रिकेट प्रकारात पाकिस्तानचा सुपरस्टार म्हणून उदयास आला आहे. अर्थात, गोलंदाजीच्या आघाडीवर शाहीद आफ्रिदीसह हसन व रौफ यांनाही सूर सापडणे पाकिस्तानसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. डावखुरा फिरकीपटू इमादचे युएईमधील रेकॉर्ड उत्तम राहिले आहे. रिषभ पंत व सुर्यकुमार यादव यांच्यासमोर इमादचे प्रदर्शन कसे होईल, यावरही बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत. शोएब मलिक व मोहम्मद हाफीज या दोन ज्येष्ठ, अनुभवी खेळाडूंचे योगदानही पाकिस्तानसाठी महत्त्वाचे असणार आहे.

संभाव्य संघ

भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, इशान किशन, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर.

पाकिस्तान (12 खेळाडू) ः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमन, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, असिफ अली, इमाद वासिम, शदाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.

नासीर हुसेनचा इशारा, प्लॅन बी नसणे भारताला फटका देणारे ठरु शकेल!

यंदाच्या आयसीसी विश्वचषकासाठी भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, हे मी अजिबात नाकारणार नाही. पण, भारतीय संघाकडे प्लॅन बी कधीच तयार नसतो. त्यामुळे, या टी-20 विश्वचषकात कोणताही संघ भारताला एखादा झटका देऊ शकतो, अशा स्पष्ट शब्दात माजी इंग्लिश कर्णधार नासीर हुसेनने भारतीय क्रिकेट संघाला एक प्रकारे सावधानतेचा इशारा दिला आहे.

भारतीय संघ सध्या उत्तम बहरात आहे, ही बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे नासीर म्हणतो. भारताने प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी दोन सराव सामन्यात अनुक्रमे इंग्लंड व ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत उत्तम सुरुवात केली आहे. शिवाय, अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत देखील भारताचे वर्ल्डकपवीर अपवाद वगळता उत्तम बहरात राहिल्याचे दिसून आले आहे.

आयसीसी इव्हेंट्समध्ये भारताचे प्रदर्शन बऱयाच अंशी खराब स्वरुपाचे राहत आले आहे, याकडे नासीर हुसेनने लक्ष वेधले. तो म्हणाला, ‘आयसीसी स्पर्धेत भारताला सूर सापडत नाही, असे आपण अनेकदा अनुभवले आहे. त्यांना बरेच दडपण देखील झेलावे लागते. अगदी एखादी चूक देखील महागडी ठरु शकते. पण, माझ्या दृष्टीने त्यांच्याकडे प्लॅन बी असत नाही, ही सर्वात गंभीर बाब आहे. मागील विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध लो स्कोअरिंग सामना झाला, त्यावेळी त्यांच्याकडे काहीच ठोस प्रत्युत्तर  

युएईमध्ये आयपीएल अनुभवाचा भारताला लाभ होईल- सुरेश रैना

विराटसह सर्व अव्वल खेळाडूंनी अलीकडे युएईमध्येच आयपीएल स्पर्धेत सहभाग घेतला असून या अनुभवाचा भारतीय संघाला निश्चितपणाने लाभ होईल, असा दावा माजी भारतीय फलंदाज सुरेश रैनाने केला आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या भारताची आज पाकिस्तानविरुद्ध सलामी लढत होत असून त्या पार्श्वभूमीवर हा माजी डावखुरा फलंदाज बोलत होता.

‘आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय खेळाडू युएईमध्ये बरेच खेळले आहेत आणि हाच अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संघात विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. कर्णधार या नात्याने विराट कोहली व बाबर आझम स्वतः पुढाकाराने लढतात. त्यामुळे, त्यांचे योगदानही त्या-त्या संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कपिलदेव, इम्रान खान, सौरभ गांगुली, इंझमाम हक, धोनी आणि आता कोहली व बाबर इथवर आलेला हा प्रवास आजच्या लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ताजातवाना होणार आहे’, असे रैनाने पुढे नमूद केले.

पाकिस्तानचे 12 खेळाडू जाहीर, भारताचा प्लॅन मात्र अद्याप गुलदस्त्यात!

मदर ऑफ ऑल बॅटल्स म्हणून ओळखल्या जाणाऱया आजच्या लढतीसाठी पाकिस्तानने आपला 12 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने मात्र नाणेफेकीच्या वेळीच अंतिम एकादश जाहीर केला जाईल, असे नमूद केले आहे. सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका काय असेल, याची स्पष्ट कल्पना आहे, इतकेच मी तूर्तास सांगू शकतो, असे विराट याप्रसंगी म्हणाला.

Related Stories

कोलकाता-हैद्राबाद आज महत्त्वाचा सामना

Patil_p

राजस्थान रॉयल्सच्या फिरकी सल्लागारपदी ईश सोधी

Patil_p

द.आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी

Patil_p

मीराबाईच्या मदतीसाठी मोदींची मध्यस्थी

datta jadhav

विदेशी खेळाडूंच्या ‘रिटर्न जर्नी’साठी बीसीसीआय पुढाकार घेणार

Patil_p

कोल्हापूरच्या राही सरनोबतने जिंकली ऑलिम्पिकची रंगीत तालीम

Patil_p
error: Content is protected !!