तरुण भारत

आंतरराज्य दुचाकी चोर गजाआड

महाराष्ट्रासह गुजरात राज्यात चोरलेल्या 16 दुचाकी हस्तगत

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

एसटीने कराडसह वेगवेगळ्या शहरात जाऊन तेथे बसस्थानकाच्या जवळपास पार्किंग केलेल्या दुचाकी लंपास करणाऱया चोरटय़ास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले. त्याच्याकडून 16 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयिताने आणखी दुचाकी चोरून त्या विकल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. 

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी याप्रकरणी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

पोलिसांचे विशेष पथक कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरांवर नजर ठेवून होते. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार संतोष सपाटे व नितीन येळवे कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्या माहितीवरून एक संशयित इसम कराड बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आला. त्यास नाव, गाव विचारले असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास गुन्हे प्रकटीकरण शाखेत आणत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी चौकशी केली. या चौकशीत त्याने काही दुचाकी चोरल्या असाव्यात, असा संशय आला.

महाराष्ट्रासह गुजरातमधेही चोरल्या दुचाकी

संशयिताला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने 16 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. चोरी केलेल्या सर्व दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.  संशयिताने कराड शहरातून सात, विटा येथून तीन, पालघर जिह्यातील कासा येथून एक तसेच अहमदाबाद (गुजरात) येथून पाच अशा एकूण पाच लाख 58 हजारांच्या सोळा दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. 

 बनावट चावीने दुचाकींवर डल्ला

गुह्याच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली असून संशयिताने महाराष्ट्रासह गुजरातच्या अहमदाबाद शहरातूनही दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. संशयित एसटीने वेगवेगळ्या शहरात जाऊन बसस्थानक परिसरात लोकांनी पार्क केलेल्या स्प्लेंडर, एचफ डिलक्स व शाईन अशा दुचाकी गाडय़ा टार्गेट करत ‘मास्टर की’ने हॅण्डल लॉक काढून डल्ला मारत  होता. गाडीची नंबर प्लेट काढून ग्राहक शोधून कोरोनामुळे कागदपत्रे ट्रान्सफर होण्यास वेळ लागत आहे, अशी बतावणी करून गाडय़ांची विक्री करत होता. गाडय़ा चोरून विकून मिळालेल्या पैशातून मौजमजा करत होता. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर, सहाय्यक निरीक्षक अशोक भापकर, संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, मनोज शिंदे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, संदीप कुंभार, मारुती लाटणे, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी ही कारवाई केली.

Related Stories

अडीच हजार रुपये मिळणार केव्हा?

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 12,557 नवीन कोरोना रुग्ण; 233 मृत्यू

Rohan_P

सोलापूर शहराने ओलांडला पाच हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा

Abhijeet Shinde

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक लवकरच…

Abhijeet Shinde

शिये येथे नाभिक संघटनेच्यावतीने सरकारचा निषेध,आर्थिक मदतीची केली मागणी

Abhijeet Shinde

गुरुवार पेठेत नारळाच्या झाडावर पडली वीज

Amit Kulkarni
error: Content is protected !!