तरुण भारत

गोवा फॉरवर्डचे तृणमूलशी जुळण्याआधीचे तुटले

विजय सरदेसाईंची माघार, तृणमूल काँग्रेसला दणका

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

एका नाटय़पूर्ण घडामोडीत ‘गोंय गोंयकार गोयकारपण’ तत्त्व पाहणारे गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी बंगाली पक्ष तृणमूलशी युती करण्याच्या प्रस्तावित संकल्पापासून माघार घेण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने शनिवारी विजय सरदेसाई यांनी पक्षाध्यक्ष या नात्याने मडगाव येथे आयोजित केलेली गोवा फॉरवर्ड राज्य कार्यकारिणीची बैठकही रद्द केली. निवडणुकीपूर्वी विधानसभेत खाते उघडण्यासाठी प्रयत्न करणाऱया तृणमूल पक्षाला यामुळे चांगलाच व पहिला जबरदस्त दणका बसला आहे.

गेले आठ दिवस गोवा फॉरवर्डचे तृणमूल पक्षात विसर्जन करण्यासंदर्भात जोरदार हालचाली चालू होत्या. काँग्रेस पक्षाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे गोवा फॉरवर्डने तृणमूल पक्षातर्फे आलेला प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरविले होते मात्र असंख्य नागरिकांनी विजय सरदेसाई यांची भेट घेऊन अशा तऱहेचा निर्णय घाईघाईने घेऊ नका. गोंय, गोयकारपण राखणारे तुम्ही, तुमचा पक्ष बंगाली लोकांच्या दारी बांधू नका अशी विनंती केली होती. विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षातील अनेकांशी बातचीत केली असता बंगाली पक्षाबरोबर युती, आघाडी सोडाच विसर्जनाचे तर नावच काढू नका, असेही सांगितले व सूचनाही केल्या.

दरम्यान, विजय सरदेसाई यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षावर गंभीर परिणाम होणार असल्याने पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना त्यात लक्ष घालण्यास सांगितले व नियोजित आघाडीमध्ये गोवा फॉरवर्डला सहभागी करुन घ्या, अशी विनंती केली. त्यानुसार काँग्रेसनेही विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधलेला आहे. विजय सरदेसाई यांनी शनिवारी महत्त्वाची बैठक बोलाविली होती. राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीत पक्षाचे तृणमूलमध्ये विसर्जन करण्याचा डाव होता मात्र पक्षातील अनेकांचे म्हणणे होते की, या प्रकारामुळे पक्ष आपले अस्तित्व गमावून बसणार शिवाय गोव्याच्या अस्मितेला बाधा पोहोचणार. विजयना देखील हे पटले आणि त्यांनी आपली शनिवारची राज्य कार्यकारिणीची बैठकच रद्द करुन टाकली.

मी स्वाभिमानी गोंयकार ः विजय

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता आपण स्वाभिमानी गोंयकार आहे व गोव्याच्या व गोमंतकीयांच्या स्वाभिमानाशी आपण कधीही तडजोड करणार नाही असे ते म्हणाले. आपली राज्य कार्यकारिणीच बैठक स्थगित करण्यात आलेली आहे, असे सांगून आम्ही सर्व गोमंतकीयांनी एकजूट दाखविली पाहिजे, असे ते म्हणाले.

आपणही युतीच्या मताचा ः दिगंबर कामत

दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याशी या सर्व राजकीय घडामोडीबाबत विचारता ते म्हणाले की, आपणही अशा विचारांचा आहे की गोवा फॉरवर्ड व काँग्रेसने एकत्र यावे. विरोधकांमध्ये फूट असली तर त्याचा लाभ पुन्हा भाजपला होण्याची भीती आहे. पक्षाच्या सर्वच नेत्यांनी यावर निश्चितच विचार करणे सर्वांच्या व गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असे दिगंबर कामत म्हणाले.

दरम्यान, सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, गोवा फॉरवर्डने आपल्या निर्णयात बदल करुन बंगाली पक्षात प्रवेश करायचा नाही या उलट पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणे व समविचारी पक्षांबरोबर जावे या विचारात सर्वजण आहेत. या अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे तृणमूल काँग्रेसला पहिला दणका मिळाल्यात जमा आहे.

Related Stories

‘सेझ’ जमीन लिलाव प्रकरणी राज्य सरकारला नोटीस

Amit Kulkarni

जनता भाजपला 13 वरुन शून्यावर आणल्याशिवाय राहणार नाही

Amit Kulkarni

सत्तरीतील तिन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज

Patil_p

दुर्लक्षित घटकांच्या समस्या सोडविणार : मुख्यमंत्री

Patil_p

गांधी मार्केटातील फळ-भाजी विक्रेते रवींद्र भवन मार्गावर दुकाने थाटणार

Patil_p

आजाराचा बाजार करण्याचे भाजपचे धोरण आजही चालुच : अमरनाथ पणजीकर

Omkar B
error: Content is protected !!