तरुण भारत

डॉ.भाटीकर यांचे कार्य, हीच विजयाची खात्री

कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुदिन ढवळीकरांचे उद्गार : मगोचे कार्य प्रत्येक मतदारापर्यंत पोचवा

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

डॉ. केतन भाटीकर यांचे फोंडा मतदारसंघातीला कार्य व लोकसंपर्क पाहिल्यास ही जागा मगो पक्ष निश्चितच जिंकणार. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथनिहाय बैठका घेऊन संघटन मजबूत करतानाच, प्रत्येक मतदारपर्यंत मगोपक्षाचे कार्य पोचविण्याचे आवाहन  मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले. मगो पक्षाचे फोंडय़ातील उमेदवार डॉ. भाटीकर यांनी आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ढवळीकर बोलत होते.

कार्यकर्त्यांचे बळ हीच मगो पक्षाची खरी ताकद आहे. मुक्तीनंतर गोव्याच्या विकासाचा सूनियोजित पाया मगो पक्षांने घातला. प्राथमिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण, उद्योग यासह पायाभूत सुविधा उभारल्या. भाजपासोबत सत्तेत असताना गोव्यातील रस्ते व पुलांचे बांधकामांत आमची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आज भाजपा त्याचे पूर्ण श्रेय लाटत आहे. मगो पक्षांच्या सत्ताकाळातील सुशासन व विकास या सर्व गोष्टी मतदारांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रत्येक बुथवर संघटनात्मक कार्य करताना, कामात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. फोंडा पालिका क्षेत्रात विशेष लक्ष घालण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विविध क्षेत्रातील लोकांना मगो पक्षात स्थान देणार

भाजपासोबत यापूर्वी तीनवेळा युती करून वाईट अनुभव आला. आजवर भाजपाने ज्या ज्या पक्षांशी युती केली, त्या सर्वांचा विश्वासघात केला. स्वाभिमान विकून कुठल्याच परिस्थिती मगो पक्ष युती करणार नाही. येणाऱया निवडणुकीत अजून किती जागा लढवायच्या हे लवकरच ठरविण्यात येईल. हल्लीच गोव्यात प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टी व तृणमूल काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. गोव्यातील सर्व बाराही तालुक्यात रथयात्रा काढली जाणार असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध क्षेत्रातील जाणकारांना पक्षात स्थान दिले जाईल. त्यात युवकांचाही सहभाग असेल, असे ते म्हणाले.

आम्ही जिंकण्यासाठीच निवडणूक लढू ः डॉ. भाटीकर

कार्यकर्त्यांचा पाठिंबा व निष्ठेच्या बळावर फोंडय़ाची जागा आम्ही निश्चितच जिंकू असा विश्वास डॉ. केतन भाटीकर यांनी व्यक्त केला. मिशन फोंडा 2022ची ही पहिली बैठक असून फोंडा मतदारसंघात लवकरच विविध गट समित्या स्थापन करून त्यात युवा व महिलांवर जबाबदारी सोपविण्यात येईल. आपल्या विरोधात आजवर मोठय़ा प्रमाणात अफवा पसरविण्यात आल्या. आपले नावही बदनाम करण्यात आले. निवडणुकीच्या काळात त्यांना अजून पेव फुटणार आहे. आपण त्याची पर्वा करीत नसून कार्यकर्ते व कार्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपा व काँग्रेसला आम्ही धूळ चारली व निवडणूक एक हाती जिंकली. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल. आम्ही जिंकण्यासाठीच लढू असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात दिवाळीनंतर सिटी स्कॅन, एमआरआय या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. गटाध्यक्ष मंगेश कुंडईकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. डॉ. भाटीकर यांचे तळागाळात सुरु असलेले समाजकार्य, कोरोना काळात त्यांनी केलेली मदत ही आमची सकारात्मक बाजू असून मगोचे कार्य फोंडय़ातील सर्व 43 बुथांवर मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

धारगळ येथील ऊस शेती आगीत बेचिराख

Amit Kulkarni

कर्नाटकच्या नागरिकांची गावी जायला धावपळ चालूच

Omkar B

जुने गोवे येथील हेलिपॅडचे लोकार्पण

Amit Kulkarni

मशिनद्वारे हजेरी नोंदणी पद्धत चालू करण्याचे निर्देश

Amit Kulkarni

रेल्वे अधिकाऱयाने मागितली एलिनाची माफी

Patil_p

मोपा तुळसकरवाडी ते मोपा विमानतळ प्रकल्प रस्त्याला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

Amit Kulkarni
error: Content is protected !!