तरुण भारत

पत्र लिहिते तुजला…

फूल तुम्हे भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है

प्रियतम मेरे तुम भी लिखना, क्मया ये तुम्हारे काबिल है?

Advertisements

अजूनही जुन्या रेडिओच्या जमान्यात जगणाऱया आजीने या गाण्याच्या ओळी ऐकून कान टवकारले. तिचे वृद्ध अनुभवी डोळे भूतकाळाचा वेध घेऊ लागले. आणि मोबाईलवर दोन्ही हातांच्या बोटांनी टकटक टायपिंग करण्यात गढून गेलेल्या नातवंडांनी कूतुहलाने आजीकडे पाहिलं. गेला तो जमाना आता! सुस्कारा सोडून आजी पुटपुटली. ‘अगं आजी, तो जमाना गेला तेच बरं झालं की! आता ज्याचे मेसेज त्याला मोबाइलवर पटापट जातात. आता मला सांग, त्या काळात प्रेमपत्र लिहायचं आणि ते इच्छित व्यक्तीपर्यंत पोहचवायचं म्हणजे किती कठीण होतं! ही अशी गाणीच सांगतात ना?’

 प्रेमिकांना मदत करणारी मित्रलोकं त्याही वेळी होतीच गं! आजीने हसतहसत उत्तर दिलं. ‘अगं पण त्यातलं कुणी आलंच नाही किंवा एखादा मित्र उलटा फिरला तर संपलंच ना सगळं? पत्र पोहोचत नसे आणि मग ब्रेकअप. शिवाय पोस्टाने ते प्रेमपत्र पाठवायचं म्हणजे केवढा धोका! त्या माणसाला मिळायच्या आधी अख्ख्या गावाने वाचलेलं असायचं ते!’ इति नात. ‘आत्ताच्या तुमच्या इन्स्टंट काळात प्रेमाचंच शेल्फ लाइफ लिमिटेड झालंय. प्रत्येकाला स्वतःची स्पेस का काय म्हणतात ते सगळं आहे, टेक्नोसॅव्ही आहात, पण ज्या प्रेमासाठी ही सोय झाली तेच कुठे हरवलंय कोण जाणे. तेव्हा सगळं काही कठीण होतं पण माणसाच्या मनातलं प्रेम खरं होतं आणि त्याच प्रेमपत्राच्या भोवती कितीतरी हळूवार गाणी विणली गेली.

नातवंडांनी मान्य तर केलंच पण त्या निमित्ताने यूटय़ूबवर आणि गूगलवर जाऊन ‘पत्र’ आणि ‘प्रेमपत्र’ या विषयावरची भरपूर गाणीही त्यांनी सर्च केली. केवढा खजिना तेव्हा समोर आला! अबब!

सखये प्रेमपत्र पहिले, मखमाली गालांवरि लाजत

अधरांनी लिहिले.

ओहोहो! हे कोणतं बरं प्रेमपत्र म्हणायचं? आणि यासाठी कागद लेखणी हाती धरावी नाही लागली? हे अंगांगी रोमांच उठवणारं प्रेमपत्र म्हणजे प्रणयपत्रच. ‘चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले’ असं अस्मानी सुंदरीचं वर्णन करणारे राजा बढे इथेही’ अंगांगावरि रंग पसरला

मणिबंधी फिरफिरुनि पुसला,

उपाय माझा पुरता फसला

यौवन रसरसले.’ या शब्दांत त्या सुंदरीची अवस्था मांडतात. व्ही डी अंभईकर यांचं संगीत आणि. सुमन माटे यांनी हे गीत गायलंय. घरात राहून चूलमूल सांभाळून प्रपंचात राबून राबून झिजून जाणाऱया बायकांना पूर्वी विसाव्यासाठी घराबाहेर पडायचं तर एकच ठिकाण होतं ते म्हणजे देऊळ, आणि ज्याच्याशी सगळं सगळं सांगायचं तोही देव. लिहावाचायलाही न येणाऱया या बायका आठवडय़ा पंधरवडय़ातून एकदा नियमितपणे भजन करायला जमत असत. त्या भजनातलं एक सुंदर गाणं आहे.

जीव माझा लागला, पत्र लिहिते तूजला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे, हरि रे गाव तुझा माहित नाही रे

गायनाचे कुठलेही संस्कार गळय़ावर नसणाऱया त्या स्त्रिया या गाण्यात विलक्षण भक्तिभाव आणि आर्तता ओतून ते गाणं जिवंत करायच्या. ते ऐकता ऐकता वाटायचं की कुठेतरी तो ‘हरि’ जवळच उभा राहून ते मनानेच पोहोचवलेलं पत्र वाचतोच आहे. भावार्थाचा कागद केला भक्तीची लेखणी

देहाचा तो टपोखान मनाचा तो पोष्टमन

याच्या हाती पत्र पाठविले

पहिला माझा नमस्कार तुझ्या चरणाला

तसाच माझा नमस्कार तुझ्या कुटुंबाला

एवढे पत्र वाचून घ्यावे याचे उत्तर लवकर द्यावे

माझ्या कोमल दात्यारे’

मोठी विलक्षण रचना आहे ही! ‘पत्र’ या विषयावरच तर अशी असंख्य भावगीतं, भक्तिगीतं आणि प्रेमगीतंही रचली गेली आहेत. त्याकाळी पत्राने किंवा तोंडीच संदेश पाठवले जात असत. मारुबिहाग रागातील एक सुंदर बंदिश पं वसंतराव देशपांडे यांनी बांधली होती.

पतियाँ मैं लिख भेजी,

तुम्हरे कारण जुगसी बीतती, मोरी रतिया

असा मुखडा असलेली ही बंदिश त्यांच्या प्रसिद्ध बंदिशींपैकी एक आहे. इथेही ही पतियाँ घेऊन जाण्यासाठी संदेशवाहक म्हणून कगवाँ अर्थात कावळाच मदतीला येतो. आणि त्याला विनंती करावी लागते. तर कुमार गंधर्वांना वसंतरावांनी लिहिलेल्या पत्रातून एक अख्खी बंदिश जन्माला आली होती. मधुवंती रागातली ही बंदिश ‘मैं आऊँ तोरे मंदरवाँ’ आजही फार लोकप्रिय असून सुप्रसिद्ध गायक आणि पंडितजींचे नातु राहुल देशपांडे ती खूपवेळा गायले आहेत आणि गातात.

पंकज उधास हे नाव ऐकताच प्रथम समोर येतो तो और आहिस्ता कीजिए बातें हा अल्बम आणि त्यानंतर सर्वोपरी गाणं येतं ते म्हणजे,

चिट्ठी आयी है आयी है चिट्ठी आयी है

बडे दिनों के बाद हम बेवतनों को याद

वतन की मिट्टी आयी है!

त्यांचा तो मिठास सूर, त्यातली ती आर्तता, घरापासून लांब असलेल्यांच्या व्यथा मांडण्याची त्यांची ती शैली आणि अंगावर शाल ओढलेली त्यांची किंचित हसणारी मूर्ती… तीच व्यथा मांडली आहे जेपींच्या ‘बॉर्डर’ मध्ये.

संदेसे आते हैं हमें तडपाते हैं, के चिट्ठी आती है पूछे जाती है, के घर कब आओगे?

कुणाची बायको, कुणाचीतरी आई कुणाची प्रेमिका डोळय़ांत प्राण आणून बॉर्डर वर गेलेल्या आपल्या माणसाची वाट पहात असते. त्यांचं घर सुनं सुनं होतं, त्यांचं अंगण रिकामं वाट पहात असतं. दसऱयाआधीच सीमोल्लंघन करून गेलेले त्यांचे प्रियजन दिवाळीचे दिवे पहायलाही येऊ शकत नाहीत कारण दुसऱयांच्या घरचे, अख्ख्या देशाघरचे दिवे तेवते ठेवण्याची जबाबदारी असते त्यांच्यावर. कसं येणार? कधी येणार? काहीच माहित नसतं. येत्या जात्या पत्रांवरच मग मदार असते. या सगळय़ा परिस्थितीचं फार हृदयंगम वर्णन केले आहे.

ये मेरा प्रेमपत्र पढकर, के तुम नाराज ना होना

के तुम मेरी जिंदगी हो, के तुम मेरी बंदगी हो….. सारखं शैलेंद्र आणि शंकर जयकिशन ची करामत असलेलं गाणं असलेला तो चित्रपटही खूप गाजला होता. तर

लिखे जो खत तुझे तो तेरी याद में

हजारो रंग के नजारे बन गए

सवेरा जब हुआ तो फूल बन गए

जब रात आयी तो सितारे बन गए हे गाणं तर लोभस नायक, मधुर गायक आणि प्रेक्षणीय सिच्युएशन यांचा त्रिवेणी संगम आहे. केवळ पत्रानेच नि निरोपानेच संपर्क होऊ शकणाऱया काळामध्ये अशी गाणी होतीच पण अगदी फोनचे दिवस सुरू झाल्यानंतरही सलमान भाग्यश्रीच्या मैंने प्यार किया मधलं ‘कबूतर जा जा जा’ तेव्हा तर बॉक्स ऑफिस वर गाजलं होतंच, पण अजूनही त्याची खुमारी तीच आहे. जूहीवर चित्रित झालेलं ‘ना चिट्ठीयाँ ना कोई संदेसा’ हे उदासवाणं भासणारं गाणं हरवलेल्या आणि त्यामुळे दुरावलेल्या प्रियकराची आठवण काढत उसासे टाकणाऱया प्रेयसीची व्यथा सांगतं. पत्र म्हणजे नुसता कागदाचा तुकडा नव्हेच. ती सगळी पत्रं जर का आपणहून बोलू लागली तर बोल आणि सूर यांचं जे वैविध्य आपल्याला अनुभवायला मिळेल तेच या पत्रगीतांतून मांडलेलं असतं. पत्रसृष्टी आणि चित्रसृष्टी यांचं नातं हे असंच अतूट राहणारं असणार आणि ते असाच आनंद आपल्याला मिळवून देणार. पत्रास कारण की….आनंद वाटणे आहे. बाकी काय म्हणायचं?

Related Stories

हनुमंताचा ‘एअर स्ट्राईक’

Patil_p

पुढती परतोनि न पाहे मागें

Patil_p

बा गणराया, गोव्यावरील विघ्ने दूर कर, महाराजा

Patil_p

सकारात्मक दृष्टीने घ्या

Patil_p

कोण्या कर्मे तुज हे दशा

Patil_p

कूटश्लोक

Patil_p
error: Content is protected !!