तरुण भारत

खाण अवलंबित, मच्छीमारांना भेटणार राहुल गांधी

30 रोजीची गोवा भेट निश्चित : समाजाच्या अन्य घटकांशीही साधणार संवाद,युतीबाबत समविचारी पक्षांच्या संपर्कात,काँग्रेसची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

वरिष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल होत असून त्यावेळी ते समाजाच्या विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यात प्रामुख्याने मच्छीमार तसेच खाण अवलंबितांचा समावेश असेल. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे सर्वाधिक जागा लढविल्या जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर होणाऱया राहुल गांधी यांच्या या गोवा भेटीला त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यासपीठावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश समितीचे कार्यकारी अध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. चोडणकर यांनी राहूल गांधी यांच्या गोव्यातील दिवसभराच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. मंगळवारी चोडणकर, सिक्वेरा, लॉरेन्स यांच्यासह अन्य काही वरिष्ठ नेत्यांनी राहूल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन गोव्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना गोवा भेटीचेही निमंत्रण दिले होते. त्यानुसार श्री. गांधी गोव्यात येत असून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर ते दक्षिण गोव्यातील वेळसाव येथील मच्छीमारी लोकांची भेट घेण्यासाठी जातील, असे चोडणकर म्हणाले.

त्यानंतर सायंकाळी 5 वाजता श्री. गांधी बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये आयोजित खाण अवलंबितांच्या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर त्याच सायंकाळी ते दिल्लीसाठी प्रयाण करणार आहेत, असे चोडणकर यांनी सांगितले.

भाजपला हरविणे हे एकच ध्येय

दरम्यान, युतीबाबत विचारले असता, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, मगो, राष्ट्रवादी तसेच रिव्होल्युशनरी गोवन्स, आदी जवळजवळ प्रत्येक विरोधी पक्षाचे नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. सध्या भाजपला हरविणे हे एकच ध्येय असून त्यासाठी समविचारी पक्षांशी युती करण्याच्या दृष्टीने काँग्रेस अंतिम निर्णयापर्यंत आली आहे. त्यासंबंधी लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. मात्र असे असले तरी आतापर्यंत आम्ही कुणाशीही चर्चेसाठी गेलेलो नाही किंवा कोणताही पक्ष आमच्यापर्यंत आलेला नाही, असे सिक्वेरा स्पष्ट केले.

जनता सध्या भाजपच्या कारभाराला कंटाळलेली आहे. त्यामुळे गोव्यात यावेळी बदल निश्चित असून काँग्रेसला पुन्हा संधी मिळेल, असे सिक्वेरा म्हणाले. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ज्या प्रकारे गोव्यातील भाजप सरकारातील भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केला, त्यावरून एवढी वर्षे काँग्रेस जे काही सांगत होती त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ते म्हणाले.

खरे तर मुख्यमंत्र्यांना जरासुद्धा नीतीमत्ता असती तर त्यांनी 24 तासांच्या आत राजीनामा दिला असता. किंवा निदान खुलासा, स्पष्टीकरण तरी केले असते. परंतु दुसऱया दिवसाची सायंकाळ होत आली तरी स्वतः मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षातर्फे कुणीही काहीच बोलले नाही, यावरून मलिक यांच्या आरोपात तथ्य होते हेही स्पष्ट झाले आहे, असा दावा आलेक्स लॉरेन्स यांनी केला.

Related Stories

लॉकडाऊन, कर्फ्यूचा विचार नाहीच

Amit Kulkarni

चंदेरी महोत्सवात मनोरंजन, संस्कृतीचे प्रदर्शन

Omkar B

अंगणवाडी शिक्षिका लता गावकर यांच्या बदलीच्या निषेधार्थ वाळपईत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

Omkar B

गोव्याचे हित जपण्यात व समस्या सोडविण्यात मुख्यमंत्री अपयशी

Patil_p

माजी सभापती, मंत्री शेख हसन यांचे निधन

Omkar B

निवडणूक वर्षाचे गोव्यात जोरदार स्वागत

Amit Kulkarni
error: Content is protected !!