तरुण भारत

इंग्लंडसमोर ‘सेमीफायनल’चे टार्गेट

झगडणाऱया लंकेसमोर मात्र अस्तित्व कायम राखण्याचे आव्हान

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

यंदा तुफानी बहरात असलेला इंग्लंडचा संघ आज (सोमवार दि. 1) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीत झगडणाऱया श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचे मुख्य लक्ष्य असेल. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखल्या गेलेल्या इंग्लंडने आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यात साजेसा खेळ साकारला असून लंकेविरुद्ध देखील तोच धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आजची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ या स्पर्धेत उत्तम बहरात राहिला असून त्यांनी पहिल्या सामन्यात विंडीजचा 6 गडी राखून, दुसऱया सामन्यात बांगलादेशचा 8 गडी राखून तर तिसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाचाही 8 गडी राखून फडशा पाडला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील लढतीत जोस बटलरच्या धडाकेबाज खेळाने सामन्याचा सर्व नूर पालटला आणि आता बाद फेरी समीप येत असताना बटलरचा फॉर्म  इंग्लंडसाठी बलस्थान असेल. इंग्लंडने पहिले तिन्ही सामने धडाक्यात जिंकले असले तरी त्यांच्या मध्यफळीची अद्याप पारख झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. मॉर्गनला मात्र ज्यावेळी वेळ येईल, त्यावेळी मधल्या फळीतील फलंदाज समयोचित योगदान देतील, असा विश्वास वाटतो.

ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच फिरकी गोलंदाजीविरुद्ध झगडतो, हे ताडत मॉर्गनने मोईन अलीऐवजी अदिल रशिदकडे नवा चेंडू सोपवला आणि नंतर मोईनला अगदी गोलंदाजीही करावी लागली नव्हती. मध्यमगती गोलंदाज ख्रिस वोक्सनेही नव्या चेंडूवर उत्तम मारा केला आणि ख्रिस वोक्सने तिहेरी धक्के दिले. डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट मिल्स महागडा ठरला असला तरी ठरावीक अंतराने बळी घेण्यात त्याला यश लाभले. पार्टटाईम फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोनने देखील समयोचित योगदान दिले आहे.

श्रीलंकेसमोर तगडे आव्हान

तुलनेने बरेच अननुभवी खेळाडू समाविष्ट असलेल्या लंकन संघाला इंग्लंडला पराभूत करण्यासाठी विशेष खेळ साकारणे क्रमप्राप्त असेल. लंकेने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने गमावले असून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना आज कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे भागच असेल. चरिथ असलंका व पथूम निसांका उत्तम बहरात असून या दोघांवरच त्यांची मुख्य भिस्त असणार आहे. 

प्रतिस्पर्धी संघ

इंग्लंड ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, टॉम करण, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, मिल्स, अदिल रशिद, जेसॉन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

श्रीलंका ः दसून शनाका (कर्णधार), कुशल जनिथ परेरा, दिनेश चंडिमल, धनंजया डीसिल्वा, पथूम निसांका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, चमिका करुणारत्ने, वणिंदू हसरंगा, दुष्मंता चमीरा, लहिरु कुमारा, महिशा तिक्षणा, अकिला धनंजया, बिनुरा फर्नांडो.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

Related Stories

विश्व करंडक फुटबॉल पात्र फेरीचे सामने लांबणीवर

Patil_p

लक्ष्य सेन पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

कोंटावेट-फेरो यांच्यात अंतिम लढत

Patil_p

फलंदाज प्रशिक्षकासाठी विक्रम राठोड पुन्हा रिंगणात

Patil_p

हार्दिक पांडय़ाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

ऍशेस मालिकेतील कसोटी केंद्रामध्ये बदल

Patil_p
error: Content is protected !!