तरुण भारत

मुले पळविणाऱया टोळीमुळे भीतीचे वातावरण

पालक-लहान मुलांनी अनोळखीपासून सतर्क राहून सावधानता बाळगण्याची गरज

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

Advertisements

ऐन दिवाळी व सुगी हंगामामध्ये ग्रामीण भागात लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्यामुळे पालकवर्गातून भीतीचे वातावरण पसरले असले तरी खुद्द पालकांनी व लहान मुलांनीही अनोळखीपासून सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी कंग्राळी बुद्रुक येथील मरगाईनगर परिसरात दुपारी 1 वाजता एका पांढऱया रंगाच्या मारुती व्हॅनमधून मुले पळविणारी टोळी सक्रिय झाली होती. यावेळी दोन मुलींना पळविण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. परंतु पुन्हा ही टोळी सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. शेजारील महिलेने आरडाओरड केल्यामुळे मुलींना पळविण्याचा सदर तरुणांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी तेथून व्हॅनसह पलायन केले.

ती महिला आली नसती तर…

दुपारी मुलींना गाडीमध्ये ओढून नेताना जर ती महिला घराबाहेर आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु प्रत्येक ठिकाणी असा प्रसंग होत नाही. यामुळे नागरिकांनी व लहान मुलांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

लहान मुलांची फसगत होऊ शकते

कंग्राळी बुद्रुकमध्ये बुधवारी घडलेली घटना शहरी किंवा तालुक्यातील इतर गावांमध्येसुद्धा घडू शकते. यासाठी एखाद्या वेळेस एखाद्या अनोळखीने लहान मुलांना लगट दाखविली किंवा चॉकलेट देणे किंवा तुमच्या आई-वडिलांचा अपघात झाला आहे, तुझ्या भावाचा अपघात झाला आहे, अपघातस्थळी जाऊया व्हॅनमध्ये बस, असेही या टोळीकडून सांगण्यात येते. अशा धक्कादायक बातम्या ऐकून लहान मुले व्हॅनमध्ये बसून फसू शकतात.

सुगी हंगामामुळे फसगत होऊ शकते

सध्या ग्रामीण भागात सुगी असल्यामुळे तसेच शाळांनासुद्धा दिवाळीची सुटी असल्यामुळे पालक सुगीच्या हंगामामध्ये व्यस्त असतात. यामुळे लहान मुले इकडे तिकडे भटकत असतात. हे सुद्धा घातकच असते. यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. अनर्थ घडल्यावर गोंधळ घालण्यापेक्षा अनर्थ घडण्यापूर्वी सावधानता बाळगली तर अशा घटनांना पायबंद घालता येऊ शकतो.

पोलिसांची गस्त वाढवावी

मुले पळविणारी टोळी दिवसाढवळय़ा ग्रामीण भागात सक्रिय झाल्याने पोलिसांनी आता गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. असे प्रकार वाढीस लागल्याने एका पोलिसाचीच नेमणूक गावात करावी, अशी मागणी होत आहे. याबरोबरच बुधवारी कंग्राळी बुद्रुकमध्ये आलेल्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कांबळे कुटुंबीयांकडून होत आहे.

Related Stories

गोकाक फॉल्ससाठी विशेष बससेवा

Amit Kulkarni

मार्कंडेय युवक संघ-व्यायाम मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात

Omkar B

स्मार्ट सिटीची कामे तातडीने मार्गी लावा

tarunbharat

कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्यावर भर द्या

Patil_p

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने अनोळखीचा मृत्यू

Rohan_P

आज ठरणार बार असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!