तरुण भारत

व्यापार परवाना शुल्कावर बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही

कुडचडेच्या नगराध्यक्षांकडून चुकीची माहिती

प्रतिनिधी/ कुडचडे

Advertisements

कुडचडे-काकोडा पालिका मंडळाची नुकतीच बैठक झाली असता त्यात मुख्य विषय व्यापार परवान्यासाठी आकारायच्या शुल्कासंदर्भात होता. कारण याअगोदरच्या बैठकीत मंडळातर्फे कुडचडे बाजारात जे लोक विनापरवाना व्यवसाय करत आहेत त्यांना तात्पुरता परवाना द्यावा व त्यासाठी वर्षाकाठी पाच हजार रु. आकारावेत, असा निर्णय घेण्यात आला होता. सदर विषय परत एकदा या मासिक बैठकीत घेण्यात आला व व्यापार परवान्यासाठी पाच हजारांच्या ऐवजी दहा हजार रु. आकारावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यास पंधरा सदस्यांपैकी सहा सदस्यांनी हरकत घेतली, अशी माहिती नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

यात स्वतः आपण तसेच सुशांत नाईक, क्लेमेंटिना फर्नांडिस, मंगलदास घाडी, प्रदीप नाईक, अपर्णा प्रभुदेसाई यांनी विरोध केला व पाच हजारच आकारावेत असे मत मांडले. त्यामुळे या विषयावर अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. तरी असता बैठकीतील निर्णयासंदर्भात नगराध्यक्ष विश्वास सावंत यांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिलेली आहे. याविषयी खरी माहिती सर्वांसमोर यावी या हेतूने ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे, असे होडारकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक प्रदीप नाईक व मंगलदास घाडी उपस्थित होते.

सध्या सर्वत्र महामारीचा फटका व्यापाऱयांना बसलेला आहे. त्यात व्यापार परवान्याचे शुल्क वाढविल्यामुळे मार्केट असोसिएशन आपल्याला भेटले होते. त्यानुसार आम्ही सहा जणांनी शुल्क वाढविण्यास विरोध दर्शविला आणि आताही करत आहोत. ज्या प्रकारे पालिका सदर व्यापाऱयांना बेकायदेशीर म्हणते ते चुकीचे असून आम्ही त्या व्यापाऱयांना बेकायदेशीर म्हणत नाही. पण नगराध्यक्षांना सदर व्यापारी बेकायदेशीर वाटत असतील, तर पालिकेने त्यांना त्या जागेवरून हटवावे. अन्यथा सदर व्यापाऱयांना बेकायदेशीर म्हणू नये. सध्या नगराध्यक्ष कोणत्या कारणामुळे गडबडलेले आहेत हे समजणे कठीण होत आहे व मन मानेल तसे ते बोलत आहेत, अशी टीका होडारकर यांनी केली.

पालिकेच्या नवीन इमारतीवरून सवाल

सदर बैठकीत पालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा प्रश्न आला तेव्हा नगराध्यक्षांनी सांगितले की, सदर जागेत जो बेकायदेशीर गाडेवाला होता तो न्यायालयात गेलेला आहे. त्याचदिवशी या प्रकरणी अखेरची सुनावणी होणार व लवकरच इमारतीचे वीजजोडणीचे काम सुरू करण्यात येणार, असे त्यांनी सांगितले. पण त्यांना आपण एकच विचारू इच्छितो की, या प्रकरणी निकाल पालिकेच्या बाजूने होणार हे आधीच नगराध्यक्षांना कसे कळले. तसेच जर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिला व गाडेवाला उच्च न्यायालयात गेला, तर इमारतीच्या उद्घाटनाचे काय होणार. या प्रश्नाचे उत्तर नगराध्यक्ष सावंत यांनी जनतेला द्यावे, असे होडारकर पुढे म्हणाले.

वीजजोडणीचा प्रश्न सोडविण्यात अपयश

सदर इमारतीचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असे पालिका बैठकीत सांगण्यात आले होते. पण त्यानंतर दोन महिने उलटले, तरी वीजजोडणीशी संबंधित विषय सोडविण्यात कुडचडेचे आमदार व वीजमंत्री नीलेश काब्राल अपयशी ठरले आहेत. जर वीजमंत्री खरेच हुशार असते, तर पूर्ण झालेली इमारत एका ट्रान्सफॉर्मरसाठी उद्घाटनाविना ठेवली नसती. हरित गोवा करणार असे म्हणणाऱया या मंत्र्यांना ज्या वेळेस इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते तेव्हाच सोलर पॅनल बसविण्याची विनंती आपण केली होती. त्यावेळी आपण स्वतः नगराध्यक्ष होतो. त्यात तेव्हाच लक्ष घातले असते, तर एव्हाना पालिका इमारतीचे उद्घाटन झाले असते, असा टोला होडारकर यांनी हाणला.

बहुतेक व्यापाऱयांनी सहय़ा केल्या असल्यास दाखवा

कुडचडे पालिकेच्या जुन्या बाजार संकुलाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱयांना बरेच त्रास सहन करावे लागत आहेत. तरीही अजून ठोस निर्णय पुढे येत नाही. नगराध्यक्ष सांगतात की, बहुतेक व्यापाऱयांनी करारावर सहय़ा केलेल्या आहेत व राहिलेले लवकरच करणार. जर काही जणच सहय़ा करायचे बाकी राहिलेले असतील, तर त्यांनी त्याचा पुरावा दाखवावा, असे आव्हान होडारकर यांनी यावेळी दिले. कारण ज्या वेळेस इमारत मोडण्याचा विषय आला त्यावेळी आमदारांनी सांगितले होते की, नवीन इमारत तयार होणार तेव्हा पन्नास टक्के भाडे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळवून देणार. पण करारात सदर पन्नास टक्के भाडे देण्याचे साबांखाने मान्य केल्यास ते देण्यात येणार असे कलम टाकण्यात आलेले आहे. म्हणून बऱयाच जणांनी या करारावर सहय़ा केल्या नसल्याचे व्यापाऱयांनी सांगितलेले आहे, असे होडारकर यांनी सांगितले.

Related Stories

कोविड हॉस्पिटलातून निगेटिव्ह झालेला रूग्ण पुन्हा पॉझिटिव्ह

Omkar B

कोरोना : 11 बळी, 303 नवे बाधित

Amit Kulkarni

करमल घाटात ट्रक मातीत रूतून बंद पडला : 5 तास वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

कुडचडेत सर्वेक्षणास चांगला प्रतिसाद

Omkar B

जनता भाजपला 13 वरुन शून्यावर आणल्याशिवाय राहणार नाही

Amit Kulkarni

बोरी अपघातात तिघे वीज कर्मचारी ठार

Patil_p
error: Content is protected !!