तरुण भारत

पराभव अफगाणचा, हार भारताची!

विराटसेनेचे आव्हान संपुष्टात, अफगाणला 8 गडी राखून नमवत न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक

अबु धाबी / वृत्तसंस्था

Advertisements

पाकिस्तान-न्यूझीलंडविरुद्ध पत्करलेल्या पराभवामुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेट संघाची शेवटची उरलीसुरली आशाअपेक्षाही रविवारी संपुष्टात आली आणि आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील गाशा संघाला गुंडाळावा लागला. या स्पर्धेत अफगाणने न्यूझीलंडला नमवले तर भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात न्यूझीलंडने असा कोणताही चमत्कार घडणार नाही, याची काटेकोर दक्षता एकतर्फी विजय संपादन केला आणि इथेच भारताच्या आशाअपेक्षा संपुष्टात आल्या.

या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. रविवारच्या लढतीत अफगाणने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 124 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात किवीज संघाने केवळ दोनच गडय़ांच्या बदल्यात 18.1 षटकात सहज विजय संपादन केला.

रविवारी विजयासाठी न्यूझीलंडचा संघ प्रबळ दावेदार होता आणि प्रत्यक्ष लढतीत देखील यापेक्षा काहीही वेगळे चित्र दिसले नाही. विजयासाठी तुलनेने किरकोळ असे 125 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 18.1 षटकात पार केले आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्यानंतर उपांत्य फेरीतील चौथे व शेवटचे स्थान निश्चित केले. या निकालामुळे भारत-नामिबिया यांच्यात आज (सोमवार दि. 8) होणारी लढत औपचारिक असेल, हे देखील स्पष्ट झाले.

सुपर-12 फेरीत 5 पैकी 4 सामने जिंकणाऱया केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडची उपांत्य फेरीतील लढत इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होण्याची शक्यता आहे.

विजयासाठी 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर डॅरेल मिशेल (17) मुजीब रहमानच्या गोलंदाजीवर यष्टीमागे शहझादकडे झेल देत परतला तर मार्टिन गप्टील (28) फिरकीपटू रशिद खानचा टी-20 क्रिकेटमधील 400 वा बळी ठरला. मात्र, त्यानंतर अफगाणला एकही यश मिळाले नाही. विल्यम्सन (42 चेंडूत 3 चौकारांसह 40), डेव्हॉन कॉनव्हे (नाबाद 36) यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य भागीदारी साकारत संघाला सहज विजय संपादन करुन दिला. रशिद, मुजीब, नबी यांनी उत्तम मारा केला असला तरी त्यांना कोणतेही नाटय़ साकारता आले नाही.

झॅद्रनची 73 धावांची खेळी

तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या जलद गोलंदाजांनी ठरावीक अंतराने गडी बाद करत अफगाणला 20 षटकात 8 बाद 124 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले. अफगाणतर्फे नजिबुल्लाह झॅद्रनने 48 चेंडूत 73 धावांची जोरदार आतषबाजी केली. मात्र, त्याला सहकाऱयांकडून यथोचित साथ लाभली नाही. त्याच्या शानदार खेळीत 6 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. ट्रेंट बोल्टने 17 धावात 3 बळी घेतले तर टीम साऊदी (2-24), ऍडम मिल्ने (1-17) यांनी भेदक मारा साकारला. ईश सोधी (1-13), जिम्मी नीशम (1-24) यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला. नीशमने अफगाणच्या डावातील शेवटच्या षटकात केवळ दोनच धावा दिल्या. डावखुऱया झॅद्रनने कर्णधार नबीसमवेत (14) पाचव्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारी साकारली. या दोघांची भागीदारी साकारली जाण्यापूर्वी एकवेळ अफगाणचा संघ 10 षटकात 4 बाद 56 अशा बिकट स्थितीत होता.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान ः 20 षटकात 8 बाद 124 (नजिबुल्लाह झॅद्रन 48 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 73, गुलाबदिन नईब 15, नबी 14. ट्रेंट बोल्ट 3-17, टीम साऊदी 2-24, मिल्ने, नीशम, सोधी प्रत्येकी 1 बळी).

न्यूझीलंड ः 18.1 षटकात 2 बाद 125 (केन विल्यम्सन 42 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 40, डेव्हॉन कॉनव्हे 32 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 36, मार्टिन गप्टील 23 चेंडूत 4 चौकारांसह 28. रशीद 1-27, मुजीब 1-31).

अखेर भारताला ते दोन पराभवच नडले!

यंदा टी-20 विश्वचषकात स्कॉटलंड, नामिबिया या दुबळय़ा संघांविरुद्ध सफाईदार विजय नोंदवणाऱया भारतीय संघाला पहिल्या टप्प्यात मात्र पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून अतिशय नामुष्कीजनक पराभव पत्करावे लागले होते आणि रविवारी न्यूझीलंडने अफगाणचा फडशा पाडत उपांत्य फेरीतील चौथे व शेवटचे स्थान संपादन केले, त्यावेळी भारताला त्या दोन पराभवांमुळेच मोठी किंमत मोजावी लागली असल्याचे स्पष्ट झाले. त्या दोन पराभवांमुळेच भारताचे स्पर्धेतील आव्हान रविवारी संपुष्टात आले.

 रशिद खानचे टी-20 क्रिकेटमध्ये 400 बळी

अफगाणिस्तानचा अव्वल फिरकी गोलंदाज रशिद खानने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलला त्रिफळाचीत करत व्यावसायिक टी-20 क्रिकेटमधील 400 बळींचा माईलस्टोन सर केला. शेख झाएद स्टेडियमवर झालेल्या लढतीत गप्टील स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात सपशेल फसला. रशिदने 289 व्या टी-20 सामना हा टप्पा गाठला. टी-20 मध्ये असा पराक्रम करणारा तो चौथा गोलंदाज आहे. डेव्हॉन ब्रेव्हो, इम्रान ताहीर व सुनील नरेन यांनीही असा पराक्रम यापूर्वी गाजवला आहे.

Related Stories

आयसीसी प्रमुख बाक यांचा जपान दौरा रद्द

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा 62 धावांत धुव्वा, बांगलादेशची एकतर्फी मात

Amit Kulkarni

कसोटी मालिका विजयासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज

Omkar B

फॉलोऑननंतर पाकिस्तानची सावध सुरुवात

Patil_p

इंटर मिलान उपांत्यफेरीत

Patil_p

आयपीएल : फायनल मुंबईत होणार

prashant_c
error: Content is protected !!