तरुण भारत

कराड तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी पवारांना विनंती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

कराड तालुक्यातील उंडाळकर व पाटील ही दोन घराणी खूप दिवसांपासून राजकारण, समाजकारण व सहकारात काम करत आहेत. या दोन्ही घराण्यातील नेत्यांत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कराड सोसायटी गटातील निवडणुकीमुळे होणारा संघर्ष टळावा, अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांना मार्ग काढण्याबाबत विनंती केली आहे. बँक निवडणुकीचे अर्ज मागे घेण्यासाठी अजून दोन, तीन दिवस अवधी आहे. माझ्या प्रयत्नांना यश येते की अपयश हे पाहण्यासाठी थोडी वाट बघू, असे सूतोवाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

प्रथेप्रमाणे पत्रकारांसमवेत दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या निवासस्थानी केले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीबाबत भाष्य केले.

राज्यातील भाजप सत्तेत असताना पाच वर्षांचा कारभार अनुभवल्यानंतर ज्या स्पिरीटने महाविकास आघाडी निर्माण झाली, त्या स्पिरीटमुळे राज्यात भाजप सत्तेबाहेर राहिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये संघर्ष होऊ नये, अशी आपली भावना आहे. त्यामुळेच जिल्हा बँक निवडणुकीबाबत शरद पवारांना भेटलो होतो. कराड सोसायटी गटातील लढत टळावी, संघर्ष टळावा, यासाठी मार्ग काढण्याची त्यांना विनंती केली आहे. जिल्हा बँकेचा इतिहास पाहता बँकेवर आतापर्यंत जे जुने कार्यकर्ते काम करत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला, त्याच प्रवर्गातून पुन्हा संधी देण्यात आली. दिवगंत लक्ष्मणतात्या पाटील, दिवंगत अभयसिंहराजे भोसले ही त्याची उदाहरणे आहेत. दिवंगत विलासकाका यांनी बँकेचे संचालक म्हणून 54 वर्षे काम पाहिले. त्यांचा आणि आमचा राजकीय संघर्ष होता. मात्र ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या शिस्तीने व नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची प्रगती झाली. राज्यातील अन्य जिल्हा बँकांची काय परिस्थिती आहे? त्यामुळेच शरद पवारांना भेटून कराड सोसायटी गटातील संघर्ष टाळण्यासाठी विनंती केली आहे. तोडगा काढण्यात अपयश आले असे म्हणता येणार नाही, अजूनही अर्ज माघारीस अवधी आहे. काय होते ते बघू, असे चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जिल्हा बँकेत जास्त जागा मागण्याची मानसिकता होती. परंतु जिथे ताकद आहे, त्या मागितल्या पाहिजेत. कराडमध्ये काँग्रेसची ताकद आहे. कराड तालुक्यातील उंडाळकर व पाटील ही दोन्ही घराणी खूप दिवसांपासून काम करत आहेत. त्यामुळे येथील संघर्ष टळावा, अशी आपली भावना आहे, असे ते म्हणाले.

नगरपालिका निवडणुका डिसेंबर-जानेवारीत होण्याची शक्यता असून त्या ओबीसी आरक्षणासह होतील. कराडमध्ये पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. जिल्हय़ातील निवडणुकांबाबत चाचपणी करण्यासाठी प्रत्येक पालिकेसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पालिकेबाबत त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. कराड पालिकेच्या पाच वर्षातील कारभाराबाबत निवडणुकीतच बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

जिल्ह्यात आणखी नवे १५ रुग्ण

Abhijeet Shinde

शिवाजी सोसायटीच्या उद्यानात सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन

Amit Kulkarni

नऊशे बोटींचा ताफा पर्यटकांविना पाण्यातच उभा

Abhijeet Shinde

आई अंबाबाई महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी ताकद दे ; किरीट सोमय्यांचे अंबाबाईला साकडे

Abhijeet Shinde

नवोदित मल्लांनी महाराष्ट्राचे नाव देशाबाहेरही उज्वल करावे – राहुल आवारे

Abhijeet Shinde

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका: पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!