तरुण भारत

29 नोव्हेंबरला संसदेवर ट्रक्टर मोर्चा

राकेश टिकैत यांची घोषणा – युपी सीमेवरील आंदोलनस्थळी केले मार्गदर्शन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षभरात केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱयांच्या मागण्यांबाबत ठोस पावले उचलली नसल्याने आता शेतकरी संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आता या मुद्दय़ावर शेतकऱयांची भूमिका स्पष्ट केली असून केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेतकरी 29 नोव्हेंबरला संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च काढून सरकारला जागे करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱयांसह विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. 29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्मयता आहे. त्याच अनुषंगाने संसदेपर्यंत टॅक्टर मार्च काढण्याची तयारी शेतकरी संघटनांनी केली आहे.

मागील वर्षभरात केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याबाबत ठोस पावले उचलली नसल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहेत. शेतकरी आंदोलनाला वर्ष पूर्ण होत असताना ते अधिक तीव्र करण्याचा इरादा आता स्पष्ट झाला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास यावेळी शेतकरी चारही बाजूंनी ट्रक्टर घेऊन दिल्लीला घेराव घालतील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. शुक्रवारी राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सीमेवर निदर्शने करणाऱया शेतकऱयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून शेतकरी खेडय़ापाडय़ातून दिल्लीच्या आसपासच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होऊ लागतील. यावेळी भक्कम तटबंदी करण्यात येणार असून आंदोलनाच्या ठिकाणी तंबू उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर 29 नोव्हेंबरला ट्रक्टर मोर्चाद्वारे संसदेवर धडक देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या 3 नवीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली सीमेला लागून असलेल्या हरियाणाच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी धरणे आंदोलन करत आहेत. शेतकऱयांना दिल्लीत घुसू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी 11 महिन्यांपूर्वी त्यांना सीमेवर रोखले होते. तेव्हापासून शेतकरी येथे तळ ठोकून आहेत. सुरुवातीला दोन्ही सीमेवर फक्त बॅरिकेड्स लावण्यात आले होते. 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर, टिकरी आणि सिंघू सीमेवर मोठय़ा प्रमाणात काँक्रीट ब्लॉक टाकण्यात आले होते.

शेतकऱयांविरोधात षड्यंत्र

शेतकऱयांविरोधात सरकार षड्यंत्र रचत आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेतकऱयांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तसेच बदनामीही केली जात आहे. शेतकऱयांना सुरुवातीला खलिस्तानी, नंतर पाकिस्तानी, त्यानंतर या चळवळीला चीनकडून आर्थिक मदत पुरविली जात असल्याचा आरोप केला गेला. त्याशिवाय शेतकऱयांना काहींनी ‘मवाली’ असे संबोधल्याचेही टिकैत म्हणाले.

जबाबदारी घ्या, आंदोलन यशस्वी करा!

26 नोव्हेंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याच्या दिशेने पाऊल उचलताना संपूर्ण आंदोलनाची रुपरेषा पुन्हा एकदा आंदोलकांना वाचून दाखविली जाणार आहे. त्यानंतर आंदोलक दिल्लीच्या दिशेने निघतील. यादरम्यान निदर्शनात सहभागी होण्यासाठी येणाऱया शेतकऱयांनी स्वतःची व्यवस्था करावी. ब्लॅकेट, कपडे आणावेत, स्वतःच्या तंबूची व्यवस्था करावी, असे ते म्हणाले. तसेच आंदोलनासंबंधीची माहिती  फेसबुक, ट्विटर, कू आदी सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. आता आंदोलनात सहभागी लोकांना वेगवेगळय़ा जबाबदाऱया पार पाडाव्या लागतील. पाणी, दूध, लंगर, भंडाराची जबाबदारी निश्चित करावी लागेल. तसेच चोरी-मारी करणाऱयांवरही नजर ठेवावी लागेल. आंदोलनाची बदनामी करण्यासाठी काही उपद्व्यापी लोक बेकायदा शस्त्रे ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरही वॉच ठेवण्याची गरज असल्याचे सांगत संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन टिकैत यांनी केले.

Related Stories

अर्थव्यवस्थेचा समतोल साधण्याची कसरत

Patil_p

दोन सप्ताहांमध्ये लसीकरणाला प्रारंभ

Patil_p

कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा; भाजप खासदाराची मागणी

Rohan_P

घाबरू नका, मात्र काळजी घ्या

tarunbharat

महागाईचा भडका : सलग तिसऱ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

Rohan_P

सिरमने जाहीर केली कोरोनावरील लसीची किंमत; बनवणार 10 कोटी डोस

datta jadhav
error: Content is protected !!