तरुण भारत

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व

रोहित, बुमराह, शमी, पंतला विश्रांती, विराट दुसऱया कसोटीत परतणार, हनुमा विहारी संघातून बाहेर, श्रेयस अय्यरचे पुनरागमन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली गेली आहे. तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणाऱया रोहित शर्मा, यष्टीरक्षक रिषभ पंत, जलद गोलंदाज जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांना या कसोटी मालिकेतून पूर्ण व़िश्रांती देण्यात आली. कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नाही. तो दुसऱया सामन्यासाठी संघात दाखल होईल. बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंटनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात या मालिकेत 2 कसोटी सामने खेळवले जाणार असून यातील पहिली कसोटी कानपूर (25 ते 29 नोव्हेंबर) व मुंबई (3 ते 7 डिसेंबर) येथे आयोजित केली गेली आहे. विराट कोहली दुसऱया कसोटी सामन्यात संघात परतेल आणि त्यावेळी त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा असेल, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नमूद केले.

मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर व ऑफस्पिनर जयंत यादव यांचे यावेळी कसोटी संघात पुनरागमन होणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी उभय संघात दि. 17 नोव्हेंबरपासून 3 टी-20 सामने होतील. यातील पहिली टी-20 जयपूरमध्ये खेळवली जाईल. विराट कोहली या टी-20 मालिकेत खेळणार नाही.

कसोटीसाठी जाहीर केल्या गेलेल्या 16 सदस्यीय कसोटी संघातून हनुमा विहारीला डच्चू दिला जाणे आश्चर्याचे ठरले. यापूर्वी भारतीय संघात 17 सदस्यांचा समावेश होता. विहारीला दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणाऱया भारत अ संघातून संधी दिली गेली असून तेथे उत्तम योगदान दिल्यास त्याचा मुख्य संघात समावेश केला जाईल, असे संकेत आहेत. विहारीला अ संघातर्फे 3 सामने खेळण्याची संधी मिळेल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात डिसेंबरमधील शेवटच्या आठवडय़ात मालिकेला सुरुवात होत आहे.

विहारीचा सध्याचा फॉर्म पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्राने नमूद केले. विहारीने वर्विकशायर या कौंटी संघातर्फे खेळताना मागील 6 डावात 32, 52, 8, 0, 24 व नाबाद 43 धावा जमवल्या. त्यानंतर अलीकडेच सईद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत 4 डावातील त्याचे योगदान 26, 7, 57 व 4 धावा असे राहिले. विहारीचा बचावात्मक पवित्रा हंगामी उपकर्णधार चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्याप्रमाणेच राहिला असून ते अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरतात.

दुसऱया नव्या चेंडूवर उत्तम काऊंटर ऍटॅक करु शकण्याची क्षमता असल्याने श्रेयस अय्यरची निवड केली असल्याचे संकेत आहेत. मयांक अगरवालबाबतही हीच बाब थोडय़ाफार फरकाने लागू होते आणि याचमुळे त्यालाही मध्यफळीत खेळवले जात आहे. योगायोगाने केएल राहुल, मयांक अगरवाल व शुभमन गिल या तिन्ही सलामीवीरांच्या कारकिर्दीची सुरुवात जवळपास एकाच वेळी झाली असून ते कसोटी क्रिकेट व प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मध्यफळीत फलंदाजीचाही त्यांना अनुभव आहे. संभाव्य संघात समावेश असला तरी अंतिम एकादशमधील मध्यफळीतील जागेसाठी अय्यरच्या तुलनेत अगरवालला प्रथम पसंती दिली जाऊ शकते.

वृद्धिमान साहाचे स्थान निश्चित

37 वर्षीय वृद्धिमान साहा कसोटी संघातील सर्वात वयस्कर खेळाडू असून ग्रीन पार्क व वानखेडेवरील दोन्ही लढतीत त्याला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा प्रथम पसंतीचे फिरकीपटू असतील. इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिका गाजवणाऱया अक्षर पटेलला देखील उत्तम संधी असणार आहे. ऑफ स्पिनर व मध्यफळीत उत्तम फलंदाजी करु शकणारा जयंत यादव हा अश्विनसाठी पर्यायी खेळाडू असेल. जलग गोलंदाजीची धुरा इशांत शर्मा, उमेश यादव यांच्यावर असेल तर मोहम्मद सिराज तिसरा पर्याय असणार आहे. या संघात चौथा पेसर म्हणून प्रसिद्ध कृष्णाही समाविष्ट असून यष्टीरक्षक केएस भरतला प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण योगदानामुळे कसोटी संघात स्थान दिले गेले आहे.

भारतीय कसोटी संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Related Stories

रूमानियाचे तीन वेटलिफ्टर्स अपात्र

Patil_p

पंजाबची घोडदौड आज राजस्थान रॉयल्स रोखणार?

Patil_p

भारताचे आणखी दोन नेमबाज कोरोना बाधित

Patil_p

भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे संमिश्र यश

Patil_p

विल्यम्सनला काही सामने हुकण्याची शक्यता

Amit Kulkarni

तजिंदर पाल सिंग तूरची शानदार कामगिरी

Patil_p
error: Content is protected !!