तरुण भारत

ऑस्ट्रेलिया की न्यूझीलंड? फैसला आज!

आयसीसी टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी आज दुबईत रंगणार फायनल, विश्वचषक स्पर्धेत यंदा लाभणार नवा विश्वविजेता

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

2007 पासून आजवर एकही टी-20 विश्वचषक जिंकता न आलेले ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे संघ आज (रविवार दि. 14) येथील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आयसीसी टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी निर्णायक फायनलमध्ये आमनेसामने भिडणार असून या स्पर्धेत आज नवा चॅम्पियन लाभणार आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडाकेबाज विजय संपादन करत फायनलमधील स्थान निश्चित केले असून यामुळे आजची लढत विशेष रंगतदार, संघर्षपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.

ऑस्ट्रेलियाने 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये आजवर पाचवेळा विश्वचषक जिंकला आहे. पण, टी-20 मध्ये त्यांना जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. आज ते ही उरलीसुरली कसर भरुन काढणार का, याचे औत्सुक्य असेल. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण योगदान देत आला असून तीच घोडदौड आजही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

न्यूझीलंडने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि त्यांनी येथे जेतेपद संपादन केले तर अवघ्या 50 लाख लोकसंख्येच्या या देशासाठी हा मोठा पराक्रम असेल. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध बऱयापैकी सातत्य गाजवले असले तरी 2016 मध्ये भारतात संपन्न झालेल्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा पराक्रम नोंदवला होता. तीच मालिका येथे कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

आजची फायनल पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या चाहत्यांना ‘बॉडी क्लॉक’विरुद्ध रहावे लागेल. कारण, या दोन्ही देशांच्या प्रमाणवेळेनुसार, ही लढत मध्यरात्रीनंतर होणारी असेल. न्यूझीलंडचा संघ साखळी फेरीत गोलंदाजीच्या निकषावर अतिशय भक्कम असल्याचे दिसून आले असून उपांत्य फेरीत त्यांनी फलंदाजीतील ताकद देखील दाखवून दिली आहे.

गप्टील-मिशेलचा फॉर्म महत्त्वाचा

मार्टिन गप्टील ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच आक्रमक खेळतो आणि त्याचा सहकारी सलामीवीर डॅरेल मिशेलसाठी आजची ही लढत कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची असेल. कर्णधार केन विल्यम्सन अद्याप मोठी खेळी साकारु शकलेला नाही. त्याने ती कसर आज भरुन काढण्याची न्यूझीलंडला अपेक्षा असेल. जिम्मी नीशमने इंग्लंडविरुद्ध मध्यफळीत आपली उपयुक्तता दाखवून दिली. पण, या संघाला डेव्हॉन कॉनव्हेची उणीव प्रकर्षाने जाणवू शकते. टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांच्यासमोर वॉर्नर-फिंच या धोकादायक जोडीला रोखण्याचे तगडे आव्हान असेल. मधल्या षटकात ऍडम मिल्ने व सोधी देखील महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाची फिंच-वॉर्नरवर मुख्य भिस्त

फिंच व वॉर्नर ही ऑस्ट्रेलियाची जोडी आज बहरली तर त्यांना रोखणे आव्हानात्मक ठरु शकते. फिंच शाहिन आफ्रिदीच्या इनस्विंगरवर फसला असला तरी येथे तो अधिक दक्ष असू शकतो. वॉर्नर-फिंचनंतर मॅक्सवेल व स्टीव्ह स्मिथकडून ऑस्ट्रेलियाला बऱयाच अपेक्षा असतील. मार्कस स्टोईनिस व मॅथ्यू वेड यांनी पाकिस्तानविरुद्ध झुंजार विजय मिळवून दिला होता. येथेही संधी मिळाल्यास प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणण्याचा त्यांचा निर्धार असेल.

या स्पर्धेत आतापर्यंत 12 बळी घेणारा लेगस्पिनर झाम्पा देखील महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. मॅक्सवेलची त्याला फिरकीत उत्तम साथ मिळू शकते. मिशेल स्टार्क, कमिन्स व हॅझलवूड या त्रिकुटामुळे जलद गोलंदाजीही भक्कम असणार आहे.

बॉक्स

टीम न्यूज

ऑस्ट्रेलियन संघात बदलाचे संकेत नाहीत

या स्पर्धेतील उपांत्य लढतीत जो धडाकेबाज विजय संपादन केला, तो पाहता ऑस्ट्रेलियन संघात एकही बदल आवश्यक नाही. ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श व मार्कस स्टोईनिस पाचव्या गोलंदाजाची जागा समर्थपणे भरुन काढू शकतात आणि सातव्या स्थानी मॅथ्यू वेडसारखा दिग्गज फलंदाज उपलब्ध असल्याने ऑस्ट्रेलियाची फलंदाजी लाईनअप आणखी सखोल झाली आहे.

न्यूझीलंड संघात किमान एक बदल करावाच लागेल

यष्टीरक्षक-फलंदाज डेव्हॉन कॉनव्हे दुखापतीमुळे या अंतिम लढतीत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे न्यूझीलंडला येथील निर्णायक लढतीत हा किमान एक बदल करावाच लागेल. कॉनव्हेच्या स्थानी टीम सेफर्टला संधी मिळू शकते. 5 स्पेशालिस्ट गोलंदाज आणि सहाव्या स्थानी नीशम यामुळे, त्यांची गोलंदाजीही भक्कम आहे.

बॉक्स

इतिहास काय सांगतो?

बाद फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला आजवर एकदाही पराभूत केलेले नाही. या दोन्ही दिग्गज संघांमध्ये आतापर्यंत क्वॉटर्रफायनल, सेमी फायनल व फायनल असे एकूण 17 सामने झाले असून त्यात चक्क 16 वेळा ऑस्ट्रेलियाने विजयश्री संपादन केली. 1981 मध्ये न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला नमवले. पण, तो सामना बाद फेरीचा नव्हता. ती लढत बेस्ट ऑफ थ्री फायनल होती आणि त्या मालिकेतही न्यूझीलंडच्या पदरी निराशाच आली होती. आयसीसी इव्हेंटमधील न्यूझीलंडविरुद्धचे बाद फेरीतील चारही सामने ऑस्ट्रेलियानेच जिंकले आहेत.

बॉक्स

फायनलमध्ये पोहोचूनही दोन्ही संघांचे कर्णधार अद्याप बॅड पॅचमध्येच!

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे दोन्ही संघ आज जेतेपदाच्या लढतीसाठी निर्धाराने मैदानात उतरणार असले तरी या दोन्ही संघांच्या कर्णधारांना पूर्ण स्पर्धेत अद्याप सूर सापडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला चेंडूमागे एक धाव या समीकरणाने 131 धावा करता आल्या असून ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच सलामीला फलंदाजीला उतरत असतानाही केवळ 119 धावाच करु शकला आहे. नाणेफेक जिंकण्याच्या निकषावर फिंच विल्यम्सनपेक्षा सरस ठरत आला आहे. या स्पर्धेत फिंचने 5 वेळा तर विल्यम्सनने 2 वेळा नाणेफेक जिंकली आहे.

बॉक्स

अशी असेल खेळपट्टी!

आजची फायनल नव्या खेळपट्टीवर खेळवली जाणार असून ती फलंदाजीला पोषक ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी उपांत्य लढतीत डय़ू फॅक्टर फारसा महत्त्वाचा ठरला नव्हता. नाणेफेक जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्यास प्राधान्य देऊ शकेल, असे संकेत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने मात्र नाणेफेकीचा कौल फारसा महत्त्वाचा नसेल, असा दावा केला आहे.

बॉक्स

आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील विजेते

हंगाम / विजेते / उपविजेते / मालिकावीर / सर्वाधिक धावा / सर्वाधिक बळी / यजमान

2007 / भारत / पाकिस्तान / शाहिद आफ्रिदी / मॅथ्यू हेडन / उमर गुल / द. आफ्रिका

2009 / पाकिस्तान / श्रीलंका / तिलकरत्ने दिलशान / तिलकरत्ने दिलशान / उमर गुल / इंग्लंड

2010 / इंग्लंड / ऑस्ट्रेलिया / केव्हिन पीटरसन / महेला जयवर्धने / डर्क नॅनेस / विंडीज

2012 / विंडीज / श्रीलंका / शेन वॅटसन / शेन वॅटसन / अजंथा मेंडिस / श्रीलंका

2014 / श्रीलंका / भारत / विराट कोहली / विराट कोहली / अहसान मलिक व इम्रान ताहीर / बांगलादेश

2016 / विंडीज / इंग्लंड / विराट कोहली / तमिम इक्बाल / मोहम्मद नबी / भारत

Related Stories

रिषभ, वॉशिंग्टनची नितांत ‘सुंदर’ फलंदाजी!

Patil_p

मुरलीधरनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

शेवटच्या स्थानावरील हैदराबादचा आरसीबीला झटका

Patil_p

स्पेनची पाओला बेडोसा उपांत्य फेरीत

Patil_p

यू-19 वर्ल्ड कप : भारत-ऑस्ट्रेलिया आज उपांत्यपूर्व लढत

Patil_p

मध्यप्रदेश सरकारकडून विवेक सागरला 1 कोटी प्रदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!