तरुण भारत

‘टेस्ट स्पेशालिस्ट’ खेळवत ऑस्ट्रेलिया ‘टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्स’!

आयसीसी टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकतर्फी मात

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

टी-20 क्रिकेटमध्ये फक्त शॉर्ट फॉरमॅट स्पेशालिस्टची गरज असते, अशी वंदता असताना ऑस्ट्रेलियाने मात्र एक-दोन नव्हे तर चक्क 5 टेस्ट स्पेशालिस्ट खेळवून  टी-20 मधील वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम रविवारी गाजवला. आजवर 5 वनडे वर्ल्डकप जिंकणाऱया ऑस्ट्रेलियाला मागील 14 वर्षे टी-20 चे वर्ल्डकप जेतेपद सातत्याने हुलकावणी देत होते. रविवारी मात्र ऑस्ट्रेलियाने अनुभव पणाला लावत विजय अक्षरशः खेचून आणला आणि आपल्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये झळाळता टी-20 वर्ल्डकप विराजमान होईल, याची रोखठोक तजवीज केली.

दुखापतीने त्रस्त असलेल्या मिशेल मार्शने 50 चेंडूत 77 धावांची आतषबाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा 8 गडी राखून फडशा पाडत आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. टी-20 वर्ल्डकप इतिहासातील त्यांचे हे पहिलेच जेतेपद ठरले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 4 बाद 172 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही तोडीस तोड उत्तर देत 18.5 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.

विजयासाठी 173 धावांचे आव्हान असताना डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा फटकावल्या तर मिशेल मार्श 50 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 77 धावांवर नाबाद राहिला. कर्णधार फिंचची अपयशी मालिका कायम राहिली असली तरी मार्शने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मॅक्सवेलने 18 चेंडूत जलद 28 धावांचे योगदान दिले. तो याच धावसंख्येवर नाबादही राहिला. वॉर्नर-मार्शच्या या धडाकेबाज खेळीमुळे किवीज कर्णधार केन विल्यम्सनची अर्धशतकी झंझावात मात्र निष्फळ ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या मार्शला या स्पर्धेत फलंदाजीच्या आघाडीवर तिसऱया स्थानी बढती मिळाली आणि त्यानेही या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. मार्शने 6 चौकार, 4 षटकार खेचत किवीज गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याने ईश सोधीच्या (3 षटकात 0-40) गोलंदाजीचाही उत्तम समाचार घेतला.

धावफलक

ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. बोल्ट 53 (38 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), ऍरॉन फिंच झे. मिशेल, गो. बोल्ट 5 (7 चेंडूत 1 चौकार), मिशेल मार्श नाबाद 77 (50 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), ग्लेन मॅक्सवेल नाबाद 28 (18 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार). अवांतर 10. एकूण 18.5 षटकात 2 बाद 173.

गडी बाद होण्याचा क्रम

1-15 (फिंच, 2.3), 2-107 (वॉर्नर, 12.2).

गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट 4-0-18-2, टीम साऊदी 3.5-0-43-0, ऍडम मिल्ने 4-0-30-0, ईश सोधी 3-0-40-0, मिशेल सॅन्टनर 3-0-23-0, जेम्स नीशम 1-0-10-0.

ऑस्ट्रेलियाच्या ट्रॉफी कॅबिनेटमधील आठवी ट्रॉफी!

आपल्या व्यावसायिक खेळासाठी ओळखल्या जाणाऱया ऑस्ट्रेलियाने आजवर 5 वेळा वनडे वर्ल्डकप, 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असून रविवारी त्यांनी यात पहिल्यावहिल्या टी-20 वर्ल्डकपची भर घातली. त्यांच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये आता फक्त जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची भर बाकी आहे.

Related Stories

प्राग्वे टेनिस स्पर्धेत हॅलेप विजेती

Patil_p

भारताचा अर्जेंटिनावर मोठा विजय

Amit Kulkarni

टय़ुनिशियाचा भारतावर निसटता विजय

Patil_p

रसेल, डु प्लेसिस, मिलर यांची लंकन लीग स्पर्धेतून माघार

Patil_p

लंकन क्रिकेट संघाची घोषणा

Patil_p

पूरनचा विंडीज अ संघात समावेश

Patil_p
error: Content is protected !!