तरुण भारत

नक्षलींना तडाखा

गडचिरोलीत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल ग्यारापत्ती-जंगल परिसरात ‘सी 60’ पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झडलेल्या धुमश्चक्रीत जहाल माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलींचा खातमा झाल्याने माओवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे. अर्थात समूळ उच्चाटनासाठी नक्षली चळवळीची संपूर्ण पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता असून, भविष्यात शरणागती वा कठोर कारवाई अशा दोन्ही मार्गांबरोबरच जनजागरणाच्या अंगानेही पुढे जावे लागेल. भारतापुढील मुख्य समस्यांपैकी नक्षलवाद हीदेखील गंभीर समस्या मानली जाते. पश्चिम बंगालमधील नक्षलबाडीतून उगम पावलेल्या या नक्षलवादाने महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र, मध्य प्रदेशाच्या जंगली टापूत आपले बस्तान बसविले असून, तेथे पोलीस व माओवाद्यांमध्ये सातत्याने संघर्ष झडत असतो. एप्रिल 2018 मध्ये भामरागड तसेच अहेरी तालुक्याच्या भागात झालेल्या चकमकीत 40 नक्षलवाद्यांना टिपण्यात पोलीस दलास यश आले होते. त्यानंतरची ही दुसरी सर्वांत मोठी चकमक होय. किंबहुना, या कारवाईत नक्षलींचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे हाच ठार झाल्याने हा वर्मी घाव म्हटला पाहिजे. नक्षलींच्या केंद्रीय समिती सदस्यपदासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या तेलतुंबडे याचे उपद्रवमूल्य मोठे होते. 42 चकमकी, सात नागरिकांसह चार पोलिसांच्या हत्या तसेच जांभूळखेडा येथील 2019 मधील भूसुरूंग स्फोटाचाही तो सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. जंगलातील माओवादी कारवायांची आखणी व अंमल करण्यासाठी शहरी भागात माओवादाचा प्रचार व प्रसार करण्यातही तो अग्रभागी असे. मध्यंतरी पुण्यातून काही तरुण गायब झाल्याची माहिती पुढे आली होती. हे तरुण तेलतुंबडे याच्या संपर्कात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. शहरातील बेरोजगार वा व्यवस्थेबद्दल असंतोष असलेल्या तरुण मुलांना हेरून त्यांना नक्षली चळवळीकडे आकृष्ट करून घेणे, त्यानंतर प्रत्यक्ष त्यांना चळवळीत सहभागी करून घेणे, अशी त्याच्या कामाची पद्धत होती. स्वाभाविकच पुण्यामुंबईसह अनेक शहरांतील मुलांना त्याने नादी लावल्याचे दिसून येते. यासोबत माओवाद्यांचा नवा कोअर झोन करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. गडचिरोलीचा गोंदियालगतचा सीमावर्ती भाग, मध्य प्रदेशातील बालाघाट आणि आजूबाजूचे जिल्हे तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव हा झोन तयार करण्याकरिताही तो प्रयत्नशील होता. हे पाहता दंडकारण्य व आजूबाजूचा पट्टा नक्षलमय करण्याचा त्याचा डाव असल्याचे स्पष्ट होते. एल्गार प्रकरणात फरार आरोपी असलेल्या तेलतुंबडे याच्यावर महाराष्ट्र पोलिसांचे 50 लाखांचे, तर अन्य राज्यांचे दोन कोटीचे असे एकूण अडीच कोटींचे बक्षीस लावण्यात आले होते. यातूनच त्याचे महत्त्व अधोरेखित होते. कारवाईदरम्यान त्याला वाचविण्यासाठी माओवाद्यांनी केलेले जीवाचे रानही बरेच काही सांगून जाते. इतका सारा खटाटोप केल्यानंतरही त्याला यमसदनी धाडण्यात पोलिसांनी मिळविलेले यश माओवाद्यांच्या मनोबलाला सुरूंग लावणारे ठरेल, हे नक्की. मूळ गावी म्हणजेच यवतमाळमधील वणी येथे तेलतुंबडे याच्यावर अंत्यसंस्कार झाले असून, या धक्क्यातून लवकर सावरणे तसे कठीणच. मागच्या काही दिवसांत पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेत नक्षलवाद्यांना जबर तडाखे दिले आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांची अनेक आघाडय़ांवर कोंडी झाल्याचे पहायला मिळते. माओवादी चळवळीतील अनेक मोठे व महत्त्वाचे नेते अलीकडच्या काळात मारले गेले आहेत. तर अनेकांनी शरणागती पत्करणे पसंत केल्याचेही दिसते. त्यात नक्षली व जनता यांच्यातील दरीही रुंदावते आहे. एकेकाळी नक्षली हे अभावग्रस्तांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरत. त्यांना या ना त्या माध्यमातून मदतही करीत असत. परंतु, लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी आपले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य आदिवासींवर दडपशाही करतानाच पोलिसांना माहिती पुरविल्याच्या संशयातून त्यांची हत्या करण्यापर्यंतही त्यांची मजल गेली. त्यात वैचारिक लढाईऐवजी केवळ हिंसाचार हाच या चळवळीचा विशेष असल्याचा संदेश सर्वदूर पोहोचल्याने तिला मिळणारा पाठिंबा टप्प्याटप्प्यात आटत गेला. आता नवीन मुले, भरतीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ही चळवळ काहीशी उतरणीला लागल्याचे पहायला मिळते. कोणतीही चळवळ अक्षर राहण्यासाठी तिला वैचारिक बैठक असणे आवश्यक असते. परंतु, त्याऐवजी हिंसाचार व बंदुकीच्या गोळीवर ही चळवळ उभी केली जात असेल, तर तिला नैतिक पाठबळ मिळू शकत नाही. परिणामी हळूहळू तिचा ऱहास होतो, हे वैश्विक सत्य आहे. आज नक्षली चळवळ याच वाटेवर आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अर्थात असे एखाद दुसरे मिशन यशस्वी झाले म्हणून नक्षलवाद लगेच संपुष्टात येईल, असेही नव्हे. अभावाचे जगणे, बेरोजगारी, दारिद्रय़ाचा अंधार, श्रीमंत व गरिबांमधील वाढती दरी, सामान्यांवरील अन्याय, अत्याचार ही नक्षली चळवळ फोफावण्यामागची काही कारणे सांगता येतील. हे मूळच कसे संपविता येईल, या स्तरावर यापुढे काम झाले पाहिजे. 1991 मध्ये आपण खुले आर्थिक धोरण स्वीकारले. त्याचे अनेक बरे वाईट परिणाम आज पहायला मिळतात. आता पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आपण पाहिले आहे. देशाचा विकासदर वाढणे, शहरे स्मार्ट होणे, अर्थव्यवस्थेचा आकार वाढणे, हे सारे चांगलेच. तथापि, विकासाची फळे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कशी पोहोचविता येईल, विकासाचा असमतोल कसा दूर करता येईल, या दृष्टीनेही प्रयत्नशील असायला हवे. नक्षलवादी चळवळी आज मोठय़ा स्थित्यंतरातून जात आहेत. सेनापती पडला, की सैन्य कावरेबावरे होते, हा इतिहास आहे. हे पाहता पुढच्या टप्प्यात नक्षलींची अधिकाधिक कोंडी करण्यासाठी रणनीती आखायला हवी. त्यातून शरणागती पत्करणाऱयांची संख्याही वाढू शकेल. ग्रामीणबरोबरच शहरी भागातही जाळे विणू पाहणाऱया नक्षली विचारांना पायबंद घालण्याकरिता त्यातील धोके समजावत जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Related Stories

सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Patil_p

।।अथ श्रीरामकथा।।

Patil_p

चीनची नव्या दिशेने वाटचाल

Patil_p

सिंधुदुर्गातील रानभाज्यांचे वैभव

Patil_p

बडगा हवाच, पण…

Patil_p

व्यवस्थापन आणि समर्थांचा दासबोध

Patil_p
error: Content is protected !!