तरुण भारत

देशातील सर्वात लांब एक्स्प्रेसवेचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम, विरोधी पक्षांवर टीका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पूर्वांचल एक्स्पेसवे या भारतातील सर्वात लांब जलदगती मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी सुलतानपूर येथे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे रणशिंगही फुंकले आहे. राज्यातील मागच्या सरकारांनी लोकांवर अन्याय केला आहे. या पक्षांच्या नेत्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचे हित पाहिले आणि जनतेला वाऱयावर सोडले. भाजप सरकारने मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राज्याचा चहुमुखी विकास साधला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

देशातील सर्वाधिक लांबीचा (341 किलोमीटर) हा जलदगती मार्ग अवघ्या 3 वर्षांमध्ये पूर्ण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधान मोदींनीच स्थापन केली होती. या मार्गावर विमानेही उतरु शकतील, असा विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला होता. या मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी खरोखरच भारताची तीन युद्धविमाने या एक्स्पेसवेवर उतरली आहेत.

ज्यांना उत्तर प्रदेशचे सरकार आणि जनता यांच्या कार्यक्षमतेविषयी शंका आहेत, त्यांनी सुलतानपूरला भेट द्यावी आणि हा जलदगती मार्ग पहावा. केवळ तीन वर्षांपूर्वी जेथे केवळ एक भूमीचा तुकडा होता, तेथे आज अत्याधुनिक मार्ग निर्माण करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेच्या इच्छाशक्तीची ही प्रचीती आहे. हा मार्ग सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे, अशी भलावण त्यांनी केली.

बहुविध उपयोग

या मार्गाच्या निर्मितीसाठी 22,500 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यामुळे उत्तर प्रदेशच्या पूर्वभागाचा आर्थिक विकास झपाटय़ाने होणार आहे. लखनौ, बाराबंकी, अमेथी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, अझमगढ, मऊ आणि गाझीपूर इत्यादी जिल्हे या मार्गाने जोडले जाणार असून प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक अधिक वेगाने आणि सुलभ रितीने होणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंचा मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक विकासही होण्याची शक्यता आहे.

विरोधकांची टीका

या एक्स्पेसवेच्या कामात अनियमितता आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजप केवळ घोषणांच्या राजकारणात मग्न आहे, अशी टीका काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली. तर ही योजना आमच्याच सरकारची होती. भाजपने केवळ तिचे श्रेय घेतले अशी टिप्पणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली. भाजपनेही या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. एवढा भव्य प्रकल्प भ्रष्टाचार न करता सरकारने पूर्ण केला, याचे विरोधकांना वैषम्य वाटत आहे. त्यामुळे द्वेषापोटी ते बिनबुडाचे आक्षेप घेत आहेत. ही टीका त्यांच्या नैराश्याचे दर्शन घडवित आहे, असे प्रतिपादन भाजप राज्यशाखा अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग यांनी केली आहे.  

युद्धविमाने उतरली

या एक्स्प्रेसवेचे उद्घाटन झाल्यानंतर त्यावर भारताच्या तीन युद्धविमानांनी अवतरण केले. त्यात राफेल, मिराज-2000 आणि एएन 32 ही तीन युद्धविमाने उतरली. त्यामुळे या मार्गाची सामरिक उपयुक्तताही सिद्ध झाली आहे. एएन 32 हे भारतीय वायुदलाचे वाहतूक विमान आहे. उपस्थित हजारो लोकांनी मार्गावर विमाने उतरण्याचा हा कार्यक्रम पाहिला आणि आश्चर्य व्यक्त केले.

Related Stories

‘बीएसएफ’ने उधळला शस्त्र तस्करीचा प्रयत्न

Patil_p

दहशतवाद्यांचा कट उधळला

Amit Kulkarni

दोन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा

Amit Kulkarni

धोका वाढला : देशात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख पार

Rohan_P

नकली ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन घेऊनही 90 टक्के रुग्ण झाले बरे

datta jadhav

बिहार : भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Rohan_P
error: Content is protected !!