तरुण भारत

मुरगावच्या पालिका इमारत प्रकरणात सहा कोटींच्या भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा आरोप

भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा आरोप, एफआयआर नोंद करण्याची मागणी, मिलिंद नाईक घोटाळेबाज मंत्री, त्यांच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांच्या भागिदारीचा संशय

प्रतिनिधी /वास्को

Advertisements

मुरगावचे आमदार व मंत्री मिलिंद नाईक राज्य सरकारमधील घोटाळेबाज मंत्री असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यांच्या घोटाळय़ातील भागीदार आहेत. त्यामुळेच आतापर्यंत अनेक घोटाळय़ांचे आरोप होऊनसुध्दा मुख्यमंत्र्यांनी मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरूध्द कसलीच कारवाई केलेली नाही. मुरगाव पालिका इमारतीच्या नुतनीकरणाचा घोटाळा हा सहा कोटी रूपयांचा असून साडे तीन कोटींच्या कामासाठी 9 कोटी 28 लाख रूपये खर्च करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री या घोटाळय़ात सामील नसल्यास त्यांनी या घोटाळय़ाची त्वरीत चौकशी हाती घ्यावी. अन्यथा काँग्रेस पक्ष या घोटाळय़ाचा छडा लावण्यासाठी पोलीस तक्रार करेल असे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी मंगळवारी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला या घोटाळय़ाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष गप्प बसणार नसल्याचा ईशारा दिला आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, वास्को गट अध्यक्ष महेश नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद चोपडेकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान, मुरगाव महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सिमा बेहरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मुरगाव पालिका इमारत ही वारसा स्थळ असून तीचे आहे त्याच पध्दतीने जतन व्हायला हवे. या इमारतीला आधुनिक स्वरूप येता कामा नये. या इमारतीशी इतिहास, अभिमान, भावनाही गुंतलेल्या आहेत. मात्र, भाजपाच्याच आमदारांनी या वारसा इमारतीच्या कामात त्यांच्याच मंत्र्यांकडून घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. आमच्या अभ्यासातही हा महाघोटाळा असल्याचे दिसून आलेले आहे. या इमारतीच्या सवर्धनाचे हे काम 9 कोटी 28 लाखांचे असून प्रत्यक्षात ते 3 ते साडे तीन कोटींमध्ये होऊ शकते. त्यामुळेच हा महाघोटाळा असून उर्वरीत सहा कोटी कुठे गेले असा प्रश्न गिरीष चोडणकर यांनी उपस्थित केला आहे. या इमारतीच्या छतावरील जुने सागवानी लाकुड आणि इतर साहित्याचीही चोरी झालेली आहे. ते जुने साहित्या असल्याने त्याला कोटींचे किंमत आहे. सवर्धनाच्या नावाने एकीकडे विद्रुपीकरण, महाघोटाळा आणि दुसरीकडे चोरीही झालेली आहे. ही चोरी कोण केली त्याचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी चोडणकर यांनी केली. मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर यापूर्वीही नुशी नलीनी जहाज, नाफ्त्याचे प्रकरण, मुरगाव बंदरातील लोह खनिज चोरी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, सरकारी जमीनीवर अतिक्रमण अशा अनेक प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून आरोप झालेले आहेत. मात्र, सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंत्री मिलिंद नाईक यांना प्रत्येक प्रकरणात पाठीशी घालीत आलेले असून मुख्यमंत्रीही त्यांच्या प्रत्येक घोटाळय़ामध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. यापूर्वी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केलेले आहे असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

मंत्री मिलिंद नाईक यांच्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांची भागिदारी नसल्यास त्यांनी मुरगावच्या पालिका इमारतीच्या प्रश्नात त्वरीत चौकशी हाती घ्यावी. एखादय़ा तज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी. या प्रकरणात कोणकोण गुंतलेले आहेत हे उघडकीस आणावे. त्या सर्वांवर एफआयआर नोंद व्हावी. काँग्रेस पक्ष या प्रकरणात गप्प राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाई हाती न घेतल्यास काँग्रेस पक्ष स्वता या प्रकरणात एफआयआर दाखल करेल. असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्याच वक्तव्यातून भ्रष्टाचाराची कबुली दिली- संकल्प आमोणकर

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनीही यावेळी मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना अनेक भ्रष्ट प्रकरणांचा उल्लेख केला. लॉकडाऊनच्या काळात झालेला भ्रष्टाचार, पालिका निवडणुक काळात महिला राखीवतेच्या प्रकरणात घातलेला घोळ, भाजपाच्याच मंत्री आमदारांनी मिलिंद नाईक यांच्यावर वेळोवेळी केलेले आरोप याची माहितीही आमोणकर यांनी दिली. किमान वास्कोतील प्रकल्पाबाबत तरी आपण घोटाळा करण्याचा विचार करू शकत नाही अशी प्रतिक्रीया व्यक्त करून मंत्री मिलिंद नाईक यांनी आपण इतर ठिकाणच्या प्रकल्पात भ्रष्टाचार करू शकतो याची कबुलीच दिली आहे. जनतेला त्यांच्या वक्तव्यातून योग्य तो संदेश मिळाल्याचे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.

पालिका इमारत घोटाळय़ाला वास्को व मुरगावचे दोन्ही नेते जबाबदार- जुझे फिलिप

दरम्यान, वास्कोचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा यांनी मुरगाव पालिका इमारतीच्या सवर्धनाच्या कामात झालेल्या घोटाळय़ाला वास्को व मुरगाव भागातील भाजपाचे दोन्ही नेते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. हा महाघोटाळा असून नगरविकासमंत्री मिलिंद नाईक आणि आमदार कार्लुस आल्मेदा याला जबाबदार आहेत. निवडणुक जवळ आल्याने लोकांची सहानुभुती मिळवण्यासाठी हे नेते आता एकमेकांवर टीका करू लागलेले असून भाजपाच्या नेत्यांच्या अनेक प्रकल्पाचे घोटाळे येणाऱया काळात उघडकीस येतील असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे हे नेते असेच भ्रष्टाचार करू लागल्यास वास्को तसेच मुरगाव तालुक्याची दशा काय होईल असा प्रश्न उपस्थित करून मागच्या पावणे पाच वर्षांत या नेत्यांनी काय केले असाही प्रश्न जुझे फिलिप यांना विचार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या नेत्यांवर लक्ष ठेवावे अशी मागणी जुझे फिलिप यांनी केली आहे.

Related Stories

कुठ्ठाळी महामार्ग बांधकामासंबंधीच्या समस्या त्वरित सोडवा साबांखामंत्री दीपक पाऊसकर यांचा अभियंत्याना आदेश

Omkar B

पैंगीण येथील महालवाडा – हाददुरिग रस्ता पाण्याखाली

Amit Kulkarni

मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांवर लवकरात लवकर कारवाई करा

Omkar B

‘संजय न्यूज न्यूक’कडून पत्रकारांना मास्क, अन्य साहित्य

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Patil_p

बनावट सहय़ा, शिक्क्यांद्वारे जमीन विक्री

Patil_p
error: Content is protected !!