तरुण भारत

वाहतूक बेटावरून मडगाव नगराध्यक्ष, मुख्याधिकारी धारेवर

पालिकेची खास बैठक : एका दिवसात सर्व नियम धाब्यावर बसवून प्रक्रिया पूर्ण केल्याचा नगरसेवकांकडून ठपका, पालिका प्रशासनाचा कारभार उघडा

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

पालिका इमारतीनजीकचे एक वाहतूक बेट उभारताना पालिकेने घिसाडघाई करून एका दिवसातच सर्व नियम धाब्यावर बसवून प्रक्रिया पूर्ण केल्याने नगरसेवकांनी मंगळवारी पालिका मंडळाच्या बैठकीत मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस व नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांना धारेवर धरले. या एकंदर प्रकरणात पालिका प्रशासनाचा कारभार उघडा पडून त्यांचा त्रिफळा उडाला.

पालिका इमारतीनजीकच्या कोहिनूर हॉटेलसमोरील वाहतूक बेटावर देखरेख ठेवण्यासाठी सेबी डिमेलो यांच्याकडून आलेल्या अर्जासंदर्भात 28 ऑक्टोबर रोजी एका दिवसात सर्व प्रक्रिया हातावेगळी करण्यात आल्याचे नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी नजरेस आणून देताना नगराध्यक्ष पेरेरा यांच्याकडे त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राला अनुसरून नगराध्यक्षांनी पालिका मंडळाची ही खास बैठक बोलाविली होती.

कित्येक नियम धाब्यावर

यावेळी या विषयावरून दामोदर शिरोडकर, सगुण नाईक, घनश्याम शिरोडकर, महेश आमोणकर, पूजा नाईक आदी नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नगरसेवक सगुण नाईक यांनी प्रक्रिया एका दिवसात राबविताना कित्येक नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे नजरेस आणून दिले. बेटावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधितांना मान्यता देताना त्यासाठी ठराव घेण्यात आलेला वा निविदा काढण्यात आलेली नाही. बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी न घेता हे सगळे चुकीच्या मार्गाने केले असून या प्रक्रियेला आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकरणात गुंतल्याचा नगराध्यक्षांकडून इन्कार

नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी आपण पत्रव्यवहार करताना यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती व सदर मंजुरी मागे घेण्यास सूचित केले होते याकडे लक्ष वेधून नगराध्यक्ष पेरेरा यांना जाब विचारला व नगराध्यक्ष या प्रकरणात सामील असल्याची टीका केली. यावेळी नगराध्यक्ष संतप्त झाले व आपला यात हात नसून शिरोडकर यांच्या पत्राला अनुसरून आपण मुख्याधिकारी फर्नांडिस यांना शेरा टाकला होता व सदर बेटाच्या देखरेखीसाठी देण्यात आलेली मंजुरी रद्द करण्यास सांगितले होते असे स्पष्ट केले. आपण अजूनही सदर मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

…तर मंजुरी रद्द करेन : मुख्याधिकारी

मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी पालिका मंडळाच्या 28 रोजीच्या बैठकीत हा विषय आला होता व त्यास मंजुरी दिली गेली गेली होती, असा दावा केला. महिना उलटला, तरी सदर बैठकीचा इतिवृत्तांत अजूनही आपल्याकडे आलेला नसून तो आल्यावर यासंदर्भात ठराव घेतलेला नसल्यास वा नगरसेवकांनी मंजुरी दिलेली नसल्यास आपण बेटाला दिलेली मंजुरी रद्द करेन, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नगरसेवक आमोणकरांकडून बैठकीच्या वैधतेबद्दल प्रश्न

नगरसेवक महेश आमोणकर यांनी सदर बैठकीच्या सुरुवातीस या बैठकीच्या वैधतेबद्दलच प्रश्न उपस्थित केला. खास बैठक बोलाविण्यासाठी एक तृतियांश नगरसेवकांच्या सहय़ांची आवश्यकता आहे. कायद्यात तशी तरतूद आहे. मग एका नगरसेवकाच्या पत्रावरच ही बैठक का बोलाविण्यात आली, असा सवाल करून त्यांनी नगराध्यक्षांना चांगलेच धारेवर धरले. एक वेळ तर नगराध्यक्ष सदर बैठक तहकूब करण्यासाठी तयार झाले. पण अन्य नगरसेवकांनी आम्ही आलोच असल्याने चर्चा करू, अशी भूमिका घेतली व यापूर्वी एका नगरसेवकाच्या पत्रावरून नगराध्यक्षांनी खास बैठका घेतलेल्या असल्याचे दावे केले. तरी असता आमोणकर म्हणाले की, तसा आपला या बैठकीस आक्षेप नाही. मात्र खारेबांद येथील एका भंगारअड्डा स्थानिकांना त्रासदायक ठरत असल्याचे पत्रव्यवहार करून व मोर्चा आणून नजरेस आणून दिले, तरी कारवाई होत नाही. त्यामुळे आपल्या पत्राला अनुसरून अशीच खास बैठक घेण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली. मात्र नगराध्यक्ष पेरेरा यांनी त्यांना आश्वासन न दिल्याने ते संतापले व बैठकीतून त्यांनी काढता पाय घेतला. नगराध्यक्षांच्या या कृतीचा नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी निषेध केला.

Related Stories

निदान मतदारसंघातिल खाण अवलंबिता वर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे।

Patil_p

तियात्रिस्ट अन्नोनिओ मोराईस यांची जयंती साजरी

Omkar B

भाजपासमोर बंडखोरीचे संकट

Amit Kulkarni

डॉ.प्रेमानंद रामाणी यांच्याकडून 1 लाखांची मदत

Omkar B

दुकानदारांनी दामदुप्पट किमती लावू नये

Patil_p

निवडणूक गोवा फॉरवर्डतर्फे काणकोण मतदारसंघातून लढविणार

Patil_p
error: Content is protected !!