तरुण भारत

गुरुभक्त भगवंतांना फार आवडतात

अध्याय अकरावा

भगवंत उद्धवाला म्हणाले, सगुण आणि निर्गुण ही दोन्ही एकच आहेत. मन निरंतर जागृत ठेवून माझ्या भक्तांनी अत्यंत हर्षाने माझी पूजा करावी. नाना प्रकारचे योगयाग, वापी, कूप, वने, सरोवरे, उत्तमोत्तम श्रौतस्मार्त अशी कर्मे करून  मला अर्पण करावीत. कर्मे मला अर्पण करीत असतानासुद्धा एखादे वेळी त्या भक्ताचे मन काही तरी विघ्ननिवारक फळाची इच्छा करते, तशी इच्छा त्याला होऊ नये म्हणून भक्ताला मी कधीही विघ्न येऊ देत नाही हे लक्षात ठेव. सकाम कर्मकर्त्याला अत्यंत प्रयासानेसुद्धा जे प्राप्त होत नाहीत, ते उत्तम लोकातील  सर्व भोग मी माझ्या भक्तांना देत असतो. तो ते भोग भोगत असतानाही माझे स्मरण करीत असतो. म्हणून तो त्या भोगात आसक्त होत नाही. अशा प्रकारे मी आपल्या भक्तांना विघ्नाचा स्पर्शसुद्धा होऊ देत नाही. मनाची समदृष्टि करून श्रौतस्मातकर्माचे अनु÷ान किंवा योग, याग, त्यागवृत्ती यांचे साधन ते एकनि÷sने करू लागले की, त्यांची चित्तवृत्ती शुद्ध होते आणि उद्धवा ! चित्तवृत्ती शुद्ध झाली की, त्यांना माझी उत्तम भक्ती प्राप्त होते पण इतकी खटपट न करताच माझी सद्‌भक्ती प्राप्त होईल अशी एक अत्यंत गुप्त युक्ति मला माहीत आहे. तीही गोष्ट मी तुला सांगेन. उद्धवा ! सर्व साधन सोडून देऊन जो साधूचे भजन करेल, त्याचे मन खरोखर शुद्ध होईल हे लक्षात ठेव. साधुचे लक्षण मी पूर्वी सांगितलंच आहे. साधु तोच सद्गुरु हे लक्षात ठेव म्हणजे झाले. सद्गुरूचे भजन जो भावार्थाने करतो, त्याच्या सर्व शुद्धीचे कारण सर्वस्वी सद्गुरुच असतात. त्याच्या मुखातील शब्दच ब्रह्मसाक्षात्काराला नेऊन पोचवितो. त्या सद्गुरूच्या भाग्यवान् चरणाची सेवा केली असता कोणाची शुद्धी होणार नाही ? तोंडाने गुरूचे नाम घेतले असता त्याच्याकडे कधी काळही पाहू शकत नाही. त्याची सेवा आनंदाने केली असता मोक्षसुखेही येऊन पायांना लागतात. ज्याच्या मनात सद्गुरूंची आवड आहे, ज्याची सद्गुरूच्या भजनामध्ये अत्यंत प्रीती आहे, त्याच्यावर माझी सद्‌भक्ती भाळली म्हणून समजावे. ती खरोखर त्या भक्ताने आपणास वरावे म्हणून त्याच्या पाठीसच लागते. गुरुभजनाच्या ठिकाणी जो भावार्थान युक्त होतो, त्यानेच जगामध्ये आपला स्वार्थ साधला खरा. त्याच्यापाशी माझी उत्तम भक्ती अगदी तिथंच ति÷त बसलेली असते. सद्‌भक्तीच काय, मीसुद्धा स्वतः रात्रंदिवस आनंदाने त्याच्याजवळ उभा असतो इतका गुरुप्रेमाने मी भुललो आहे. मला माझ्या भक्तांची गोडी इतकी नाही पण गुरुभक्तांची मला फारच आवड असते. मात्र सत्संगतीशिवाय प्रत्यक्ष उत्तम सद्‌भक्ती कधीही प्राप्त व्हावयाची नाही. माझी प्राप्ती होण्याला भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग असे दोन्ही मार्ग आहेत. त्यात ज्ञानमार्ग फार बिकट आहे पण भक्तिमार्ग हा निर्विघ्नपणाने भक्ताला माझ्याकडे पोचवितो. हा संसार तरून जाण्याला अनेकांनी अनेक साधने सांगितलेली आहेत पण ती सर्व व्यर्थ आहेत असे समज. अनुभवाअंती माझा भक्तिमार्गच उत्तम आहे असे दिसून येते. सर्व उपायांमध्ये अत्यंत सरळ, निर्वेध, नित्य आणि पवित्र असा केवळ भक्तीमार्ग आहे. ज्ञानमार्ग आहे तो भक्ताला मध्येच व्याकुळ करून सोडणारा आहे. मळा शिंपावयाला मोट आणि पाट असे पाणी मिळविण्याचे दोन उपाय असतात. मोटेने विहिरीतले पाणी काढावयाचे आणि तेही फार कष्ट करून थोडेच मिळते. आधी मोट, नाडा आणि बैलांची जोडी इतकी तयारी पाहिजे, मग त्या बैलांना आसुडाखाली सारखे झोडीत बसावे आणि त्यांना मागेपुढे येता जाताना ओढाओढ करून त्यांचे हाल हाल करावेत, तेव्हा कोठे एका लहानशा भागाएवढी जमीन भिजते. त्यातही एखाद्या वेळी मोटच फुटते किंवा नाडाच तुटून जातो, एकाएकी एखादा बैल आजारी पडतो किंवा मरतो असे झाले की, तत्काळ जमिनीची ओल जाते व हातातोंडाला आलेले पीक करपून जाते ! त्याप्रमाणे ज्ञानमार्गाचे प्रकरण असते थोडीशी जरी चूक झाली तर सगळेच मुसळ केरात जाते. ज्ञानमार्गाबद्दल बरीच मतमतांतरे आहेत त्यामुळे साधक अधिकच गोंधळून जातो का ते सविस्तर सांगतो.

Advertisements

क्रमशः

Related Stories

पालिकेत 100 टक्के मराठी कारभार कधी होणार ?

Patil_p

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाची 35 वर्षे पूर्ण, जखम भळभळतीच

Amit Kulkarni

यंदा लसीकरणाने तारले

Patil_p

मंत्रिकपातीचे सूतोवाच

Patil_p

श्रीकृष्णाची रासलीला अनैतिक आहे का?

Patil_p

नमामि शशिनं सोमम्…(संस्कृत सुवचने)

Patil_p
error: Content is protected !!