तरुण भारत

‘सिटी ऑफ जॉय’मध्ये ‘क्लीन स्वीप’चे लक्ष्य!

कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर न्यूझीलंडविरुद्ध तिसरी व शेवटची टी-20 लढत आज

कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

पहिल्या दोन्ही सामन्यात धडाकेबाज विजयासह मालिकाविजयावर यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेला भारतीय संघ आज (रविवार दि. 21) ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱया कोलकात्यात न्यूझीलंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरेल, त्यावेळी क्लीन स्वीप हेच त्यांचे मुख्य लक्ष्य असेल. मालिका यापूर्वीच जिंकली असल्याने उर्वरित राखीव खेळाडूंना येथे संधी दिली जाऊ शकते. सायंकाळी 7 वाजता या लढतीला सुरुवात होईल.

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या भारतीय संघासाठी हा मालिकाविजय दिलासादायी आहे. मात्र, सातत्याने क्रिकेट खेळत आलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंना विश्रांतीची नितांत गरज आहे, हे त्यांनी यापूर्वीच कबूल केले आहे. दोन आठवडय़ांपेक्षा कमी कालावधीत न्यूझीलंडसाठी टी-20 वर्ल्डकपनंतर आजचा हा पाचवा टी-20 सामना असणार आहे.

जयपूर, रांची येथे धमाकेदार विजय संपादन केल्यानंतर आता कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर देखील तोच धडाका कायम राखण्याचा रोहितसेनेचा प्रयत्न असणार आहे. सलग दोनवेळा नाणेफेक जिंकता आल्याने रोहितला कर्णधार या नात्याने पहिली मालिका खेळत असताना याचा उत्तम लाभ घेता आला. आजही नाणेफेक जिंकता आली तर रोहितसाठी ही देखील अनोखी हॅट्ट्रिक असेल. रोहितने याच मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये 264 धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली असून त्याच्यासाठी हे नेहमी ‘हॅपी हंटिंग ग्राऊंड’ ठरत आले आहे.

मालिकाविजय संपादन केल्यानंतर या लढतीत विजयी धडाका कायम राखणे आणि त्याच बरोबर राखीव खेळाडूंना आजमावून पाहणे, यात समतोल साधण्यावर कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा भर असेल. वेंकटेश अय्यरला गोलंदाजी देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मात्र, रोहितला सहावा गोलंदाज हवा आहे का, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

न्यूझीलंडला डेथ ओव्हर्सची चिंता

या मालिकेत न्यूझीलंडला विशेषतः 15 ते 20 या डेथ ओव्हर्समध्येच अधिक झगडावे लागले असून या शेवटच्या लढतीत तरी या समस्येवर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने मालिकाविजयावर यापूर्वीच शिक्कामोर्तब केले, त्यात न्यूझीलंडचे शेवटच्या काही षटकातील फलंदाजीतील अपयश व अश्विन अँड कंपनीचा नियंत्रित मारा निर्णायक ठरला आहे. ईडन गार्डनची खेळपट्टी पुन्हा एकदा ‘बॅटिंग ब्युटी’ असेल आणि धावांचा पाठलाग करणाऱया संघाला पोषक स्थिती असेल, असे सध्याचे संकेत आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, अवेश खान, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन.

न्यूझीलंड ः टीम साऊदी (कर्णधार), टॉड ऍस्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, ऍडम मिल्ने, डॅरेल मिशेल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट, ईश सोधी.

सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.

भरगच्च क्रिकेटशी जुळवून घेण्यात कमी पडलो ः साऊदी

आम्ही सातत्याने क्रिकेट खेळत आलो आहोत. त्यात युएईमधील वातावरण आणि भारतातील वातावरण यात मोठा फरक आहे. आम्हाला भारतीय वातावरणाशी कमी वेळेत जुळवून घेणे शक्य झाले नाही. याचा या मालिकेत फटका बसला, असे निरीक्षण न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नोंदवले.

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत न्यूझीलंडचा संघ परस्पर भारतात दाखल झाला होता. भारतात न्यूझीलंडला येथील वातावरणाशी इतक्या लवकर जुळवून घेणे आव्हानात्मक होते. शिवाय, दोन्ही वेळा नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला, त्याचाही न्यूझीलंडला फटका बसला.

‘दुसऱया लढतीदरम्यान सायंकाळनंतर पूर्ण वेळ डय़ू फॅक्टर होता आणि दोन्ही संघांवर त्याचा परिणाम झाला. ओलसर चेंडूनेही सराव करता येतो. पण, येथील वातावरणाशी आम्हाला अल्प कालावधीत जुळवून घेता आले नाही. भारतीय संघाने उत्तम खेळ साकारला आणि हीच सर्वात महत्त्वाची बाब होती’, असे साऊदी पुढे म्हणाला.

ऋतुराज, अवेश खान, इशान किशन संधीच्या प्रतीक्षेत

ऋतुराज गायकवाड, अवेश खान व इशान किशन यांना या मालिकेत खेळण्याची पहिली संधी मिळण्याची येथे अपेक्षा असेल. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या ऋतुराजचा अंतिम संघात समावेश झाला तर त्याला टॉप-थ्रीमध्ये स्थान दिले जाणे अधिक महत्त्वाचे असेल. मात्र, असे होण्यासाठी स्वतः कर्णधार रोहितला किंवा उपकर्णधार केएल राहुलला विश्रांती घ्यावी लागेल. अवघ्या चारच दिवसात कसोटी मालिका देखील खेळवली जाणार असल्याने या पार्श्वभूमीवर केएल राहुलला विश्रांती देणे अधिक श्रेयस्कर ठरु शकते.

गोलंदाजीतही दोन-एक बदल अपेक्षित

मालिका यापूर्वीच जिंकलेल्या भारतीय संघाला गोलंदाजीतही दोन-एक बदल करण्याची येथे मुभा असेल. अवेश खानला दीपक चहर किंवा भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहलला अक्षर पटेल किंवा रविचंद्रन अश्विन यांच्या जागी खेळवले जाणार का, हे नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून नॉन-स्टॉप क्रिकेट खेळत असलेल्या रिषभ पंतऐवजी इशान किशनला संधी देण्याचाही विचार होऊ शकतो.

मालिकावीराच्या शर्यतीत रविचंद्रन अश्विन किंचीत आघाडीवर

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विनला सूर सापडला, ही भारतासाठी या मालिकेतील आणखी एक दिलासादायक बाब ठरली आहे. यापूर्वीच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर फारसा विश्वास दर्शवला नाही. पण, येथे संधी मिळाल्यानंतर अश्विनने अनुक्रमे 2-23, 1-19 असा लक्षवेधी मारा साकारला असून या मालिकेत मालिकावीराच्या शर्यतीत देखील तो किंचीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

Related Stories

सेरेना, वोझ्नियाकी शेवटच्या चार खेळाडूत

Patil_p

चेन्नईन संघात व्हॅलस्किसचे पुनरागमन

Patil_p

जोकोविच एटीपी अंतिम स्पर्धेसाठी पात्र

Patil_p

मीराबाईच्या मदतीसाठी मोदींची मध्यस्थी

datta jadhav

आकाश चोप्राच्या आयपीएल संघाचे नेतृत्व धोनीकडे

Patil_p

टोकियो ऑलिंपिक कुस्ती पात्र फेरी स्पर्धेच्या ठिकाणात बदल नाही

Patil_p
error: Content is protected !!