तरुण भारत

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व

प्रतिनिधी/ बेळगाव

भाषेवर प्रभुत्व, इतिहासाचा गाढा अभ्यास, कलात्मक दृष्टी आणि वृत्ती, सादरीकरणाचे व व्यवसायवृद्धीचे तंत्र, अखंड आशावाद आणि सकारात्मकता अशा सर्व गुणांचा समुच्चय असणारे विलक्षण व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होय. लोकविलक्षण प्रतिभा असणाऱया बाबासाहेबांचे शिवसृष्टी साकारण्याचे स्वप्न साकार करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे विचार बाबासाहेबांचे स्नेही  व परमशिष्य डॉ. अजित आपटे यांनी व्यक्त केले.

Advertisements

लोकमान्य सोसायटीतर्फे व मराठी भाषाप्रेमी मंडळाच्या सहकार्याने दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर होते. प्रारंभी डॉ. आपटे व किरण ठाकुर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

डॉ. आपटे म्हणाले, बाबासाहेबांनी कोणतेही वर्ग न घेता आपल्या वर्तनातून अनेकांना शिकवण दिली. त्यापैकीच एक मी होतो. त्यांनी कधीच लहान स्वप्ने पाहिली नाहीत. जाणता राजा महानाटय़ करण्याचे कारण विचारता छत्रपती शिवराय आभाळाएवढे होते तर आपण त्यांना छोटय़ा पडद्यावर कसे साकारणार? असा त्यांचा प्रश्न असायचा. या प्रयोगाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी आपले घर गहाण टाकले, पण हे महानाटय़ उभे केले. पहिल्या प्रयोगावेळी त्यांचे वय 63 होते. ज्या वयात निवृत्ती स्वीकारली जाते त्या वयात बाबासाहेबांनी हे शिवधनुष्य उचलले आणि ते लीलया पेलले.

एखाद्या अलौकिक व्यक्तीचे पूर्ण चरित्र दाखवायचे तर प्रारंभापासून शेवटपर्यंत दाखविणे भाग आहे. परंतु जाणता राजामध्ये राज्यारोहणापर्यंतचे चित्रीकरण दाखविले जाते. त्यांच्या मते भरतमुनींच्या नाटय़शास्त्रामध्ये आणि भारतीय रंगभूमीच्या कल्पनेमध्ये रंगमंचावर मृत्यू दाखविणे अमान्य आहे आणि शिवरायांना भारतीय परंपरांचा विलक्षण अभिमान होता. हे बाबासाहेबांनी लक्षात घेतले होते, असेही आपटे म्हणाले.

बाबासाहेब जे जे चांगले ते टिपत गेले. अनेकांनी त्यांना औरंगजेबाचा प्रसंग नको असे सांगितले होते. परंतु या पात्रामुळे प्रयोगाला उंची मिळणार याची त्यांना खात्री होती. बाबासाहेब माणसातील दोष नाकारत, पण माणूस स्वीकारत. क्षितिजापलीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती. जाणता राजा हे महानाटय़ ‘गत कालाचे निदर्शक व भविष्याचा वाटाडय़ा व्हावे’ हा त्यांचा ध्यास होता. प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन त्याला उभे करणारा, त्यांचाइतका मोठा माणूस आज मराठी इतिहासाच्या क्षेत्रात नाही, असे ते म्हणाले.

समारोप करताना किरण ठाकुर म्हणाले, बाबासाहेबांच्या निधनाने पितृछत्र हरपल्यासारखी भावना अनेकांची झाली आहे. वक्ता, लेखक, नाटककार, इतिहासकार, साहित्यिक, स्वयंसेवक, कार्यकर्ता, स्वातंत्र्यसेनानी, कलावंत, अनेक संस्थांचा आश्रयदाता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. बेळगावमधील त्यांच्या व्याख्यानमालेच्या निधीमधून जनकल्याण ट्रस्ट उभे राहिले. जाणता राजाच्या प्रयोगाद्वारे ज्ञान प्रबोधन मंदिर उभारण्यासाठी त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन लोकमान्य सोसायटीने त्यांना पहिला मातृभूमी पुरस्कार दिला. मराठी भाषा जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवशाहीर बाबासाहेबांचे कार्य व स्मृती चिरंतन राहतील.

अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

Related Stories

मंथन कल्चरल सोसायटीतर्फे अभिनव उपक्रम

Omkar B

मनपा मतदार याद्यांचे काम अंतिम टप्यात

Patil_p

दोन ठिकाणी मटका अड्डय़ांवर छापे; 26 अटकेत

Amit Kulkarni

आज दहावी परीक्षेचा गणितचा पेपर

Patil_p

बेळगावात मेगा लष्कर भरती

Amit Kulkarni

महामोर्चा-काळादिन यशस्वी करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!