तरुण भारत

विद्यमान विजेत्या तामिळनाडूसमोर कर्नाटकचे तगडे आव्हान

सईद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

सईद मुश्ताक अली टी-20 चषक जेतेपदासाठी आज (सोमवार दि. 22) होणाऱया निर्णायक अंतिम लढतीत विद्यमान विजेत्या तामिळनाडूसमोर कर्नाटकचे कडवे आव्हान असणार आहे. यापूर्वी, 2019 मध्ये देखील याच दोन संघात या स्पर्धेतील फायनल झाली आणि त्यात कर्नाटकने एका धावेने निसटता विजय संपादन केला होता. आजच्या लढतीतही उभय संघात विजयासाठी जोरदार संघर्ष अपेक्षित आहे. आजची लढत दुपारी 12 वाजता खेळवली जाणार आहे.

यापूर्वी, 2020-21 च्या उशिराने खेळवल्या गेलेल्या हंगामात सईद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेत तामिळनाडूने बडोदा संघाचे आव्हान मोडीत काढत जेतेपद संपादन केले होते. आता अरुण जेटली स्टेडियमवर आज होणाऱया फायनलमध्ये 2019 मधील कर्नाटकविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्याचा तामिळनाडूचा प्रयत्न असणार आहे.

दुसरीकडे, कर्नाटकचा संघ तिसऱयांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करेल. कर्नाटकने तिसऱयांदा जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी त्यांचा सलामीवीर रोहन कदमला आणखी एक उत्तुंग खेळी साकारावी लागेल. यापूर्वी विदर्भविरुद्ध उपांत्य लढतीत त्याच्या धडाकेबाज खेळीमुळेच कर्नाटकने देदीप्यमान विजय संपादन केला होता. रोहन कदम आणि कर्णधार मनीष पांडे यांच्यावरच तामिळनाडूच्या मजबूत व वैविध्यपूर्ण गोलंदाजीला सामोरे जात फ्लाईंग स्टार्ट मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

कर्नाटकची मधली फळी सातत्यपूर्ण योगदान देण्यात फारशी यशस्वी ठरली नाही. त्यामुळे, आजच्या लढतीत मधल्या फळीतील फलंदाजांनी क्लिक होणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. करुण नायरला अद्याप सूर सापडलेला नसून या निर्णायक लढतीत तरी त्याचा धावांचा दुष्काळ संपुष्टात येण्याची अपेक्षा असेल. बहरातील अभिनव मनोहर, अनिरुद्ध जोशी व बीआर शरथ यांना आघाडीवीरांकडून मजबूत पायाभरणीची अपेक्षा असणार आहे.

गोलंदाजीच्या आघाडीवर मात्र कर्नाटकला बऱयाच चिंता आहेत. त्यांच्या जलदगती ताफ्यात विद्याधर पाटील (4 बळी), व्ही. व्यशक (7 बळी) व एमबी दर्शन (6 बळी) यांचा समावेश आहे. गोलंदाजीतील या त्रिकुटाला फारसा अनुभव नसला तरी संघाला फायनलपर्यंत नेण्यात त्यांनी लक्षवेधी योगदान दिले. आता तामिळनाडूच्या मजबूत फलंदाजीसमोर या तिन्ही गोलंदाजांचा कस लागेल, हे निश्चित आहे.

कर्नाटकला कृष्णप्पा गौतमची (7 बळी) प्रकर्षाने उणीव जाणवणार असली तर केसी करिअप्पा (10 बळी) व जे. सुचित (6 बळी) यांची डावाच्या मध्यातील 8 षटके कशी होतील, यावर या सामन्याची बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.  

तामिळनाडूचा संघ पूर्ण स्पर्धेदरम्यान बहरात

यंदाच्या सईद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेतील पहिल्या लढतीपासूनच तामिळनाडूचा संघ उत्तम बहरात राहिला आहे. या हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत कर्णधार विजय शंकर 181 धावांसह अव्वलस्थानी विराजमान असून यादरम्यान खेळलेल्या 5 सामन्यात त्याने 1 अर्धशतक, 14 चौकार व 8 षटकार नोंदवले आहेत. सामना एकहाती जिंकून देण्याची त्याची क्षमता असून एम. शाहरुख खानचा पॉवर हिटिंग धडाका निर्णायक ठरु शकतो. मागील 2 सामन्यात खेळू न शकलेला डावखुरा मध्यमगती गोलंदाज टी. नटराजन येथे उपलब्ध होणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यापूर्वी हैदराबादविरुद्ध उपांत्य लढतीत संदीप वॉरियर, पी सर्वणा कुमार यांनी लक्षवेधी योगदान दिले होते. तर आर. साई किशोर, एम. अश्विन व आर संजय यादव हे अष्टपैलू खेळाडू देखील उत्तम खेळ साकारत आले आहेत. तामिळनाडू व कर्नाटक यांच्यात यापूर्वी अनेक संघर्षमय लढती रंगल्या आहेत आणि आजही याचीच पुनरावृत्ती झाली तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

Related Stories

इंग्लंडसाठी पुन्हा एकदा फिरकीचा ‘चक्रव्यूह’

Patil_p

सुवर्णपदकाच्या लढतीत दहिया रौप्यजेता!

Amit Kulkarni

पॅरा ऍथलिट्सचे जंगी स्वागत

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया दौरा कार्यक्रम निश्चित

Omkar B

गगन नारंग-अनु राज सिंग लवकरच विवाहबद्ध

Patil_p

चित्तथरारक विजयासह स्पेनची आगेकूच!

Patil_p
error: Content is protected !!