तरुण भारत

काँग्रेस यंदा 80 टक्के तरुण चेहरे देणार

उमेदवारांची पहिली यादी डिसेंबरमध्ये, : प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

राजकारणात काही निर्णय कालानुरूप घ्यावे लागतात. यापूर्वी आम्ही चाळीसही मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर झालेली राजकीय स्थित्यांतरे तसेच राज्यात नवीन पक्षांचा झालेला प्रवेश, यामुळे व्यूहरचना बदलावी लागत आहे. म्हणुनच आता युतीचा विचार चालविला असून त्यादृष्टीने काही पक्षांशी बोलणीही चालू आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने सध्या उमेदवार निवडीचे काम हाती घेतले असून नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पहिली यादी जाहीर करणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. यंदा आम्ही नवीन चेहऱयांना संधी देणार असून 70 ते 80 टक्के नवे चेहरे व तरुण उमेदवार असतील, असे ते म्हणाले. उमेदवार निवडीत गट समित्यांना अधिक प्राधान्य देण्यात येणार असून या गट समित्यांशी चर्चा करूनच प्रदेश निवडणूक समिती आणि केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करणार आहे, असेही चोडणकर म्हणाले.

दरम्यान, युतीबाबतचा विषय केंद्रीय नेते हाताळत आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे डिसोझा यांच्याशी बोलणी केली. त्यांचा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांपर्यंत पोहोचविला असून पुढील निर्णय तेच घेतील, असे चोडणकर म्हणाले.

काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नाही. त्याचा लोकांवर प्रभाव पडत नाही. तसेच आकडेवारीची गणीते पाहता तसे जाहीर करणे उचित ठरत नाही. यापूर्वी भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला होता. त्यामुळेच त्यांची पिछाडी झाली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करताही लोकांनी काँग्रेसचे  17 आमदार विजयी केले. परंतु नंतर सरकार घडविण्यासाठी जे चार आमदार कमी पडले, ती गणीते जुळवताना झालेल्या विलंबातून घडी विस्कटली व आज विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली, असे चोडणकर यांनी सांगितले.

छायापत्रकारांना डावलल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

दरम्यान, स्थानिक चित्रपटांनी इफ्फीतून डावलणे तसेच उद्घाटन सोहळ्यात मीडियाला दूर ठेवणे ही सरकारची कृती म्हणजे गोमंतकीयांचा अपमान असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मनोरंजन संस्था आणि केंद्र सरकराने जनतेची माफी मागावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. आंचिममध्ये गोमंतकीय चित्रपटांना स्थान देण्यात आले नाही. तसेच ऐनवेळी छायापत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश नाकारण्यात आला. ही कृती निषेधार्ह होती. त्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी न मागितल्यास काँग्रेस पक्ष आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

काणकोणातून अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार

Amit Kulkarni

गोवा-बेळगाव चोर्ला रस्त्याच्या बिकट अवस्थेबाबत वाळपई काँग्रेस आक्रमक

Omkar B

पणजीतील सर्वच रस्ते पडले ओस

Amit Kulkarni

यंदा निवडणुकीत ‘व्होट फ्रॉम होम’!

Patil_p

‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’च्या अंतर्गत सर्वांगीण विकास साधणार

Patil_p

ड्रग्स विरोधात आपली भूमिका कायम

Omkar B
error: Content is protected !!