तरुण भारत

नुकसानग्रस्तांना प्रतिगुंठा 68 रुपये साहाय्यधन मिळणार!

खानापूर तालुक्यात कृषी-बागायत खात्याकडून सर्वेक्षण : पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांना अर्जाचे आवाहन

वार्ताहर /खानापूर

Advertisements

खानापूर तालुक्मयात ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने भातपिकांचे मोठे नुकसान केले आहे. मागील आठवडय़ात झालेल्या पावसाच्या तडाख्यात कापणी केलेली भातपिके पाण्याखाली सापडून नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी शेतकऱयांची अर्ज करण्यासाठी कृषी खात्याकडे रीघ लागली आहे. आतापर्यंत जवळपास दोन हजारपेक्षा अधिक शेतकऱयांनी अर्ज दाखल केले असून अपेक्षित कागदपत्रेही जोडण्याचे आवाहन कृषी खात्याने केले आहे.

पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱयांनी त्वरित आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअरद्वारे जीपीएस आधारित नोट कॅम ऍप्स डाऊनलोड करावे व ऍप्सद्वारे शेतकऱयांना उभे करून नुकसानीचा फोटो काढावा व त्यावर शेतीविषयक माहिती व शेतकऱयाची नावनोंदणी करून त्याचा फोटो अर्जासमवेत जोडणे गरजेचे आहे. शिवाय विहित नमुन्यातील अर्जावर पूरक माहिती, शेतकऱयाचे आधारकार्ड, बँक पासबुक जोडून अर्ज करण्याचे आवाहन कृषी खात्याने केले आहे. यानुसार अनेक शेतकरी आपल्या नुकसानीचा फोटो व अर्ज करण्यासाठी धावपळ करत आहेत.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात खानापूर तालुक्मयात जवळपास 3 हजार 672 हेक्टर जमिनीतील कापणी केलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. पाणथळ जमिनीत असलेल्या शेतीत सलग आठ दिवस पाणी साचल्याने कापणी केलेले भातपीक पूर्णतः कुजून गेले आहे. यामुळे जनावरांच्या चाऱयाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकऱयांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

3 दिवसांत पाहणी अहवाल पाठविण्याचे आदेश

नुकसानीची राज्य सरकारने दखल घेऊन तीन दिवसांच्या आत शेतकऱयांच्या पीक नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार खानापूर कृषी खाते व बागायत खात्याने प्रत्येक रयत संपर्क केंद्र विभागांतर्गत पाहणी पथकाची नेमणूक केली असून त्वरित पाहणी करत आहेत. अवघ्या दोन-तीन दिवसांत नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिल्याने अर्ज देण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत.

मळणी करण्याचा प्रश्न गंभीर

खानापूर तालुक्मयात 32 हजार हेक्टर जमिनीत भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी केवळ 10 हजार हेक्टर जमिनीतील पिकाची कापणी व्यवस्थित झाली आहे. जवळपास दहा हजारपेक्षा अधिक हेक्टर जमिनीतील भातपिके पाण्याखाली अडकली आहेत. अवकाळी पावसामुळे उर्वरित भातकापणीही खोळंबली आहे. एकीकडे कापणी केलेले पीक कुजून नुकसान झाले आहे तर उभे असलेले पीक पावसाच्या तडाख्याने खराब झाले आहे. शिवारात पाणी साचून चिखल झाल्याने कापणी करून भातमळणी कशी करायची, याचीच चिंता शेतकऱयांना लागून आहे.

प्रतिहेक्टर 6800 रुपये नुकसानभरपाई मिळणार

नुकसानीसंदर्भात शासनाने दखल घेतली असली तरी प्रतिहेक्टरला केवळ 6800 रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. प्रतिहेक्टरला 6800 रुपये नुकसानभरपाई म्हणजे प्रतिगुंठय़ाला 68 रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे लहान शेतकऱयांना लग्नाला 20 आणि वाजपाला 30 अशी परिस्थिती होणार आहे. कारण बऱयाच शेतकऱयांची 10 ते 20 गुंठे भातपिकाची जमीन पाण्याखाली गेली आहे. एकरी स्वरूपात नुकसान झालेले कमी शेतकरी आहेत. त्यामुळे लहान व सामान्य शेतकऱयांना तुटपुंजी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अर्ज करण्यापासून दूर राहिले आहेत.

पावसाने झालेले नुकसान हे शेतकऱयांच्या माथी आलेले मोठे संकट आहे. गेल्या दोन वर्षात उन्हाळी पिकाने नुकसान झाले. कोरोनाच्या काळात बाजारपेठा थंडावल्याने उन्हाळी पिके रस्त्यावर फेकावी लागली. मान्सूनला सुरुवात झाल्याने पेरणी हंगाम उत्तम झाला. पण मोठय़ा पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसानही झाले होते. त्यातही सावरत पिके उत्तमरित्या पोसली असताना पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान केल्याने जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा राहिला आहे.

शासनाच्या निर्देशानुसार नुकसानभरपाई खात्यावर जमा होणार

खानापूर तालुक्मयात पावसामुळे प्राथमिक सर्व्हेनुसार 3632 हेक्टरमधील भातपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. या नुकसानीची पाहणी करून तीन दिवसांत अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. त्यानुसार विविध भागात पथके तयार करून शेतकऱयांच्या शेतात जाऊन पाहणी केली जात आहे. ज्या शेतकऱयांचे नुकसान झाले आहे त्यांनी नोट कॅम्प आधारित फोटो व पूरक माहिती त्वरित कृषी खात्याच्या कार्यालयात आणून द्यावी, याची पाहणी करून शासनाच्या निर्देशानुसार नुकसानभरपाई शेतकऱयांच्या खात्यावर जमा केली जाईल.

– डी. बी. चव्हाण, कृषी साहाय्यक निर्देशक, खानापूर

Related Stories

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच वाहतूक कोंडी

Patil_p

जमखंडीत दोन महिलांना कोरोनाची बाधा

Patil_p

अधिकाऱयाने ओकली गरळ, कॉन्स्टेबलनी केले सरळ!

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स के. रत्नाकर शेट्टी चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

शहर परिसरात दत्तजयंती साजरी

Patil_p

वीजजोडणीसाठी दिलेला अर्ज गहाळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!