तरुण भारत

एकला चलो रे….

जो आनंदात आहे, ज्याला काही यश मिळालं आहे किंवा ज्याच्याकडे लक्ष्मी आपल्या पायांनी चालत आली आहे त्याच्याकडे लोकांची गर्दी जमायला वेळ लागत नाही. आनंद वाटून घेणं कुणालाही आवडतंच म्हणा. आणि श्रीमंत माणसाकडे येणं जाणं तर प्रत्येकालाच हवं असतं. तेवढाच त्याच्या श्रीमंतीचा किंचितसा का होईना पण उपभोग घेता येईल, त्याच्या संगतीने आपलं स्टेटस वाढेल, कामं करून घेता येतील वगैरे वगैरे विचार करणारी माणसंच भरपूर असतात. पण जर का दुर्दैवाने त्या माणसाच्या पैशाला पाय फुटले तर मात्र कुणीही त्याच्याकडे फिरकतही नाही. त्याने काय करायला नको होतं आणि त्याची संपत्ती कशी ‘खोटय़ाची’ होती ही चर्चा करायला तेवढे सगळे हिरिरीने पुढे येतात. मग एकटय़ाची वाट चालत असणाऱया त्या माणसाला वाटतं,

मरण बरें वाटतें । दारिद्रय़ाहुनि मित्रा तें

Advertisements

दुःख एकदां त्या मरणाचें । परि होतें जे दारिद्रय़ाचें

सततचि तें जाळितें

एकेकाळच्या धनसंपन्न असणाऱया चारुदत्ताची निर्धन अवस्था आल्यावर त्याला सगळे मित्र सोडून जातात तेव्हा त्याच्या राहिलेल्या एकमेव मित्राला उद्देशून तो हे उद्गार काढतो. आपल्याभोवती कितीही माणसं असली तरीही आपल्या कठीण वेळेला त्यांचा काही उपयोग होत नाही. किंबहुना ती आपल्याला टाळतात. आपल्या कठीण काळात आपणच एकटय़ाने लढायचं असतं हे यातून लक्षात येतं. तशीही शहरातील गर्दीत माणसं एकटीच फिरत असतात. आणि मनातल्या मनात म्हणत असतात,

कोलाहलात साऱया माणूस शोधतो मी

गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

या संस्कृतीस साऱया ही चूड लाविली मी

वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी.

कारण अखंड धावणाऱया त्या गर्दीतही माणूस एकटा राहतो. गर्दीला ओळख नसते आणि गर्दीतल्या चेहऱयालाही ओळख नसते. तर गर्दी ज्याच्यामागे धावेल इतकी कीर्ती जो मिळवतो त्यालाच ओळख प्राप्त असते. मात्र त्यालाही आपल्या जाग्यावर एकटय़ाची वाट चालावी लागत असते. कारण शिखरावर उभं राहायचं किंवा पहिल्या क्रमांकावर यायचं म्हणजे तिथे सहकारी नसणार, ती जागा एकटय़ाचीच असते. साथ हवी असेल तर पहिलेपणा बाजूला ठेवण्याची वेळ येऊ शकते. म्हणजे किती गंमत असते पहा! यश मिळवण्यासाठी चालायचं ते एकटय़ाने! खडतर आयुष्यात साथ करायची तर आपले आपणच असतो बहुधा, आणि अमाप यश मिळाल्यावर? तिथेही आपण एकटेच! त्या मुकुटावरचे काटे कसे बोचतात ते आपलं आपल्यालाच ठाऊक! एकलेपणाची आग लागली हृदया

घनदाट दाटली विषण्णतेची छाया

तडफडे जिवाचे पाखरू केविलवाणे

होत ना सहन त्या एकलकोंडे जगणे…

हे असतं प्रेम शोधणाऱया माणसाचं एकटं जगणं. फार जुन्या असलेल्या ‘आंधळय़ांची शाळा’ या नाटकातलं हे गीत अनंत काणेकरांचं आहे. ते गायलं होतं ज्योत्स्नाबाई भोळे यांनी. म्हणजे अगदी सौभद्र मधल्या

बलसागर तुम्ही वीरशिरोमणी, कोठेतरी रमला

आश्वासन जिस दिले तिला का, विसरुनिया गेलां

असा विलाप करणाऱया सुभदेपासून ते वरील नाटकातल्या मनोहरापर्यंत सर्वजण वेगवेगळय़ा प्रकारे त्यांचं एकटेपण व्यक्त करतात. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर हा एकटेपणा माणसाबरोबर असतोच का?

अगदी तंबोऱयाचंच उदाहरण घेऊ. मोजून दोन स्वरांत काम आटोपतं. पंचम, मध्यम किंवा निषाद यापैकी कोणताही एकच स्वर आणि बरोबर फक्त एकटा षड्ज. दोघेही आपापल्या जागी एकटे. षड्ज मंद्र आणि मध्य फिरत राहतो. आणि पंचम मध्यम किंवा निषाद त्याबरोबर चालत राहतो. प्रथमतः सगळय़ा तारा एकेकाच स्वरावर पक्क्या लागाव्या लागतात. पण एकावेळी दोन्हीही छेडून चालत नाहीत तर एकापाठोपाठ एक अशाच छेडाव्या लागतात नाहीतर बेसूर झालंच. आयुष्याचं गमक शोधणाऱया माणसाला एकटेपणाचं अंतिम सत्य गाण्यातून जेवढं उमजतं तेवढं कुठूनही नाही समजत. रस्त्यानं जाणारा बैरागी एकतारी घेऊन वाजवत आपल्याच नादात गात गात जात असतो. तेवढी एकच तार त्याला सूर धरायला पुरते ना? ‘आपलंच तुणतुणं वाजवणं’ हा एक वाप्प्रचार रूढ आहे. ते तुणतुणं तरी काय असतं? एकटय़ाला गायला एकटंच पुरतं. मैफिलीत जोड तानपुरे, चार तानपुरेही वापरले जातात पण एकांतात बसून रियाज करणाऱयाला मात्र एकच तानपुरा लागतो. त्यातही ‘एक सुर साधै सब सुर सधै’ असं पूर्वसुरिंनी म्हटलेलं आहे. म्हणजे गाणाऱयाला मुळात आधी एक गोष्ट पक्केपणाने यावी लागते. त्याच्या पायावर मग इतर अनेक गोष्टी उभ्या राहतात. पुलंनी म्हटल्याप्रमाणे ‘ज्याला धड नीट एक साधत नाही त्याला काहीच साधत नाही.’ गोळाबेरीज काय? तर जे साधायचं असतं तेही एक आणि ते साधण्यासाठी पक्कं व्हावं लागतं तेही एकच. अहो गानदेवता शारदामाता एकाच्या आकडय़ात बसवून रेखाटतो आपण! हे सगळं काय दर्शवतं? एकटेपणा ते एकमेवाद्वितीयत्त्व हा प्रवास सोपा नसतो. मैफिलीच्या उत्कर्षबिंदूवर तर सारं सभागृह एकाच ठिकाणी एकवटतं ते म्हणजे गाणं. अशावेळी पूर्ण सभागृहात सन्नाटा असतो. उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला

जब छूटे गा हुकुम हुजूरी, यम के दूत बडे मजबूत

यम से पडा झमेला, उड जायेगा उड़ जायेगा,

उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला।

संत कबीर यांनी लिहिलेल्या या गीतात माणूस येताना काय किंवा जातानाही काय, एकटाच कसा असतो हे मोठय़ा खुबीने पटवून दिलंय. त्या भजनाचं नशीबही इतकं भारी की ते गायलं आहे तेही अद्वितीय माणसांनी! गायन या विषयात साक्षात सव्यसाची म्हटल्या जाणाऱया कुमार गंधर्वांनी ते गाणं इतकं कमाल मांडलंय की त्यातलं सारं तत्त्वज्ञान सहज उमलून बाहेर यावं. त्यानंतर ते गाणं सुप्रसिद्ध भजनगायक अनूप जलोटा यांनीही वेगळय़ा चालीत गायलंय. पण एकच. की ते एकटेपणाचं अंतिम सत्य सांगतं. बहुतेक कबीरांना सांगायचं असावं की, बाबा रे एकटेपणाला घाबरून जाऊ नकोस. जी माणसं आपली आपली म्हणून तू जवळ करतोयस तो तुझा भ्रमच आहे. उलट एकटेपणातलं मर्म जाण आणि त्याचा उपयोग करून परमेश्वराकडे पोहोच. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी मार्मिक भाष्य केलं आहे ते हेच दाखवण्यासाठी.

जोदि तोर डाक शुने केऊ ना आछे

तोबे एकला चलो रे, तबे पथेर काँटा ओ, तुई रक्तमाला चरन तले एकला दलो रे!

किंवा शांताबाई आपटेंच्या ‘कुंकू’ सिनेमातलं गाणं पहा.

मन सुद्द तुजं गोस्ट हाये प्रिथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गडय़ा भीती कशाची

पर्वाही कुनाची.

जन्माला येणारा, मृत्यू पावणारा, यशाची वाट चालणारा आणि अडचणींना सामोरे जाणारा या सगळय़ांचीच वाट एकटय़ाची असते. न भिता, न खंतावता हातात दिवा धरून आणि जमल्यास दुसऱयाला तो उजेड दाखवून मदत करत एकटय़ाने प्रवास करणं हेच आपलं जीवन आहे.

– अपर्णा परांजपे-प्रभु

Related Stories

पाकिस्तानातील राजकीय संघर्ष

Patil_p

देहाचे प्रेम मनुष्याला बंधनात अडकवते

Patil_p

स्वतःच्या जीवापेक्षा भगवंतांवर प्रेम करणं हीच खरी भक्ती

Patil_p

पाकिस्तानातील अस्वस्थता

Amit Kulkarni

काळ तर मोठा

Patil_p

मुंबईकर चाकरमानी आमचेच, तरीही…!

Patil_p
error: Content is protected !!