तरुण भारत

गोवा राज्यात जत्रोत्सवाची पर्वणी!

गोवा राज्याला ‘सुंदर सोबित राज्य’ (भांगराळे गोंय) म्हणून उपमा दिली जाते. हे राज्य जणू स्वर्ग म्हणून संबोधले जाते. गोव्यात सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने अनेक देशी पर्यटकांनी राज्य फुलून गेले आहे. समुद्रकिनाऱयाच्या फेसाळत्या लाटा अंगावर झेलण्यासाठी तसेच येथील आल्हाददायक निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक गोव्यात येण्यासाठी आसुसलेला असतो. ‘खा, प्या, मजा करा’ संस्कृतीला अनुसरून काही पर्यटक तर मद्याचे पेले रिचवण्यासाठी गोवाला पसंती देतात. एकंदरीत गोवा राज्य अनेकांना भावते. सध्या गोवा राज्यात 52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यामुळे चंदेरी नगरी पणजी राजधानीत अवतरली आहे. या निमित्ताने अनेक चित्रपट अभिनेते, अभिनेत्री येथे येत असतात. निसर्गप्रधान गोवा अनेकांना भावतो. त्यामुळेच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कायमस्वरुपी केंद्र  बनले आहे. यातूनच गोवा राज्याची महती दिसून येते. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवही राज्यात होणार आहे. एकंदरीत या महोत्सवांमुळे गोवा राज्याचे महत्त्व सातासमुद्रापार पोहोचलेले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

गोवा राज्यावर सुमारे साडेचारशे वर्षे पोर्तुगिजांची राजवट होती मात्र येथील सण, उत्सव अबाधित राहिले. राजकीय किंवा वैयक्तिक मतभेद बाजूला करत गोमंतकीय हे सण व उत्सव मोठय़ा आनंदाने व एकोप्याने साजरे करतात. यामुळेच खऱया अर्थाने उत्सवाची परंपरा टिकून राहिलेली आहे. नुकताच काही देवस्थानांचा वार्षिक भजनी सप्ताह दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. मडगाव येथील दिंडी महोत्सवही मोठय़ा उमेदीने साजरा करण्यात आला. या उत्सवांमुळे गोमंतकीयांसह पर्यटकही खऱया अर्थाने सुखावतो.

Advertisements

येथील दिवजोत्सवही आगळावेगळा असतो. यावेळी मंदिरांवर करण्यात येणारी विद्युत रोषणाई आकर्षक असते. दीपमाळा चांगल्या सजविल्या जातात. रात्री सुवासिनींतर्फे दीपोत्सव कार्यक्रम होतो व रात्री नाटक सादर केले जाते. पेडणे तालुक्यातील पालये गावातही दिवजोत्सव वैशिष्टय़पूर्ण असतो. ‘इंगळे स्नान’ हा विधी अभिनव असतो. मानाप्रमाणे ‘दिवजां’ घेऊन मानकऱयांच्या सुवासिनी पालखीबरोबर मंदिरात प्रदक्षिणा घालतात. तद्नंतर इंगळे स्नान होते. यावेळी स्त्रिया मोठय़ा भक्तीने व श्रद्धेने देवाकडे मागणे मागतात. ते मागणे पूर्ण झाले की, केलेल्या नवसाची फेड म्हणून पेटते निखारे आंघोळ म्हणून डोक्यावर घेतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते. तद्नंतर दशावतारी नाटय़प्रयोग होतो. यंदाचा हा दिवजोत्सव कार्यक्रम शनिवार दि. 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

गोवा ही परशुराम भूमी मानली जाते. राज्य छोटे असले तरी उत्सव, महोत्सवांची तसेच विविध परिषदांची मोठय़ा प्रमाणात मांदियाळी असते. अनेक महोत्सवांचे गोवा हे जणू कायमस्वरुपी केंद्र ठरलेले आहे. गोव्यातील समुद्रकिनारे, चर्चेस तसेच विविध मंदिरे पाहण्यासाठी येणारे देशी-विदेशी पर्यटक या उत्सव, महोत्सवांचाही लाभ घेऊन सुखावून जातात. अशा या गोव्यात सध्या विविध देवस्थानांच्या जत्रोत्सवांची रेलचेल सुरू आहे. राज्यात बाराही महिने उत्सवांची पर्वणी असते.

गुलाबी थंडीचे आगमन होताच प्रत्येक गोमंतकीयांना वेध लागतात, ते आपल्या गावातील देवस्थानातील जत्रोत्सवांचे. काही भागात जत्रोत्सवाला कालोत्सव म्हणूनही संबोधतात. गोव्यात ज्याप्रमाणे उदंड देवस्थाने आहेत, त्याचप्रमाणे हजारोंच्या संख्येने जत्राही होत असतात. प्रत्येक देवस्थानच्या वार्षिक उत्सवाबरोबरच जत्रोत्सव हा ठरलेला. जत्रोsत्सवाच्या निमित्ताने सासुरवाशीण वर्षातून एकदा आपल्या माहेरच्या ग्रामदेवतेला ओटी भरते. जत्रोत्सवानिमित्त जणू गावकरी मेळाच भरतो. कोकण, सिंधुदुर्गबरोबरच गोव्यातही जत्रोत्सव उत्साहाने होतो. यानिमित्त प्रत्येकाच्या घरात सग्या-सोयऱयांची उपस्थिती असते. त्यांचे यथोचित स्वागत व उठ-बस केली जाते. त्यांना प्रेमापोटी ‘खाजे’ भेट दिले जाते. गोव्यात तर जत्रोत्सव व खाजे असे जणू समीकरण झालेले आहे.

जत्रोत्सवाचा खास मेन्यू म्हणजे खाजे. जत्रोत्सवानिमित्त खाजे बनविणारे गोव्यातील पारंपरिक व्यावसायिक आज दुर्मीळ होत चालले आहेत. गोवा सरकारने अशा व्यावसायिकांना आधार देणे अत्यावश्यक ठरते. हल्लीच कोरोना काळात नुकसानग्रस्त व्यावसायिकांना आधार म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे गोवा सरकारने जाहीर केले आहे मात्र हे अर्थसाहाय्य तुटपुंजे म्हणावे लागेल. गोव्यात अनेक महिला स्वयंसाहाय्य गट आहेत. ही कला शिकून अर्थार्जनाची मोठी संधी आहे. या खाजे पदार्थाला देश-विदेशात बाजारपेठ मिळवून देण्याच्यादृष्टीने गोवा सरकारने योग्य कामगिरी बजावावी, असे सूचवावेसे वाटते.

गोव्यातील जत्रोत्सव यशस्वी करण्यात कोकण, सिंधुदुर्ग दशावतारी कलाकारांचा सहभाग महत्त्वाचा असतो. आज गोव्यातील कलाकारांना कला व संस्कृती खात्यातर्फे यथायोग्य मानधन मिळते परंतु या कोकणातील दशावतारी कलाकारांना महाराष्ट्राकडून तुटपुंजे मानधन लाभते. तरीसुद्धा ते रंगदेवतेची सेवा बजावतात. गेव्यात ही कला सादर करणाऱया कोकणच्या कलाकारांचा गोवा सरकारने उचित गौरव करणे आवश्यक आहे. प्रत्येक देवस्थानचे जत्रोत्सव वैशिष्टय़पूर्ण असतात. गोव्यात सर्वांत मोठी जत्रा भरते ती, शिरगावच्या देवी लईराईची. यावेळी होणारे होमखण (होमकुंड) प्रसिद्ध आहे. गोव्यातील उत्तरेस असलेल्या शिरगावच्या देवी लईराईची जत्रा अग्निदिव्याची जत्रा म्हणून केवळ गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही प्रसिद्ध आहे. इतर कोणत्याही जत्रेपेक्षा या जत्रेचे स्वरुप काही वेगळेच असते. सर्वसाधारण जत्रांतील बहुतेक कार्यभाग या जत्रेतही असतो. त्याशिवाय देवीच्या भक्तांनी (धोंडांनी) उघडय़ा पावलांनी धगधगत्या निखाऱयावरून अग्निकुंडातून धावत जाण्याचा रोमहर्षक कार्यक्रम हेच या जत्रेचे खास वैशिष्टय़ होय.  एकंदरीत परशुराम भूमी म्हणून प्रसिद्ध असलेली गोमंतकीय संस्कृती जत्रोत्सवाच्यारुपाने उत्तरोत्तर बहरत आहे. ही परंपरा अखंडपणे पुढे चालू राहावी, यासाठी गोमंतकीयांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.  

राजेश परब

Related Stories

“मै काल हूं…..’’

Patil_p

मानवतेचा विचार

Patil_p

माजी राज्यपाल सत्यपाल मलिकनी दिले विरोधकांना कोलित

Patil_p

‘मात्रा’ समूह सहभागातून इराणची आरोग्य गाथा

Patil_p

ऑस्ट्रेलियातील वणव्याचा इशारा

Patil_p

महाराष्ट्र कोरोनामुक्त कधी होणार?

Patil_p
error: Content is protected !!