तरुण भारत

अहंकार माणसाचा सर्वनाश करतो

अध्याय बारावा

साधुमहात्म्य भगवंतांनी मागील अध्यायात बरेचसे स्पष्ट करून सांगितले असले तरी, कर्मठ लोकांच्या ते पचनी पडत नाही असा भगवंतांचा अनुभव असल्याने ते उद्धवाला सांगत आहेत की, निरनिराळी कर्मे, तपे, दाने, यज्ञयाग, शास्त्राभ्यास, यमनियम, लोकोपयोगी कामे इत्यादीमुळे मनुष्य अहंकारी होतो. तो स्वतःला कर्ता समजू लागतो नव्हे तसा त्याचा समज अधिकाधिक दृढ होत जातो. हा त्यांचा अहंकारंच त्यांचा घात करतो आणि ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत पण  जर वरील सर्व गोष्टी त्यांनी निरपेक्षतेनं केल्या आणि साधूचा आश्रय धरून संतांच्या दाराशी गेले, तर ती सर्व माझ्या घरी आली असे होईल. अशा परंपरेने माझी प्राप्ती होते. कारण सत्संगती आपल्या संगाने इतर सर्व अनिष्ट संगांचा नाश करून, रोखठोक माझी प्राप्ती करून देते. सत्संग धरणारे भक्त माझ्या प्राप्तीसाठी आणखी कोणावर अवलंबून राहणारे नसतात. कुंभारणीच्या संगतीत अळी गेली, की तिच्या देहाची स्थिती पालटली असे होते. त्याप्रमाणे संतांची संगती धरली असता भक्त पालटून मद्‌ªपच होतात. चंदनाच्या सभोवार जी निर्गंध व निरुपयोगी झाडे असतात त्यांची लाकडेही चंदनाच्या संगतीने सुगंधी होऊन मोठय़ा किंमतीला चढतात. ती अचेतन का÷sसुद्धा देवांच्या आणि ब्राह्मणांच्या मस्तकावर चंदनाच्या रूपाने राहात असतात. त्यांची श्रीमंतालाही गरज लागते. आणि खरोखर राजेसुद्धा त्यांना वंद्य समजतात. त्याप्रमाणे सत्संगती धरली असता भक्त माझी योग्यता पावतात आणि शेवटी मलासुद्धा ते पूज्य होतात. त्यांचा महिमा किती म्हणून सांगू ? उद्धवा ! माझे स्थान तत्काल प्राप्त व्हावयाला खरोखर संतांच्या संगतीशिवाय दुसरे साधनच नाही हे पक्के लक्षात ठेव. मागे जी साधने सांगितली आहेत ती कधी पूर्णत्वाला जात नाहीत पण ती अपूर्ण साधने ती करणाऱयाचा अभिमान मात्र वाढवते. त्यांना पूर्णत्व साधण्यात येणाऱया अडचणी तुला सांगतो. अष्टांगयोगामध्ये वायु जिंकण्यास अत्यंत कठीण आहे. तो पूर्णपणे कधीच साधत नाही असे समज. बरे, इतकेही करून साधलाच तरी सिद्धींची बुडवणूक असते ती तर अनिवारच होय. नित्यानित्यविचाराचे ज्ञान असते तेथे पांडित्याचा अभिमान बाधक होतो आणि मन द्रव्याची आणि मानाची प्रबळ इच्छा करते. तेथे ज्ञान हेच ज्ञानी पंडिताला विघ्नरूप होते. अहिंसाधर्म आचरताना धार्मिकपणाने पाणी गाळून घेतात पण ते गाळीत असतानाच हजारो जीव प्राणास मुकतात. अशा अधर्माने तो धर्म व्यापलेला असतो. बरे वेदाध्ययन केले तर मुख्य गोष्टीविषयी वेदाने मौनच धरलेले आहे. म्हणून त्याच्या पठणानेही मी प्राप्त होत नाही. यज्ञ व दानधर्म यांची आवड बाळगली असताही मी प्राप्त होत नाही. देहाने तप करू लागले तर, तप करणाराच्या अंगी क्रोध उत्पन्न होतो. तो तापसी त्या क्रोधाला कधी मागे जाऊ देत नाही. त्यामुळे तो क्रोध नित्य वाढतच असतो. सर्वस्वाचा त्याग करून संन्यास ग्रहण केला तर तेथेही देहाभिमान नष्ट होत नाही. विरजा होम केला तरी तो व्यर्थ गेला असे समज. कारण मानाभिमान बाधतातच. श्रौतस्मार्त कर्म यथासांग केले, किंवा जे इष्टापूर्त याग तेही केले, तर तेथे स्वर्गांतील नानाप्रकारचे दिव्य भोग आडवे येऊन पडतात. म्हणून कर्म हे साधकांना क्षयरोगाप्रमाणे विनाशकारी होते. नानाप्रकारची सर्व दाने दिली असता वासना त्या दानाच्या फळाची इच्छा धरते. किंवा दातेपणाचा अनिवार गर्व चढतो, तो काही केले तरी कमी होत नाही. एखादा साधक अनंतव्रत करून व्रती झाला आणि त्याने चौदा गाठीनी देव बांधला, तरीपण शेवटी अनंतालाच तो विसरून गेला आणि त्याने हातचा देव मात्र घालविला असे होते. अनेक प्रकारचे यज्ञ करू लागले असता त्या प्रत्येक यज्ञातील विधि, मंत्र, तंत्र, पात्रशुद्धी इत्यादि पसाऱयामुळे तो याग बहुधा सिद्धीस जात नाही. आणि यदाकदाचित् सिद्धीला गेलाच, तर त्यापासून होणाऱया फलभोगाची पीडा पाठीस लागते. अनेक प्रकारचे वेदमंत्र व गुप्त मंत्र म्हणताना त्यांचा उच्चार अव्यवस्थित होता कामा नये. त्यांत चूक झाल्याने कित्येक मंत्रवादी वेडे झाले आहेत.

Advertisements

क्रमशः

Related Stories

असो ऐसें हरिसंतान

Patil_p

प्रादेशिक आणि राष्ट्रीय!

Patil_p

अफगाणिस्तानः उध्वस्त शिक्षण व्यवस्थेचा काहूर

Patil_p

आनंदाच्या, उत्साहाच्या सणांची मालिका-दीपावली

Omkar B

महाजनस्य संसर्गः…..सुवचने

Patil_p

स्त्रियांमधील वाढती आर्थिक कुशलता

Patil_p
error: Content is protected !!