तरुण भारत

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधानांची भेट

त्रिपुरातील हिंसाचारासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा , सुब्रमण्यम स्वामींच्या भेटीने तर्क-वितर्क

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्ली दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बुधवारी सायंकाळी 5 वाजता त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्या. तत्पूर्वी, दुपारी 3.30 वाजता ममता यांनी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही भेट घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. काही प्रसारमाध्यमांनी स्वामी यांच्या तृणमूल प्रवेशाची शक्यताही वर्तवली आहे.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोतलना ममता बॅनर्जी यांनी राज्यांशी संबंधित अनेक मुद्यांवर चर्चा केल्याचे स्पष्ट केले. बीएसएफच्या कार्यक्षेत्र विस्ताराच्या मुद्यावरही बोलणे झाले असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरातील हिंसाचाराच्या मुद्यांव्यतिरिक्त राज्याच्या विकासाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. त्रिपुरातील विप्लव देव यांचे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरामध्ये होणाऱया नागरी निवडणुकांना स्थगिती देण्याची टीएमसीची याचिका फेटाळून लावली होती.

पोटनिवडणुकीनंतरचा पहिला दिल्ली दौरा

30 सप्टेंबर रोजी झालेल्या भवानीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. तसेच 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या दणदणीत विजयानंतर ममतांची ही दुसरी दिल्ली भेट आहे. या विजयासह त्या सलग तिसऱयांदा बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत.

ममतादीदींना ‘मिशन 2024’चे वेध

ममता बॅनर्जी यांनी 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बंगालमध्ये ‘खेलो होबे’चा नारा दिल्यानंतर, लोकसभा निवडणुकीनंतर तिसरा पर्याय म्हणून स्वतःला उभे करणे हे दीदींचे पुढील लक्ष्य आहे. देशभरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दीदींनी कसरतही सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीकडेही त्यांची नजर आहे.

अनेक नेते टीएमसीमध्ये

ममता यांनी दिल्ली भेटीदरम्यान अनेक बडय़ा नेत्यांना पक्षात सामावून घेतले आहे. मंगळवारी जेडीयूचे नेते पवन वर्मा यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटर कीर्ती आझाद, पत्नी पूनम आझाद, हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार अशोक तन्वर यांनीही ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

Related Stories

राहुल गांधी इटलीला रवाना

Amit Kulkarni

देशात 26,624 नवे कोरोनाबाधित

datta jadhav

आंध्रप्रदेशात 3 राजधान्यांची निर्मिती

Patil_p

हिजबुलच्या चार दहशतवाद्यांना ठार मारले

Patil_p

लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी मुलतानीला जर्मनीतून अटक

Sumit Tambekar

आम आदमी पक्षाचे माजी आमदार जरनैल सिंह यांचे कोरोनामुळे निधन

Rohan_P
error: Content is protected !!