तरुण भारत

भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी आजपासून

कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर दोन्ही दिग्गज संघात जोरदार मुकाबला अपेक्षित

श्रेयस अय्यरला पदार्पणाची संधी, शुभमन गिल-मयांक सलामीला उतरण्याची शक्यता

Advertisements

कानपूर / वृत्तसंस्था

संघातील जागा राखण्यासाठी झगडणारा कर्णधार अजिंक्य रहाणे, खराब फॉर्मशी झुंजत असलेला इशांत शर्मा आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्येही पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी महत्त्वाकांक्षी रविचंद्रन अश्विन, असे वैविध्यपूर्ण कॉम्बिनेशन आजपासून (गुरुवार दि. 25) न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्यात लक्षवेधी ठरणार आहे. उभय संघातील 2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत खेळपट्टीचे स्वरुप देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होत आहे.

युवा फलंदाज श्रेयस अय्यर कसोटी पदार्पणासाठी सज्ज झाला असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्ट संकेत दिले. मात्र, टीम कॉम्बिनेशनबद्दल त्याने काहीही माहिती देणे टाळले. रोहित शर्मा-केएल राहुल या हिट सलामी जोडीबरोबरच कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत, जलद गोलंदाज जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी या लढतीत खेळणार नाहीत. त्यामुळे, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडे पर्यायी राखीव खेळाडूंना आजमावून पाहण्याचा पर्याय उपलब्ध असेल. पहिल्या कसोटीतील भारताच्या फलंदाजीतील आघाडीवीरांमध्ये केवळ रहाणे, पुजारा व मयांक अगरवाल या तिघांनीच 10 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

जर मयांक अगरवालची बॅट तळपली तर केएल राहुलच्या जागेबाबत विचार होऊ शकतो. त्याचप्रमाणे शुभमन गिलने सलामीला धमाकेदार फलंदाजी साकारली तर नियमित सलामीवीर संघात परतल्यानंतर भारतीय संघव्यवस्थापन गिलला मध्यफळीत खेळवण्याचा विचार करु शकते.

रहाणेचा फॉर्म चिंतेचा

संघ कोणताही असो, कर्णधाराचे संघातील स्थान एरवीही निश्चित असते. पण, हीच बाब या कसोटीत नेतृत्व भूषवणाऱया अजिंक्य रहाणेला मात्र लागू होत नाही.  आपली कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठीच अधिक झगडत असलेल्या रहाणेला या हंगामात खेळलेल्या 11 कसोटी सामन्यात जेमतेम 19 ची सरासरी राखता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडविरुद्ध या मालिकेत सूर सापडणे रहाणेसाठी विशेष महत्त्वाचे ठरेल.

रहाणे सराव सत्रात फारसा प्रभावी दिसून आला नाही. तो जयंत यादवच्या ऑफब्रेकवर त्रिफळाचीत होणे धक्कादायक होते. याशिवाय, प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर आऊटसाईड एजसह चेंडू मागे गेला आणि शिवम मावीने छातीपर्यंत उसळणारा बाऊन्सर टाकत रहाणेला आणखी झगडणे भाग पाडले. स्वतः फलंदाजीत झगडत असताना नेतृत्व भूषवणे किती सोपे वा कठीण असेल, हे देखील रहाणेसाठी येथील पहिल्या सामन्यात स्पष्ट होईल. तो टीम साऊदी व नील वॅग्नरला कसा सामोरे जाणार, यावर बरेच काही अवलंबून असेल.

रहाणेप्रमाणेच इशांत शर्मा देखील सध्या बहरात परतण्यासाठी बराच झगडत आहे. 100 पेक्षा अधिक सामने आणि 300 पेक्षा अधिक बळी खात्यावर असणारा इशांत सराव सत्रातही दमदार मारा करु शकला नव्हता. सिराजला अंतिम संघात स्थान मिळाले नाही तर अशा परिस्थितीत सर्व मदार इशांतवरच असेल. यामुळे  त्याच्यावरील जबाबदारी वाढू शकते. नव्या चेंडूवर आताही उमेश यादव हाच प्रथम पसंतीचा पर्याय असणार आहे.

शुभमन-मयांक सलामीला शक्य

नेटमध्ये सराव सत्रातील क्रम पाहता, येथील लढतीत शुभमन गिल, मयांक अगरवाल सलामीला उतरु शकतात आणि त्यानंतर रहाणे, पुजारा, श्रेयस असा क्रम असू शकतो. या परिस्थितीत सुर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, असे चित्र आहे. अक्षर पटेलवरील वर्कलोड कमी करण्याचा प्रयत्न आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बुधवारी जयंत यादवकडून अधिक सराव करवून घेण्यात आला आहे.

न्यूझीलंडचा संघ या लढतीत टीम साऊदी व नील वॅग्नर या जलद गोलंदाजांना तसेच फिरकीच्या आघाडीवर अजाझ पटेल, मिशेल सॅन्टनरसह ऑफस्पिनर विल्यम सॉमरव्हिलेला उतरवण्याचे संकेत आहेत. 

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, केएस भरत (दुसरा यष्टीरक्षक), प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लॅथम (यष्टीरक्षक), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), विल यंग, ग्लेन फिलीप्स (यष्टीरक्षक), डॅरेल मिशेल, टीम साऊदी, नेल वॅग्नर, काईल जेमिसन, विल्यम सॉमरव्हिले, अजाझ पटेल, मिशेल सॅन्टनर, रचिन रविंद्र.

सामन्याची वेळ ः सकाळी 9.30 पासून.

रविचंद्रन अश्विनकडून पुन्हा एकदा क्लासिकल गोलंदाजीची अपेक्षा

मागील काही कालावधीत नियमित कर्णधार विराट कोहलीकडून दुय्यम वागणूक मिळत आलेल्या रविचंद्रन अश्विनला व्यवस्थापनात बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा सन्मानाने संघात स्थान लाभले असून येथे जागतिक क्रमवारीतील आपले अव्वलस्थान सार्थ ठरवण्याचे अश्विनचे प्रयत्न असणार आहेत. तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळ साकारणाऱया केन विल्यम्सनविरुद्ध त्याची जुगलबंदी निश्चितच रंगतदार ठरु शकते. अगदी, रॉस टेलर, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स यांनाही अश्विन-जडेजाला सामोरे जाताना अधिक दक्ष रहावे लागू शकते.

कोट्स

विराट, रोहित, रिषभ, केएल राहुल, बुमराह, शमीसारखे अव्वल खेळाडू येथे खेळणार नसले तरी भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. अव्वल फिरकी गोलंदाजी, हे भारताचे मुख्य अस्त्र असेल. त्यामुळे, त्यांना सामोरे जाताना आम्हाला आमच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

-न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन

माझ्या खराब फॉर्मची मला फारशी चिंता वाटत नाही. प्रत्येक सामन्यात शतक हेच योगदान, असे होऊ शकत नाही. काही वेळा अगदी 30-40 धावांची खेळी देखील अधिक महत्त्वाची असते. भविष्यात काय होईल, याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यावर माझा भर असेल.

-भारताचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे

 थोडक्यात महत्त्वाचे

@कानपूरमध्ये न्यूझीलंडचा संघ आज आपली चौथी कसोटी खेळेल. न्यूझीलंडने यापूर्वी मुंबई व हैदराबादमध्ये प्रत्येकी 5 तर चेन्नईत 4 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, यातील एकाच शहरातील काही सामने वेगवेगळय़ा मैदानावर झाले आहेत.

@न्यूझीलंडला भारतीय भूमीत आजवर खेळलेल्या 34 कसोटी सामन्यात फक्त दोनच वेळा विजय मिळवता आला आहे. त्यांनी यातील पहिला विजय 1969-70 मध्ये नागपूर कसोटीत तर दुसरा विजय 1988-89 मध्ये मुंबई कसोटीत नोंदवला.

@हरभजन सिंगचा 417 बळींचा विक्रम मोडण्यासाठी रविचंद्रन अश्विनला आणखी 5 बळींची आवश्यकता आहे. नवा विक्रम प्रस्थापित केल्यास अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी ऑफस्पिनर असेल.

@उमेश यादव घरच्या भूमीत खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 100 बळींचा टप्पा पार करणारा पाचवा गोलंदाज ठरण्यासाठी आणखी 4 बळींची आवश्यकता आहे. कपिलदेव, जावगल श्रीनाथ, झहीर खान व इशांत शर्मा यांनी यापूर्वी असा पराक्रम गाजवला आहे.

Related Stories

यजमान पाकची मालिकेत विजयी सलामी

Patil_p

एकतर्फी विजयासह पाकिस्तानची मालिकेत बरोबरी

Patil_p

शिखर धवनचे 57 चेंडूत झंझावाती शतक

Patil_p

टॉप सीडेड टेनिसपटूंचे आव्हान समाप्त

Patil_p

भारतीय पुरुष, महिला संघाच्या हार्ड क्वारंटाईनला सुरुवात

Patil_p

महिला विश्वचषकासाठी 9 शहरे निश्चित

Amit Kulkarni
error: Content is protected !!