तरुण भारत

मच्छे-पिरनवाडीतील कचरा समस्या सुटणार कधी?

कचऱयाची समस्या बनली गंभीर : दुर्गंधीमुळे नागरिक हैराण : विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : ग्रा.पं.-प्रशासनाविरोधात तीव्र संताप

वार्ताहर /किणये

Advertisements

मच्छे-पिरनवाडी भागात कचऱयाची समस्या गंभीर बनली आहे. या परिसरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे निदर्शनास येत आहेत. कचऱयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून पाच-सहा वर्षांपासून येथील जनता अक्षरशः वैतागून गेली आहे. ग्राम पंचायत व प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मच्छे-पिरनवाडी भागात नवीन उपनगरे निर्माण झाली आहेत. त्यामुळे चार-पाच वर्षांत मच्छे व पिरनवाडी गावांचा विस्तार वाढला आहे. औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था आदींमुळे नागरिकांना सुखसोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. दोन्ही गावांचा विस्तार वाढल्याने विविध प्रकारची दुकानेही थाटण्यात आली आहेत. मात्र, ठिकठिकाणी असलेल्या कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे नागरिकांना नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनाच्यावतीने नेहमीच विविध योजनांची घोषणा केली जाते. सदर योजना प्रत्यक्षात राबविल्या जातात का? असा सवाल येथील कचऱयाची समस्या पाहिल्यास उपस्थित होऊ लागला आहे. मच्छे येथील मुख्य सर्कलच्या बाजूला, वाघवडे रोडनजीक, बेळगाव-पणजी महामार्गावरील पिरनवाडी चौकाच्या कडेला, पिरनवाडीतील उर्दू शाळेजवळ तसेच पिरनवाडी नाल्याशेजारी कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. विविध दुकानांतील टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक बाटल्या, चिकन व मटणाच्या दुकानांतील टाकाऊ पदार्थ, मृत कुत्री आदी सर्वच या ढिगाऱयांमध्ये टाकण्यात येत आहेत. काही जण रात्रीच्या वेळी पोती भरून या ठिकाणी कचरा फेकतात. या परिसरात नर्सरी, शाळा, कॉलेजही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. येथील कचऱयामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे पालकवर्गामध्ये चिंता पसरली आहे.

कचऱयाच्या ठिकाणी चिकन व मटण दुकानांतील टाकाऊ पदार्थ टाकण्यात येत आहेत. ते खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा या ठिकाणी मुक्तपणे संचार असतो. ही भटकी कुत्री केव्हाही रस्त्यावरून धावत असतात. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. महिला व शालेय विद्यार्थ्यांवर ही कुत्री धावून जात आहेत.

मच्छे व परिनवाडी ग्रा.पं.ना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. यामुळे दोन्ही ग्रा.पं.ची निवडणूक झाली नाही. पिरनवाडीतील नाल्याजवळील कचऱयाची साफसफाई आठ-दहा दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र, सध्या पुन्हा कचरा टाकण्यात आला असल्याने येथील परिस्थिती जैसे थेच आहे.

दुर्गंधीला ग्रामस्थ वैतागले

कचऱयाच्या दुर्गंधीमुळे आम्ही ग्रामस्थ वैतागून गेलो आहे. विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या जटिल बनलेली आहे. यासाठी मच्छे व पिरनवाडी ग्रा. पं. नी कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

-किरण आपटेकर, पिरनवाडी           

भेडसावणारी कचरा समस्या

मच्छे व पिरनवाडी या दोन्ही गावांचा विस्तार वाढला असल्याने कचरा समस्या अधिक प्रमाणात भेडसावू लागली आहे. दोन्ही गावांच्या ग्राम पंचायतींनी ठिकठिकाणी कचराकुंडय़ा ठेवून नागरिकांना त्या कचरा कुंडय़ांमध्येच कचरा टाकण्याची सक्ती करायला हवी. तसेच कुठेही अस्ताव्यस्त कचरा टाकून देणाऱयांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.                     

-सचिन बेळगावकर, मच्छे

Related Stories

स्वच्छता कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा

Amit Kulkarni

कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये ३१जुलैपर्यंत बंद राहणार

Abhijeet Shinde

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

Omkar B

बेळगावसह चार जिल्हय़ांमधील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल

Amit Kulkarni

नगरविकासमंत्र्यांच्या हस्ते मनपाच्या कचरावाहू वाहनांचा शुभारंभ

Patil_p

संचयनी चौकाला डॉ.आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी

Omkar B
error: Content is protected !!