तरुण भारत

‘मल्टिलेव्हल’चा गुंतवणूकदारांना कोटय़वधीचा गंडा

गोकाकमधील कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल : 75 दिवसांत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे नागरिकांना आमिष

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

एकेकाळी मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणांनी बेळगाव जिल्हा ठळक चर्चेत आला होता. आता जिल्हय़ात पुन्हा एमएलएमचे अड्डे सुरू झाले असून जिल्हा पोलिसांनी गोकाक येथे झटपट नफा देण्याचे सांगून गुंतवणूकदारांना ठकविणाऱया एका कंपनीविरुद्ध बुधवारी एफआयआर दाखल केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी या वृत्ताची खातरजमा केली आहे.

भा.दं.वि. 406, 420, 149 बरोबरच द बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स-2019 कलम 21(1),(2) अन्वये पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या नव्या कायद्यानुसार प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला असून भीमशी हेगडे, महादेव निंगोळी, अश्वीनकुमार पोतदार, निजामुद्दीन जकाती, चंद्रशेखर आनंद व इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गोकाक येथील एका गुंतवणूकदार युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे सर्वजण स्टार्टमनी डॉट ईन या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन गुंतवणूक करून घेत होते. कमीवेळेत जास्तीत जास्त परतावा देण्याचे सांगून त्यांनी मोठय़ा प्रमाणात धंदा थाटला होता. मल्टिलेव्हल मार्केटिंगला सध्या बंदी असूनही गोकाक परिसरात त्यांनी व्यवहार सुरू केला होता. 10 हजार रुपये गुंतवणूक केल्यास प्रतिदिनी 288 रुपयेप्रमाणे 75 दिवसांपर्यंत 21 हजार 600 रुपये, 25 हजार रुपये गुंतवणूक केल्यास रोज 742 रुपयेप्रमाणे 75 दिवसांनंतर 55 हजार 650 रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. 50 हजार रुपये गुंतवणूक केल्यास रोज 1507 प्रमाणे 75 दिवसांनंतर 1 लाख 13 हजार रुपये, जर एक लाख रुपये गुंतविल्यास रोज 3 हजार 60 रुपयेप्रमाणे केवळ 75 दिवसांत 2 लाख 29 हजार 500 रुपये असा दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे सांगून रक्कम भरून घेतली जात होती.

आकर्षक भूलथापा

यावेळी एक लाख रुपये भरणाऱयांना 50 ग्रॅम चांदी, 3 लाख रुपये गुंतवणूक करणाऱयांना 5 ग्रॅम सोने, 4 लाख रुपये गुंतवणूक करणाऱयांना एक तोळा सोन्याचे बक्षीस देणार, असे सांगण्यात येत होते. या भूलथापांना बळी पडून सुमारे 600 हून अधिक जणांनी या कंपनीत लाखो रुपये गुंतवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

11 नोव्हेंबरपासून गोकाक येथील या कंपनीचे कार्यालय बंदच असल्याने आपण फसलो गेलो, हे गुंतवणूकदारांना समजून आले. त्यामुळे फिर्याद दाखल करण्यासाठी गुंतवणूकदार गोकाक पोलीस स्थानकात दाखल झाले. केवळ सात महिन्यांपूर्वी ही कंपनी सुरू झाली होती. सुरुवातीला गुंतवणूकदारांना रोज परतावा दिला जात होता. नंतर आठवडय़ातून एकदा परतावा दिला जात होता. सध्या परतावा बंद करण्यात आला होता. गोकाक पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

बेळगाव प्रमुख कार्यक्षेत्र…

गेल्या पंधरा वर्षांपूर्वी मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून बेळगावकरांना शेकडो कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. राज्य सरकारने बेळगाव येथील ही प्रकरणे चौकशीसाठी सीआयडीकडे दिली होती. सीआयडीने तपास करून न्यायालयात आरोपपत्रेही दाखल केली आहेत. अशा अनेक प्रकरणात गुंतलेल्या गुन्हेगारांबरोबर तत्कालीन काही पोलीस अधिकारी सामील झाल्याचे सीआयडीच्या तपासात उघडकीस आले होते. मध्यंतरी अशा चुना लावणाऱया कंपन्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. गोकाक येथे एफआयआर दाखल झाला असून साखळी पद्धतीने चालणाऱया या फसव्या कंपन्यांपासून सामान्यांनी सावधानता बाळगणे जरुरीचे आहे. कारण केवळ दीड-दोन महिन्यात दुप्पट-तिप्पट परतावा मिळविण्याच्या आशेने यापूर्वी हजारो नागरिकांनी आयुष्यभराची कमाई गमावली आहे.

Related Stories

गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर, गोठा खाक

Patil_p

सोमवारी 35 वाहने-विनामास्क फिरणाऱया 220 जणांवर कारवाई

Amit Kulkarni

बेळगाव : ‘जीवनरेखा रुग्णालया’त कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात

Rohan_P

चोरीप्रकरणी दोघांना अटक

Amit Kulkarni

हलगा ग्रामस्थांना ती सात एकर जागा गायरानसाठी द्या

Patil_p

व्यवसाय परवाण्यासाठी अर्ज करण्याचे कॅन्टोन्मेंटचे आवाहन

Patil_p
error: Content is protected !!