तरुण भारत

क्रिप्टोकरन्सीचे मायाजाल

सध्या आर्थिक क्षेत्रात ‘क्रिप्टोकरन्सी’ गाजत आहे. क्रिप्टोकरन्सी याचा अर्थ आभासी चलन. अर्थात, जे चलन प्रत्यक्ष हाताळता येत नाही, किंवा जे नोटा अथवा नाणी यांच्या स्वरुपात उपलब्धही असत नाही, असे चलन. यालाच डिजिटल चलन असेही म्हणतात. ‘बिटकॉईन’ हे या आभासी चलनांपैकी सर्वात प्रसिद्धी मिळविलेले चलन मानले जाते. अनेक धनवंतांनी या आभासी चलनांमध्ये आपले ‘खरे’ किंवा अधिकृत पैसे गुंतवले आहेत. जगभरात हा कल सध्या दिसून येतो. जुगार किंवा बेटिंग यांवर जसा पैसा लावला जातो, तशाच प्रकारे या चलनांमध्येही ऑल लाईन प्रक्रियेच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते, असे दिसून येते. या चलनांची किंमत वाढेल त्यामुळे लाभ होईल अशी भावना या गुंतवणुकीमागे प्रामुख्याने असते. थोडक्यात, सध्यातरी ही गुंतवणूक ‘स्पिक्युलेटिव्ह’ पद्धतीची असल्याचे तज्ञांचे मत आहे. या चलनांच्या व्यवहारातून फसवणूक होत आहे, असे आरोप होत असून सरकारने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला लवकरच प्रारंभ होणार असून त्यात या चलनांवर नियंत्रण आणण्यासाठी विधेयक सादर होणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व ‘खासगी’ आभासी चलनांवर बंदी आणली जाणार असून अधिकृत आभासी चलनांचे व्यवहार सशर्त चालू दिले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर भारताची रिझर्व्ह बँक स्वतःचेच एक डिजिटल चलन आणण्याच्या विचारात आहे. अशा चलनांवर पूर्ण बंदी घालणे अशक्य असून सरकारने काही प्रमाणात त्याला अनुमती द्यावी, असेही विचारही काही अर्थपंडितांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळेच या आभासी चलनांचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे. प्रथम हे चलन नेमके काय आहे हे समजून घेऊन नंतर त्याच्या परिणामांचा विचार करावा लागतो. ज्या प्रमाणे आपण खरेदी-विक्रीचे व्यवहार रुपया या चलनात करतो, तसेच व्यवहार या आभासी चलनांच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात करता येतात. प्रत्येक देशाचे एक अधिकृत चलन असते. त्या देशातील सर्व व्यवहार त्याच चलनातून करावेत असा दंडकही असतो. त्यामुळे या अधिकृत चलनाचा एकाधिकार प्रत्येक देशात आर्थिक व्यवहारांवर असतो. असा एकाच चलनाचा एकाधिकार का असावा, असा प्रश्न काहींना पडला आणि त्यातून ही आभासी चलनांची संकल्पना अस्तित्वात आली असे मानले जाते. सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. प्रत्येक व्यवहारात आणि क्षेत्रात स्पर्धा असते. अशा स्थितीत प्रत्येक देशाचे चलन मात्र एकमेव असण्याऐवजी त्यातही स्पर्धात्मकता असावी आणि लोकांना विविध चलनांचा पर्याय उपलब्ध असावा, अशीही संकल्पना आभासी चलनांच्या निर्मितीमागे आहे, असे बोलले जाते. 2009 मध्ये बिटकॉईन हे पहिले आभासी चलन बाजारात आले. आता या चलनाने जगभर जाळे विणले असून एकमेकांशी जोडलेल्या असंख्य संगणकांच्या माध्यमातून या चलनाचे व्यवहार चालतात. त्यानंतर बिटकॉईनलाही स्पर्धा करण्यासाठी अनेक अशी चलने बाजारात आणण्यात आली आहेत. काही देशांनी या चलनांना मर्यादित मान्यताही दिली असून त्यांच्या व्यवहारांचे नियम बनविले आहेत. सध्या खासगी आणि अधिकृत अशी मिळून 20 हून अधिक आभासी चलने उपलब्ध आहेत, असे सांगण्यात येते. या चलनांमधून केलेल्या व्यवहारांचे हिशेब हे ऑनलाईनचे ठेवले जातात तसेच त्यांचे ‘लेजर’ (खतावणी) ही ऑनलाईन असते. अतिवेगाने हस्तांतरण हे या चलनांचे वैशिष्टय़ सांगितले जाते. जगात कोठूनही कोठेही ही चलने काही मिनिटांच्या अंतरात हस्तांतरीत होऊ शकतात आणि त्यामुळे व्यवहारांचा वेग आणि अचूकता वाढते असा दावा केला जातो. सध्या ‘डार्कोइन’ आणि ‘डॅश’ यांची बिटकॉईनला जोरदार स्पर्धा होत आहे, असे सांगण्यात येते. आभासी चलनांचे हे लाभ आणि त्यांची व्यवहारसुलभता गोंडस वाटते. पण कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचे जसे दुष्परिणाम असतात तसे या चलनांचेही आहेत आणि ते दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीत. सर्वप्रथम, आभासी चलन प्रत्यक्ष हाताळता येत नाही. तसेच त्यावर नेमके कोणाचे नियंत्रण असते किंवा असावे यासंबंधीही संभ्रमाची स्थिती आहे. अद्याप या चलनांनी प्रत्येक देशाच्या अधिकृत चलनांसमोर फारसे मोठे आव्हान उभे केले नसल्याने जगातील साऱया देशांनी एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रणासाठी नियम ठरविलेले नाहीत. कोणत्याही देशाचे अधिकृत चलन हे त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणात असते. चलनाचे प्रमाण, चलनी नोटांची अगर नाण्यांची निर्मिती, नोटा किंवा नाणी रद्द करणे, या चलनाची इतर देशांच्या चलनांशी तुलना करुन त्यांचे आंतरराष्ट्रीय मूल्य ठरविणे, आपल्या देशाच्या चलनाचे अवमूल्यन करणे किंवा मूल्यवर्धन करणे इत्यादी अधिकार या मध्यवर्ती बँकेकडे असतात. या चलनांच्या व्यवहारात फसवणूक झाल्यास किंवा गैरव्यवहार झाल्यास दाद मागण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी एक अधिकृत यंत्रणा असते. त्यासंबंधातील कायदेही असतात. परिणामी या प्रचलित चलनांसंबंधी सुरक्षितेतेची स्थिती असते. तथापि, आभासी चलनांसंबंधी या सुरक्षिततेची शाश्वती देता येत नाही. या चलनांचे मूल्य त्यांच्यात होणाऱया अधिकृत चलनांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात ठरते. याचाच अर्थ असा की आजही अधिकृत चलनांचाच मापदंड या आभासी चलनांच्या मूल्यनिर्धारणासाठी उपयोगात आणण्यात येतो. (उदाहरणार्थ, एका बिटकॉईनचे मूल्य मध्यंतरी 60 हजार डॉलर पर्यंत पोहचले होते.) तथापि, ही आभासी चलनव्यवस्था हाताळण्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था आहे, या संबंधी नेमकेपणाने सांगता येत नाही. तसेच खासगी आभासी चलनांचे नियंत्रण दहशतवादी आणि त्यांच्या संघटना किंवा अंमली पदार्थांची विक्री करणाऱया टोळय़ा तसेच संघटित गुन्हेगारी करणाऱयांच्या हाती पडले तर अनर्थ ओढवू शकतो. त्यामुळे कठोर नियम आणि अधिकृत नियंत्रण व्यवस्था निर्माण झाल्याखेरीज या चलनांच्या मागे लागणे शहाणपणाचे नाही. त्यामुळे ही आभासी चलने हे मायाजाल असून सरकारने कठोर नियम करुन त्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

सायकल आणि पोलीस

Patil_p

बिळामाजी आस्वलमार्ग

Patil_p

प्रत्यक्ष झालासि तूं अधोक्षज

Patil_p

सावधान, ऑनलाईन शॉपिंग-फसवणुकीचा नवा धंदा

Patil_p

गोव्यातील सांस्कृतिक वैभवाला कोरोनामुळे ब्रेक!

Patil_p

हिवाळी अधिवेशन, सरकारला घाम

Patil_p
error: Content is protected !!