तरुण भारत

पदार्पणवीर श्रेयस अय्यरचे नाबाद अर्धशतक

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 258, शुभमन-जडेजाचीही अर्धशतके, श्रेयस-जडेजाची 113 धावांची अभेद्य भागीदारी, जेमिसनचे 47 धावात 3 बळी

वृत्तसंस्था /कानपूर

Advertisements

तंत्रशुद्ध फलंदाजी, नजाकतदार फटके आणि आक्रमकता ठासून भरलेल्या पदार्पणवीर श्रेयस अय्यरच्या नाबाद 75 धावांच्या क्लासिकल खेळीमुळे भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर 4 बाद 258 धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेरीस श्रेयस 136 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 75 तर डावखुरा रविंद्र जडेजा 100 चेंडूत 6 चौकारांसह 50 धावांवर नाबाद राहिले. किवीज संघातर्फे काईल जेमिसनने 47 धावात 3 बळी घेतले.

वेगवान गोलंदाजीला फारसे अनुकूल नसलेल्या, मात्र काही चेंडू अचानक उसळून वर येत असलेल्या येथील खेळपट्टीवर श्रेयस अय्यरची फटकेबाजी डोळय़ाचे पारणे फेडणारी ठरली. चेतेश्वर पुजारा (88 चेंडूत 26) बाद झाल्यानंतर भारताची 3 बाद 106 अशी स्थिती असताना अय्यर क्रीझवर आला. हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे (65 चेंडूत 35) बाद झाल्याने पुढे भारताला आणखी एक धक्का बसला. पण, त्यानंतर अय्यर व रविंद्र जडेजा (100 चेंडूत नाबाद 50) ही जोडी जमली आणि किवीज गोलंदाजांना त्यांनी उर्वरित खेळात आणखी यश मिळू दिले नाही.

रविंद्र जडेजाने 17 वे अर्धशतक पूर्ण केले आणि आपल्या तलवारबाजीसदृश्य ट्रेडमार्क शैलीने अर्धशतकाचा आनंद साजरा करत चाहत्यांचे मनोरंजनही केले. श्रेयसने रणजी चषक आणि एकंदरीत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपला अनुभव येथे पणाला लावत न्यूझीलंडच्या जेमिसन-साऊदीसारख्या अव्वल गोलंदाजांना जेरीस आणले.

मुंबईच्या खडूस स्टाईल फलंदाजीची उत्तम प्रचिती देत त्याने सावध व आक्रमक फलंदाजीचा उत्तम मिलाफ साधला. त्याने डावखुरा स्पिनर अजाझला लाँगऑनच्या दिशेने खेचलेला षटकार आणि डावखुरा फिरकीपटू रचिन रविंद्रला आयपीएल प्ले-बुकमधील लॅप स्कूपचा फटका विशेष लक्षवेधी ठरला. श्रेयस अय्यरच्या या दमदार फलंदाजीमुळेच अजाझ (21-6-78-0) व ऑफ ब्रेक बॉलर विल्यम सॉमरव्हिलेची (24-2-60-0) पाटी कोरी राहिली.

जेमिसनचे तिहेरी धक्के

तत्पूर्वी, उंचापुऱया काईल जेमिसनने 47 धावात 3 बळी घेत भारतीय आघाडी फळीला सातत्याने धक्के दिले. मात्र, सलामीवीर शुभमन गिलचे अर्धशतकही लक्षवेधी ठरले. शुभमनने 93 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. जेमिसनने बॅट व पॅडमधील गॅप हेरत शुभमनचा त्रिफळा उडवला. मात्र, अय्यरला रोखणे किवीज ताफ्यातील एकाही गोलंदाजाला शक्य झाले नाही. मयांक अगरवाल 13 धावांवर यष्टीमागे झेल देत परतला.

सॉमरव्हिलेच्या गोलंदाजीवर पायचीतच्या जोरदार अपीलवर अम्पायर कॉलमुळे बचावलेल्या अय्यरने नंतर किवीज गोलंदाजांवर एककलमी वर्चस्व गाजवले. त्याने जडेजासह 113 धावांची शतकी भागीदारी साकारली, ते दिवसभराच्या खेळातील ठळक वैशिष्टय़ ठरले. पुजारा (26) व अजिंक्य रहाणे (35) मात्र आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकले नाहीत. चेतेश्वर पुजारा साऊदीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे ब्लंडेलकडे झेल देत बाद झाला तर रहाणेचा जेमिसनने त्रिफळा उडवला.

धावफलक

भारत पहिला डाव : मयांक अगरवाल झे. ब्लंडेल, गो. जेमिसन 13 (28 चेंडूत 2 चौकार), शुभमन गिल त्रि. गो. जेमिसन 52 (93 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा झे. ब्लंडेल, गो. साऊदी 26 (88 चेंडूत 2 चौकार), अजिंक्य रहाणे त्रि. गो. जेमिसन 35 (63 चेंडूत 6 चौकार), श्रेयस अय्यर खेळत आहे 75 (136 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), रविंद्र जडेजा खेळत आहे 50 (100 चेंडूत 6 चौकार). अवांतर 7. एकूण 84 षटकात 4 बाद 258.

गडी बाद होण्याचा क्रम

1-21 (मयांक, 7.5), 2-82 (शुभमन, 29.6), 3-106 (पुजारा, 37.4), 4-145 (रहाणे, 49.2).

गोलंदाजी

टीम साऊदी 16.4-3-43-1, काईल जेमिसन 15.2-6-47-3, अजाझ पटेल 21-6-78-0, विल्यम सॉमरव्हिले 24-2-60-0, रचिन रविंद्र

श्रेयसला गावसकरांकडून टेस्ट कॅप प्रदान

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या श्रेयस अय्यरला या सामन्यापूर्वी माजी कर्णधार व महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ‘टेस्ट कॅप’ प्रदान केली.  श्रेयस अय्यर हा राष्ट्रीय संघात कसोटी पदार्पण करणारा भारताचा 302 वा खेळाडू ठरला. एरवी, पदार्पण करत असलेल्या खेळाडूला प्रशिक्षक, कर्णधार किंवा संघातील वरिष्ठ खेळाडूकडून कॅप प्रदान केली जाते. मात्र, विद्यमान प्रशिक्षक द्रविड यांनी यासाठी गावसकरांना निमंत्रित केले. यापूर्वी टी-20 मालिकेत हर्षल पटेलला पदार्पणाची कॅप देतानाही द्रविडनी अजित आगरकरला निमंत्रित केले होते.

मागील काही वर्षात प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण योगदान देणाऱया श्रेयस अय्यरचा अनुभव कसोटी पदार्पणात त्याच्यासाठी विशेष फलदायी ठरला. त्याच्या कसोटी कारकिर्दीची अतिशय उत्तम सुरुवात झाली आहे. भविष्यातील वाटचालीबद्दल त्याला खास शुभेच्छा!

-दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग

सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप

सत्र     षटके धावा   बळी

  • पहिले 29      82      1
  • दुसरे   27      72      3
  • तिसरे 28        104      0

Related Stories

टोकियो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर

Patil_p

वनडे, कसोटीचे नेतृत्व विराटकडेच हवे – सेहवाग

Patil_p

कर्णधार करुणारत्नेचे नाबाद शतक

Patil_p

क्लब क्रिकेटपटू संजय डोबाल यांचे कोरोनामुळे निधन

Patil_p

इंटर मिलानचे प्रशिक्षण लवकरच सुरू

Patil_p

पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद शमी तंदुरुस्त

Patil_p
error: Content is protected !!