तरुण भारत

ख्रिश्चन समाजाला भाजपने येत्या निवडणुकीत 35 टक्के जागा द्याव्यात

आमदार कार्लुस आल्मेदा यांची मागणी, नड्डा यांना लिहिले पत्र

प्रतिनिधी/ वास्को

Advertisements

गोव्यात अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाला भाजपने आतापर्यंत निवडणुकीत दिलेली संधी पक्षाला फलदायी ठरलेली आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये ख्रिश्चन उमेदवारांनी भरीव यश प्राप्त केलेले आहे. सद्यस्थितीतही भाजपाकडे 14 ख्रिश्चन आमदार आहेत. राज्य विधानसभेत भाजपाच्या ख्रिश्चन आमदारांचे बळ पाहता येत्या निवडणुकीत भाजपाने 35 टक्के जागा ख्रिश्चन उमेदवारांना देणे योग्य ठरेल असे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी म्हटले आहे. यासंबंधी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जी.पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे.

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी शनिवारी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 2012 पासून भाजपामध्ये ख्रिश्चन आमदारांचे स्थान, त्यांनी मिळवलेले यश, सद्यस्थितीत भाजपाकडे असलेले ख्रिश्चन आमदारांचे बळ आणि येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ख्रिश्चन उमेदवारांना झुकते माप का द्यावे याविषयी माहिती दिली. या पत्रकार परिषदेला मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, फेड्रीक हेन्रीक्स, देविता आरोलकर, माथायस् मोंतेरो, नारायण बोरकर, अमेय चोपडेकर तसेच धनपाल स्वामी उपस्थित होते.

भाजपकडे 14 ख्रिश्चन आमदारांचे बळ

आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी 2012 मध्ये सर्वांना सामावून घेण्यासाठी ख्रिश्चन उमेदवारांना संधी देण्याचे धोरण निश्चित केले होते. त्या निवडणुकीत जनतेनेही त्यांच्या धोरणाला साथ देताना पाच ख्रिश्चन उमेदवार निवडून आणले होते. तसेच भाजपाच्या पाठिंब्यावर दोन अपक्ष उमेदवारही जिंकून आले होते. त्यानंतर मागच्या निवडणुकीत पक्षाने आठ ख्रिश्चन उमेदवारांना संधी दिली होती. भाजपाने मागच्या निवडणुकीत केवळ तेरा आमदारांचे यश मिळवले तरी त्यापैकी 7 जण ख्रिश्चन होते. भाजपने सर्वच मतदारसंघात उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे जवळपास 25 टक्के यश ख्रिश्चन उमेदवारांना लाभले होते. पक्षाने ख्रिश्चन उमेदवारांना योग्य संधी देण्याचा घेतलेला निर्णय दोन्हीवेळा सफल ठरला होता. 2019 साली दहा आमदारांनी काँग्रेसमधून भाजपात पक्षांतर केले. त्यात आठ आमदार ख्रिश्चन होते. त्यामुळे भाजपा गोव्यात अधिक बळकट झाला. आज भाजपाकडे गोव्यात 14 ख्रिश्चन आमदारांचे बळ आहे.

ख्रिश्चन अल्पसंख्यांक उमेदवारांनी आतापर्यंत सतत मिळवून दिलेले यश पाहता या समाजातील उमेदवारांना संधी देणे किती महत्त्वाचे आहे याची प्रचिती येते. भाजपाकडे असलेले ख्रिश्चन आमदारांचे विधानसभेतील 35 टक्के बळ पाहता येत्या निवडणुकीत पक्षाने 35 टक्के जागा ख्रिश्चन उमेदवारांना द्यायला हव्यात. या कृतीतून या समाजात योग्य तो संदेश जाईल व अधिकाअधीक मतदारसंघ जिंकणे शक्य होईल असे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी स्पष्ट केले. हे मुद्दे आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहेत. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही त्यांनी यासंबंधी लिहिले आहे.

मुरगावचे नऊ नगरसेवक आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या मागेच उभे राहणार

या पत्रकार परिषदेत आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मुरगाव पालिका मंडळातील आपले सर्व समर्थक नगरसेवक एकत्र असून येत्या निवडणुकीत ते आपल्यासोबतच असतील यात संदेह नसल्याचे स्पष्ट केले. भाजपाची उमेदवारी आपल्याला सोडून दुसऱयाला दिली जाईल अशी चर्चा मागच्या निवडणुकीतही होत होती. यंदाही अशी चर्चा असली तरी पक्षाचा उमेदवार आपणच असेन याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. भाजपा नेत्यांनी यापूर्वीच माध्यमांना वास्कोत भाजपा यशस्वीपणे आणि योग्यपध्दतीने कार्यरत असल्याची माहिती दिलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुरगावचे नऊ नगरसेवक आमदार आल्मेदा यांच्याचमागे ः नगरसेवक कामुर्लेकर

आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थनार्थ बोलताना नगरसेवक यतीन कामुर्लेकर तसेच फेड्रीक हेन्रीक्स यांनी कोणत्याही परिस्थितीत मुरगावचे नऊ नगरसेवक आमदार कार्लुस आल्मेदा यांच्याचमागे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. वास्कोतील कदंब स्थानकाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन ठेकेदार कंपनी निवडण्यात येणार असून त्यासाठी मंडळाची नुकतीच मान्यताही मिळालेली आहे. मासळी मार्केटचेही काम सुरू होणार असल्याचे विकासकामांविषयी बोलताना आमदार कार्लुस आल्मेदा यांनी स्पष्ट केले.

Related Stories

एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये एफसी गोवा चमकणार

Amit Kulkarni

आलेक्स रेजिनाल्ड अपक्ष म्हणून लढवणार निवडणूक

Sumit Tambekar

मतदारसंघनिहाय पाणीप्रश्न उपाययोजना आराखडा करा

Patil_p

सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल

Amit Kulkarni

निवडणुका जवळ आल्या की सरकारला नोकऱया व खनिज विषय आठवतो

Patil_p

मुस्लिम बांधवांनी घरीच केला ईद

Omkar B
error: Content is protected !!