तरुण भारत

सरपंच, उपसरपंचाची ग्रामसभेला दांडी

ग्रामस्थालाच निवडले सभेचे अध्यक्ष : तिवरे – वरगांव ग्रामसभेत प्रचंड गदारोळ

वार्ताहर / माशेल

Advertisements

वैद्यकीय कारण देऊन सलग तीन ग्रामसभांना सरपंचानी लावलेली अनुपस्थिती व उपसरपंचही अनुपस्थित राहिल्याने तिवरे वरगाव पंचायतीच्या ग्रामसभेत त्याचे तिव्र पडसाद उमटले. संतप्त ग्रामस्थानी उपस्थित असलेल्या इतर पंचसदस्यांऐवजी एका ग्रामस्थालाच सभेच्या अध्यक्षस्थानी बसविण्याचा निर्णय घेतल्याने बाका प्रसंग निर्माण झाला. या प्रचंड गदोळात अखेर ग्रामसभा तहकुब करावी लागली. माशेल येथील लोटस सभागृहात रविवारी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

ग्रामसभेला सरपंच उन्नती नाईक व उपसरपंच सिद्धार्थ गाड हे अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सरपंच उन्नती नाईक यांनी सभेच्या एकदिवस आधी म्हणजे शनिवारी वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आपण सभेला उपस्थित राहू शकणार नसल्याचे पंचायतीला लेखी पत्र दिले होते. सभेचे कामकाज सुरु होताच, सचिवांनी हे पत्र सभेसमोर ठेवले. सरपंचाच्या अनुपस्थितीत सभेचे अध्यक्षपद उपसरपंचाकडे येते. मात्र उपसरपंच सिद्धार्थ गाड हेही अनुपस्थित राहिल्याने नागरिकांच्या संतापाचा पारा चढला. ग्रामसभा तहकूब करण्याची मागणी होताच सभेला उपस्थित असलेले पंचसदस्य फ्रान्सिस लोबो यांना अध्यक्ष निवडून कामकाज सुरु करावी अशी सूचना काही लोकांनी केली. याचवेळी अन्य एक पंचसदस्य जयेश नाईक यांनीही आपण सभेचे अध्यक्षपद भूषविण्याची तयारी दर्शविल्याने गोंधळ वाढला. एकही पंचसदस्य ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषविण्यास लायक नसल्याचे मंगेश गावकर या ग्रामस्थाची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव पुढे आला. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे पंचसदस्य जयेश नाईक, सुशांत गावकर व संज्योत खडपकर यांनी व्यासपीठ सोडून सभागृहात ग्रामस्थांमध्ये बसण्याचा निर्णय घेतला.

जोपर्यंत सरपंच ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत, तोपर्यंत पंचायतीच्या पाक्षिक बैठका घेता येणार नाहीत, अशी भूमिका दत्तप्रासाद गावकर या ग्रामस्थाने मांडली.  यदुवीर कुंडईकर यांनी पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणेच योग्य असल्याचे सांगितल्याने सुशांत गावकर यांनी हेच कृत्य म्हणजे नागरिकांवर अन्याय असल्याची बाजू मांडली.

प्रत्येक ग्रामसभेला ऐनवेळी वैद्यकीय कारण देऊन सरपंच अनुपस्थित राहण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. त्यांनी दिलेले हे वैद्यकीय प्रमाणपत्र खोटे असल्याची शक्यताही काही ग्रामस्थांनी बोलून दाखविली. पंचायतीने त्याची चौकशी करावी अशी मागणी काही जागृत नागरिकांनी केली. पंचसदस्य संकेत आमोणकर व पाईक गावकर सभेला अनुपस्थित राहिले. प्रचंड गदारोळात अखेर सभा तहकुब करावी लागली. गटविकास कार्यालयातून निरीक्षक म्हणून तुकाराम नाईक यांनी काम पाहिले.

Related Stories

स्वातंत्र्यसैनिकांच्या अनुपस्थितीत आज क्रांती दिन सोहळा

Omkar B

शंभू भाऊ बांदेकर यांच्या ‘अंतर्नाद’ पुस्तकाचे प्रकाशन

Patil_p

सिद्धु केरकर, हर्षदा शेटगावकर यांना ‘गोमंत समाजसेविका’ पुरस्कार

Amit Kulkarni

कोरोनाबाधितांचा एकाच दिवशी शतकपार विक्रम

Patil_p

कोलवाळ तुरुंगात धान्यसाठय़ाचा काळाबाजार

Omkar B

खांडोळा येथे वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!