तरुण भारत

कासावलीच्या ग्रामसभेत रेल्वे दुपदरीकरणाला विरोध

रेल्वे यार्ड, मेगा प्रकल्प व हॉटेल्स प्रकल्पानाही विरोध

प्रतिनिधी /वास्को

Advertisements

कासांवलीच्या ग्रामसभेत रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणारा ठराव पुन्हा एकदा संमत करण्यात आला. या सभेत मेगा प्रकल्प, हॉटेल प्रकल्प, रेल्वे यार्डसारख्या प्रकल्पांनाही ग्रामस्थांनी विरोध केला. कचरा विल्हेवाट, सांडपाणी निचरा अशा समस्यांवरही ग्रामस्थांनी पंचायत सदस्यांना धारेवर धरले. या ग्रामसभेला आमदार एलिना साल्ढानाही उपस्थित होत्या.

रविवारी सकाळी कासांवली पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या सभेत ग्रामस्थांनी विविध समस्यांवर चर्चा करताना पंचायत सदस्यांना धारेवर धरले. सर्व नियम डावलून पंचायत क्षेत्रात महानिवासी प्रकल्प उभे राहतात. हॉटेल प्रकल्प उभे राहतात. यापूर्वीही अशा प्रकल्पांविरूद्ध ठराव संमत झालेले आहेत. तरीही या प्रकल्पांना परवानगी कशी मिळते असा प्रश्न ग्रामस्थांनी सभेत उपस्थित केला. एखाद्या हॉटेल किंवा महा निवासी प्रकल्पासाठी दहा मिटर रस्ता असणे आवश्यक आहे. परंतु असा रस्ता गावात नाही. कचरा विल्हेवाटीची आधुनिक सोय नाही. खासगी प्रकल्पही आपल्या सोयीसाठी असे प्रकल्प उभारीत नाहीत. तरीही असे मोठे प्रकल्प उभारले जातात आणि गावातील वातावरण खराब करतात अशी तक्रार ग्रामस्थांनी मांडली. काही हॉटेल्समधील सांडपाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे अशा प्रकल्पांना पंचायत क्षेत्रात पंचायतीने परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच कचरा विल्हेवाट व सांडपाण्याची समस्या सोडवावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. सरपंच फेरविन साल्ढाना यांच्यासह उपस्थित सदस्यांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले. मात्र, सरपंच समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पंचायतीचे अधिकार मर्यादीत असल्याचे स्पष्ट करून मोठमोठय़ा प्रकल्पांसाठी वरीष्ठ पातळीवरील शासकीय अधिकारीणींकडून परवाने देण्यात येतात, तेव्हा पंचायत हतबल ठरते असे उत्तर ग्रामस्थांना या सभेत मिळाले.

रेल्वे दुपदरीकरण आणि रेल्वे यार्डला ग्रामस्थांचा विरोध

दक्षिण पश्चिम रेल्वे दुपदरीकरणाचा प्रश्नी या ग्रामसभेत उपस्थित झाला. रेल्वेचे दुपदरीकरण गावात कोळशाचे प्रदुषण माजवणार असून गावातील पर्यावरण आणि लोकांची घरेदारे उध्दवस्त होणार असल्याने रेल्वेचे दुपदरीकरण कासावलीत नको अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने पुन्हा एकदा कासावलीच्या ग्रामसभेत रेल्वे दुपदरीकरणविरोधी ठरावा संमत करण्यात आला. कासावलीत होणाऱया नियोजित रेल्वे यार्डालाही ग्रामस्थांनी विरोध केला. गावातील जलसाठय़ांचे संरक्षण करण्याचीही मागणी ग्रामस्थांनी केली. आमदार एलिना साल्ढाना यांनी आपण प्रारंभापासूनच रेल्वे दुपदरीकरणाला विरोध केलेला असल्याचे स्पष्ट करून लोकांचे जीवन उध्दवस्त करून आपल्याला विकास नको असल्याचे त्या म्हणाल्या. नवीन रेल मार्ग कासावली गावातील घरांची कुंपणे तसेच काही घरांपर्यंतही येणार असून त्यांनी आपली घरे दारे सोडून निघून जावे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरपंच व पंचांवरील आरोपामुळे सांकवाळची ग्रामसभा तापली

सांकवाळच्या ग्रामसभेत सरपंच व पंच सदस्यांवर आरोप केल्यामुळे बराच वेळ वातावरण तापले. रविवारी सकाळी ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी झुआरीनगरात कुणाला भुखंड पाडू देऊ नका अशी मागणी करताना वीज व पाणी या समस्याही ग्रामसभेत मांडल्या.

  सांकवाळ पंचायत क्षेत्रातील झुआरीनगर भागात वीज व पाण्याची समस्या आहे. ही समस्या आधी सोडवावी. जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत झुवारीनगरात भुखंड पाडू नका, बांधकामांना परवाने देऊ नका अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. वीज व पाण्यासारख्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सरपंच गिरीष पिल्ले यांनी दिले.

  याच सभेत एका ग्रामस्थाने मोठय़ा प्रकल्पासाठी सरपंच आणि पंच सदस्यांनी अकरा फ्लॅट त्या प्रकल्पाच्या मालकाकडून घेतल्याचा सणसणीत आरोप केला. या आरोपामुळे सरपंच आणि पंच सदस्यांना संताप अनावर झाला. त्यामुळे काहीवेळी वातावरण तापले. सरपंच गिरीष पिल्ले यांनी नाहक आरोप न करण्यासाठी त्या ग्रामस्थाला बजावले. आरोप करताना काही पुरावे असल्यास समोर ठेवा असेही सरंपचांनी बचावले. ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी व समस्या सोडवण्यासाठी असते. त्याविषयी प्रश्न मांडा. नाहक गैर आरोप करून वातावरण बिघडवू नका अशी सुचना त्यांनी केली. तसेच पंचायत क्षेत्रात आम्ही मोठय़ा प्रकल्पांसाठी आतापर्यंत परवाने दिलेले नाहीत आणि देणारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही प्रकल्पांना वरीष्ठ पातळीवरील अधिकारीणींकडून परवाने मिळतात. यात पंचायत हस्तक्षेप करू शकत नाही असेही सरपंच म्हणाले.

Related Stories

रावणफोंड ‘रिंग रोड’नजीक मिनी सोनसडय़ाचे स्वरूप

Amit Kulkarni

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

Patil_p

वाघांची नखे गायब प्रकरणाची चौकशी

Patil_p

नव्वदीतील रामराय गावकराची चित्रशाळेच्या माध्य़मातून अखंडीतपणे ‘गणेश सेवा’

Patil_p

म्हादई, वाळवंटी,रगाडा नदीची पातळी धोकादायक वळणावर.

Omkar B

जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानुसार करंजाळे येथे मासेविक्रीला सुरूवात

Patil_p
error: Content is protected !!