तरुण भारत

उद्धवा, सर्व सोडून जो मला शरण येतो त्याचा मी उध्दार करतो

अध्याय बारावा

भगवंत उद्धवाला सत्संगतीच्या प्रभावाने त्यांना येऊन मिळालेल्या भक्तांची उदाहरणे सांगत आहेत. स्वतः उद्धव परमभक्त आहेच. त्याला या सगळय़ांच्या आठवणीने उचंबळून येत आहे. तसेच भगवंतांच्या प्रेमाचेही भरते येत आहे. उद्धवाला आलेल्या अनुभूतीचा प्रत्यय  तुकाराम महाराजांनी घेतला. त्यातूनच त्यांनी अभंग रचला, तो असा, काय सांगू आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ।। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ।।

Advertisements

सहज बोलणे हित उपदेश । करुनी सायास शिकविती ।। तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती । तैसे मज येती सांभाळीत ।।

तुकोबाराय म्हणतात, संतांचे उपकार काय सांगावेत ते मला निरंतर जागे ठेवतात. हे त्यांचे उपकार कसे फेडावेत कळत नाही. त्यांच्या पायावर जीव ठेवला तरी तो अपुराच आहे. त्यांचं बोलणं तरी कसं, ते जे सहजी बोलणं असतं तोच हितोपदेश असतो. असंही म्हणता येईल की, ते वायफळ बोलतच नाहीत त्यामुळे ते सहज म्हणून जे बोलतात तेच आपल्या हिताचं असतं. गाय जशी वासराला सर्वतोपरी सांभाळते त्याप्रमाणे संत आपल्याला सांभाळतात. तुकोबारायांचं मनोगत आपण जाणून घेतलं. आता भगवंत उद्धवाला सत्संगतीच्या माध्यमातून त्यांना येऊन मिळालेल्या आणखीन भक्तांची उदाहरणे देत आहेत ती आपण अभ्यासुयात. ते म्हणाले, उद्धवा, अर्जुनाने खांडववन अग्नीला खावयास दिले, त्यांत मयासुर जळू लागला असता त्याला मीच उद्धरले.

केवळ शत्रूचा भाऊ बिभीषण हा राक्षसांच्या कुळात जन्मला होता. तो मला अनन्यभावाने शरण आल्यामुळे तो माझा केवळ जीवप्राण झाला. सुग्रीव , मारुती व जांबुवंत ह्यांचे थोर पराक्रम प्रसिद्धच आहेत. रावणाने जटायूला छिन्नभिन्न करून टाकले, त्याला मी उद्धरले. गजेंद्र सरोवरामध्ये नक्राने ग्रासला होता, त्याच्या बायकांमुलांनीही त्याला तसाच सोडून दिला, तेव्हा अंतकाळी दीनवाणीने स्तवन करून तो माझे स्मरण करू लागला. सर्वांची आशा सोडून देऊन वैकुंठाच्या मार्गाकडे पाहून एक सुंदर कमल उचलून ‘हे परमेश्वरा ! अत्यंत त्वरेने ये’ असे म्हणाला. त्या गजेंद्राची ती उत्कंþा पाहून वैकुंठाहून लगबगीने मी गरुडाच्याही पुढे उडी टाकून त्या हत्तीचे बंधन तोडले. त्याचा जन्म पशुयोनीत झालेला होता पण अंतकाली त्याने माझे स्मरण केले, म्हणून तो माझ्या निजधामाला आला. याकरिताच पुराणांनी त्याचे गुणगायन केले आहे. तराजूत वजन करून जिन्नस विकणारा एक वैश्य वाणी होता. तो सत्य बोले आणि विकावयाचे जिन्नस खरेपणाने वजन करी. तो सत्यव्रतानेच मला पावला म्हणून त्याचे नांव ‘सत्यतोलणी’ असे पडले होते. धर्मव्याध हाही माझ्या निजपदाला आला. जराव्याध तर प्रसिद्धच आहे. त्याने पायावर बाण मारून माझा प्राण घेतला त्याचा मी आपण होऊन उध्दार केला. कोळय़ांमध्ये गुहक पहा ! तो रामाच्या समोर आला तोच त्याचे संपूर्ण कर्म नाश पावले व तो निजधामाला गेला. कुब्जा तर तीन ठिकाणी वाकडी होती. पण भक्तिभावाने मात्र ती सरळ व शुद्ध होती. तिच्या चंदनाची पवित्र गोडी काय सांगावी ? त्याची मला फारच आवड असे. तिने मला चंदनाचे विलेपन केले व मन मला अर्पण केले म्हणून मी तिच्या आधीन झालो. ती निजधामाला गेली.

 गोकुळातील गोपिका संसारापासून परावृत्त होऊन शरीर, मन व प्राण यांनी मला भाळल्यामुळे त्याही आत्मसुख पावल्या. गोपिकांना माझी फार आवड होती, किंवा मलाच गोपिकांची आवड होती असे म्हण. पण आम्हां उभयतांच्या त्या आवडीच्या बरोबरीची योग्यता प्राप्त करून घेताघेता सर्व साधने दुर्बळ झाली.

संसाराची गोडी सोडून देऊन पतीची किंवा पुत्रांचीही भीड न धरिता यज्ञप?त्?न्याना माझीच फार आवड उत्पन्न झाली. भाविकांना भावार्थामुळे परमेश्वरावर अशीच दृढ श्रद्धा असते त्यांनी मला अन्न समर्पण करून त्या माझे निजधाम पावल्या. परंतु ज्यांना कर्माचा अभिमान होता, ते ब्राह्मण मात्र माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तो कथाभाग आपण पुढील भागात पाहू.

क्रमशः

Related Stories

केंद्र-राज्य संबंधात अडकलेला सहकार

Patil_p

लसीकरणानंतर बाधेने अनेक प्रश्नचिन्हे

Patil_p

प्रदूषणाच्या जहरी विळख्यात दिल्ली

Amit Kulkarni

गोडी अपूर्णतेची…

Omkar B

एडका मदन

Patil_p

मिथ्या गोष्टी अज्ञानामुळे मनुष्याला खऱया वाटतात

Patil_p
error: Content is protected !!