तरुण भारत

ना भारत जिंकला, ना न्यूझीलंड हरले!

भारतात जन्मलेल्या अजाझ पटेल, रचिन रविंद्रने भारताला सतावले, उभय संघातील पहिली कसोटी नाटय़मयरित्या अनिर्णीत

कानपूर / वृत्तसंस्था

Advertisements

अजाझ पटेल (23 चेंडूत नाबाद 2) व रचिन रविंद्र (91 चेंडूत नाबाद 18) या भारतात जन्मलेल्या क्रिकेटपटूंनी शेवटची 8.4 षटके सहजपणे खेळून काढत येथील ग्रीन पार्कवरील पहिली कसोटी अनिर्णीत राखण्यात लक्षवेधी यश प्राप्त केले. रविंद्र जडेजा (4-40), रविचंद्रन अश्विन (3-35) व अक्षर पटेल (1-23) यांनी उत्तम मारा केला. पण, मुंबईचा जन्म असलेल्या अजाझ पटेल व कर्नाटकातील जन्म असलेल्या रचिन रविंद्र  यांनी भारताला शेवटचा फलंदाज बाद करता येणार नाही, याची पुरेपूर तजवीज केली. या निकालामुळे भारताची मात्र पूर्ण निराशा झाली.

न्यूझीलंडने हा सामना अनिर्णीत राखला, त्यात नाईट वॉचमन विल सॉमरव्हिलेने (110 चेंडूत 36 धावा) पहिले सत्र खेळून काढले, ते सर्वाधिक महत्त्वाचे ठरले. सॉमरव्हिलेच्या या चिवट फलंदाजीमुळेच न्यूझीलंडला सामना अनिर्णीत राखण्याचे वेध सुरु झाले.

या डावात टॉम लॅथमने (146 चेंडूत 52) दुसरे अर्धशतक साजरे केले तर सॉमरव्हिलेने हा सामना डीप नेण्यात कमालीचे यश प्राप्त केले. केन विल्यम्सनने (112 चेंडूत 24) उत्तम बचावात्मक फलंदाजी केली. अगदी ब्लंडेल व काईल जेमिसन यांनीही प्रत्येकी किमान 30 चेंडू खेळून काढले. दुसऱया सत्रात उमेश यादवने नाईटवॉचमन सॉमरव्हिलेला बाद केले. विल्यम्सन पायचीत होत परतल्यानंतर भारताच्या आशाअपेक्षा उंचावणे साहजिक होते. पण, शेवटच्या टप्प्यात भारतीय संघ विजयावर शिक्कामोर्तब करण्यात कमी पडला.

न्यूझीलंडने विजयाचे 284 धावांचे टार्गेट सर करण्याचा प्रश्नच नव्हता. पण, त्यांनी पहिल्या सत्रात एकही बळी न गमावता आपल्या जिद्दी, व्यावसायिक खेळाची उत्तम प्रचिती दिली. सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी शेवटच्या अर्ध्या तासात मैदानी पंच नितीन मेनन व विरेंदर शर्मा यांना सातत्याने प्रकाश पुरेसा आहे का, याची चाचपणी करणे भाग होते. चेंडू खूप खाली राहत होता आणि यावरच भारताची सर्व भिस्त होती. जडेजाचा केन विल्यम्सनला पायचीत करुन गेलेला चेंडू याचे उत्तम उदाहरण होते. मात्र, अंतिम टप्प्यात 8.4 षटकात भारताला शेवटचा गडी बाद करण्यात आलेले अपयश विजयापासून वंचित ठेवणारे ठरले.

दि. 3 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया पुढील कसोटीत विराट कोहली संघात परतत असल्याने खराब फॉर्ममधील हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या जागेवर टांगती तलवार असू शकेल. याशिवाय, निष्प्रभ ठरत चाललेल्या इशांत शर्माचे संघातील स्थान देखील धोक्यात असणार आहे. इशांतने या सामन्यात 22 षटके टाकली. मात्र, त्याला एकही बळी घेता आला नाही.

धावफलक

भारत पहिला डाव ः सर्वबाद 345

न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 296

भारत दुसरा डाव ः 7 बाद 234 वर घोषित.

न्यूझीलंड दुसरा डाव (टार्गेट 284) ः टॉम लॅथम त्रि. गो. अश्विन 52 (146 चेंडूत 3 चौकार), विल यंग पायचीत गो. अश्विन 2 (6 चेंडू), विल्यम सॉमरव्हिले झे. शुभमन, गो. यादव 36 (110 चेंडूत 5 चौकार), केन विल्यम्सन पायचीत गो. जडेजा 24 (112 चेंडूत 3 चौकार), रॉस टेलर पायचीत गो. जडेजा 2 (24 चेंडू), हेन्री निकोल्स पायचीत गो. पटेल 1 (4 चेंडू), टॉम ब्लंडेल त्रि. गो. अश्विन 2 (38 चेंडू), रचिन रविंद्र नाबाद 18 (91 चेंडूत 2 चौकार), काईल जेमिसन पायचीत गो. जडेजा 5 (30 चेंडू), टीम साऊदी पायचीत गो. जडेजा 4 (8 चेंडूत 1 चौकार), अजाझ पटेल नाबाद 2 (23 चेंडू). अवांतर 17. एकूण 98 षटकात 9 बाद 165.

गडी बाद होण्याचा क्रम

1-3 (विल यंग, 2.6), 2-79 (विल्यम, 35.1), 3-118 (लॅथम, 54.2), 4-125 (रॉस टेलर, 63.1), 5-126 (हेन्री निकोल्स, 64.1), 6-128 (विल्यम्सन, 69.1), 7-138 (ब्लंडेल, 78.2), 8-147 (जेमिसन, 85.6), 9-155 (टीम साऊदी, 89.2).

गोलंदाजी

रविचंद्रन अश्विन 30-12-35-3, अक्षर पटेल 21-12-23-1, उमेश यादव 12-2-34-1, इशांत शर्मा 7-1-20-0, रविंद्र जडेजा 28-10-40-4.

कसोटी पदार्पणात सामनावीर ठरलेले भारतीय खेळाडू

खेळाडू / प्रतिस्पर्धी / ठिकाण /वर्ष

श्रेयस अय्यर / न्यूझीलंड / कानपूर / 2021

पृथ्वी शॉ / वेस्ट इंडीज / राजकोट / 2018

रोहित शर्मा / वेस्ट इंडीज / कोलकाता / 2013

शिखर धवन / ऑस्ट्रेलिया / मोहाली / 2013

रविचंद्रन अश्विन / वेस्ट इंडीज / दिल्ली / 2011

आरपी सिंग / पाकिस्तान / फैसलाबाद / 2006

प्रवीण आम्रे / द. आफ्रिका / दरबान / 1992

भारतीय संघातर्फे कसोटीत सर्वाधिक बळी

गोलंदाज / कालावधी / सामने / बळी / डावात सर्वोत्तम

अनिल कुंबळे / 1990-2008 / 132 / 619 / 10-74

कपिलदेव / 1978-1994 / 131 / 434 / 9-83

रविचंद्रन अश्विन / 2011-2021 / 80 / 419 / 7-59

हरभजन सिंग / 1998-2015 / 103 / 417 / 8-84

झहीर खान / 2000-2014 / 92 / 311 / 7-87

इशांत शर्मा / 2007-2021 / 105 / 311 / 7-74

बिशनसिंग बेदी / 1966-1979 / 67 / 266 / 7-98

ग्राऊंड स्टाफला द्रविडकडून 35 हजार रुपयांचे इनाम!

येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर कसोटी क्रिकेट पूर्ण पाच दिवस चालली. या खेळपट्टीच्या स्वरुपावर प्रभावित झालेल्या नूतन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ग्राऊंड स्टाफला 35 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले.  

19 पैकी 17 बळी घेणाऱया फिरकी त्रिकुटाला ‘तो’ बळी मात्र घेता आला नाही!

या सामन्यात न्यूझीलंडचे 19 फलंदाज बाद झाले. त्यापैकी, 17 फलंदाज भारताच्या फिरकी त्रिकुटाने बाद केले. मात्र, अजाझ व रचिन ही शेवटची जोडी  तब्बल 8.4 षटके अतिशय चिकाटीने लढत राहिली आणि यात शेवटचा एकमेव बळी न घेता आल्याने फिरकी त्रिकुटाच्या साऱया मेहनतीवर पाणी फेरले गेले.  

अश्विनने हरभजनचा विक्रम मोडला

अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत हरभजनला मागे टाकत तिसरे स्थान प्राप्त केले. अश्विनने 80 कसोटी सामन्यात हा माईलस्टोन सर केला.

भारतातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम अनिल कुंबळेने नोंदवला असून त्याच्या खात्यावर 619 बळी नोंद आहेत. त्यानंतर कपिलने 434 बळी नोंदवले आहेत. 35 वर्षीय अश्विनने या निकषावर हरभजनला (103 सामन्यात 417 बळी) मागे टाकले. टॉम लॅथमला बाद केले, तो अश्विनचा 418 वा बळी ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये 400 पेक्षा अधिक बळी घेणारा तो भारताचा चौथा गोलंदाज आहे.

सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप

सत्र / षटके / धावा / बळी

पहिले / 31 / 75 / 0

दुसरे / 28.1 / 46 / 3

तिसरे / 34.5 / 40 / 5

Related Stories

अजय जयरामला डेन्मार्क स्पर्धा हुकणार?

Patil_p

केनियाच्या कँडीचा नवा विश्वविक्रम

Patil_p

महेंद्रसिंग धोनी होणार आता मुंबईकर!

Patil_p

प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुम्बाची विजयी सलामी

Patil_p

क्रिकेट न्यूझीलंडला मालिका भरवण्यास परवानगी

Patil_p

नागलची सलामीची लढत बेरानकिसविरुद्ध

Patil_p
error: Content is protected !!