तरुण भारत

मेस्सी, ऍलेक्सिया बॅलन डीओर पुरस्काराचे मानकरी

वृत्तसंस्था/ पॅरिस

बार्सिलोनाचा माजी फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीने विक्रमी सातव्यांदा बॅलन डीओर पुरस्कार पटकावत वर्षाची अखेर शानदार पद्धतीने केली. बार्सिलोनासाठी त्याचा हा शेवटचा मोसम होता. याशिवाय त्याने अर्जेन्टिनाला पहिल्यांदाच प्रमुख स्पर्धाही जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. महिलांमध्ये हा पुरस्कार स्पेनच्या ऍलेक्सिया पुटेलासने पटकावला.

Advertisements

बार्सिलोना क्लबकडून खेळणारी ऍलेक्सिया हा पुरस्कार जिंकणारी तिसरी महिला फुटबॉलपटू आहे. 34 वर्षीय मेस्सीने गेल्या जुलैमध्ये अर्जेन्टिनाला कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. त्याआधी चारवेळा मोठय़ा स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यांना पराभूत व्हावे लागले होते. ‘येथे येण्याने मी खुश असून आणखी ट्रॉफीज मिळविण्यासाठी मी यापुढेही संघर्ष करीत राहणार आहे. मी अजून किती वर्षे खेळेन हे सांगता येत नसले तरी मी आणखी बराच काळ खेळेन, अशी मला आशा वाटते. बार्सिलोनातील माझ्या सर्व माजी संघसहकाऱयांचा तसेच अर्जेन्टिना संघातील सहकाऱयांचा मी मनापासून आभारी आहे,’ अशा भावना मेस्सीने यावेळी व्यक्त केल्या. या पुरस्कारासाठी झालेल्या मतदानात मेस्सीने 613 मते मिळवित बायर्न म्युनिच व पोलंडचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवान्डोवस्कीला मागे टाकले. लेवान्डोवस्कीला 580 मते मिळाली. बॅलन डीओर हा पुरस्कार 1956 पासून प्रतिवर्षी फ्रान्स फुटबॉल मॅगझिनतर्फे पुरुष फुटबॉलपटूला दिला जातो. मागील वर्षी कोरोना महामारीच्या कारणास्तव हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता.

लेवान्डोवस्कीने बुंदेसलिगाकडून खेळताना एका मोसमात सर्वाधिक 41 गोल नोंदवण्याचा नवा विक्रम करताना जर्मनीचा महान फुटबॉलपटू गर्ड म्युलरचा 40 गोलांचा विक्रम मागे टाकला. फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या सर्व स्पर्धातील सलग 19 सामन्यात त्याने गोल नोंदवले. तो आता बायर्नतर्फे खेळत असून आतापर्यंतच्या 20 सामन्यात त्याने 25 गोल नोंदवले आहेत. पोलंडतर्फे खेळताना त्याने 12 सामन्यात 11 गोल नोंदवले असून एकूण 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याचे 74 गोल झाले आहेत. मेस्सीचे एकूण 80 आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत.

ऍलेक्सिया पुटेलासने बार्सिलोनाला तिहेरी मुकुट साधून देण्यात मोलाचा वाटा उचलताना एकूण 42 सामन्यांत 26 गोल नोंदवले. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीत तिने चेल्सीविरुद्ध गोल नोंदवला तर गेल्या ऑगस्टमध्ये युफाचा वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा बहुमानही तिला मिळाला होता. यापूर्वी 2018 मध्ये नॉर्वेची स्ट्रायकर अदा हेगेरबर्ग व 2019 मध्ये अमेरिकेच्या मेगन रॅपिनोला बॅलन डीओरचा बहुमान मिळाला होता. ऍलेक्सियाने 186 तर तिचीच सहकारी जेनी हर्मोसोने 84 मते मिळविली.

Related Stories

खडतर परिस्थितीतून यश मिळवणारा संदेश

Abhijeet Shinde

युपी : आंतरराष्ट्रीय शूटर दादी चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण

Rohan_P

मँचेस्टर सिटीचा निसटता विजय

Patil_p

सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंड पुन्हा पराभूत

Patil_p

बिग बॅश स्पर्धेत मंदाना, दिप्ती खेळणार

Patil_p

मुंबईचे फलंदाज पुन्हा ढेपाळले

Patil_p
error: Content is protected !!