तरुण भारत

भारत-बेल्जियम आज उपांत्यपूर्व लढत

कनिष्ठ विश्वचषक हॉकी – दोन्ही संघांत चुरस अपेक्षित

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisements

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत याआधीच्या दोन सामन्यात मोठे विजय मिळविल्याने मनोबल उंचावलेल्या विद्यमान विजेत्या भारतीय संघाची उपांत्यपूर्व लढत बलाढय़ युरोपियन संघ बेल्जियमशी होणार आहे. बुधवारी होणाऱया या सामन्यात भारतीय संघ आक्रमण व ड्रग फ्लिक कौशल्याचा वापर करण्यावर अधिक भर देणार आहे.

संभाव्य विजेते मानल्या जाणाऱया भारतीय संघाची या स्पर्धेत खराब सुरुवात झाली होती. पहिल्याच सामन्यात त्यांना फ्रान्सने 4-5 असा पराभवाचा धक्का दिला होता. पण दुसऱया सामन्यात सुधारित कामगिरी करीत कॅनडावर 13-1 असा एकतर्फी विजय मिळविल्यानंतर पोलंडचाही 8-2 अशा गोलफरकाने धुव्वा उडवित गट ब मध्ये दुसरे स्थान मिळविले आणि उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले. मात्र बाद फेरीत भारतीय संघाची खरी कसोटी लागणार असून तिसऱयांदा ही स्पर्धा जिंकायची असल्यास त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यावरच भर द्यावा लागेल.

2016 मध्ये झालेल्या याआधीच्या स्पर्धेतील अंतिम लढतही याच दोन संघांत झाली होती. त्यावेळी भारताने बेल्जियमला 2-1 असे हरवून जेतेपद पटकावले होते. बेल्जियमही या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बुधवारच्या लढतीत पुरेपूर प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची अपेक्षा केली जात आहे. या सामन्यात मिळालेल्या संधींचा लाभ घेणारा संघच विजयी होऊ शकतो. भारताच्या आक्रमण फळीत भक्कम खेळाडू असून उत्तम सिंग, अरायजीत सिंग हुंदल, सुदीप चिरमाको व मनिंदर सिंग यांचा समावेश आहे.

उत्तम व मनिंदर यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या सर्कलमध्ये घुसखोरी करण्यात आतापर्यंतच्या सामन्यात यश मिळविले आहे. पेनल्टी कॉर्नरचे पर्याय म्हणून उपकर्णधार संजय कुमार, हुंदल, शारदानंद तिवारी, अभिषेक लाक्रा यांच्या रूपात भारताकडे उपलब्ध असून यापैकी प्रत्येकाने याआधीच्या सामन्यात गोल नोंदवले आहेत. पेनल्टी कॉर्नरसाठी संजय कुमार पूर्ण फॉर्ममध्ये असून फ्रान्स व कॅनडा या दोन्ही संघांविरुद्ध त्याने लागोपाठ हॅट्ट्रिक नोंदवल्या तर हुंदलनेही पोलंडविरुद्ध तीन गोल नोंदवले आहेत. विवेक सागर प्रसादला अव्वल दर्जाच्या हॉकीमध्ये खेळण्याचा अनुभव असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविणाऱया भारतीय संघाचा तो सदस्यही होता. भारतीय मिडफिल्ड त्याच्या हाती सुरक्षित असल्याचे मानले जाते. बॅकलाईनमध्ये थोडीशी चिंता असून बेल्जियमचे आक्रमण थोपवण्यासाठी संजय, तिवारी, लाक्रा व यशदीप सिवाच यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड यांनीही भारताच्या यशाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मताला कर्णधार विवेकनेही सहमती दर्शविली.

बेल्जियमने आजवर एकदाही ही स्पर्धा जिंकली नसून त्यांच्या वरिष्ठ संघाने ऑलिम्पिक जेतेपद आणि विश्वचषक जेतेपदही मिळविले आहे. त्यांचे अनुकरण करण्यासाठी बेल्जियमचा कनिष्ठ संघही येथे प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. जर्मनी व स्पेन, नेदरलँड्स व अर्जेन्टिना, फ्रान्स व मलेशिया यांच्यात अन्य उपांत्यपूर्व लढती होणार आहेत.

Related Stories

बांगलादेशची पहिल्या डावात घसरगुंडी

Patil_p

डेल स्टीन सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्त

Patil_p

हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांना मुदतवाढ

Patil_p

वानखेडेवर सीएएविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने

Patil_p

चेन्नई आज आरसीबीला धक्का देणार?

Patil_p

5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारले टिटमसचे स्वप्न!

Patil_p
error: Content is protected !!