तरुण भारत

सामाजिकतेचे भान, आम्ही करतो सन्मान!

तरूण भारत सन्मान पुरस्कारा’साठी जिल्हय़ातील 10 जणांची निवड

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

शतकोत्तरीची अक्षरसेवा देणाऱया, वाचकांशी बांधिलकी आणि विश्वासार्हतेचे अतुट नाते जपत व समृध्द परंपरेची जोपासना करत आलेल्या ‘तरूण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा 26 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार 3 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपल्या उल्लेखनीय कार्याव्दारे समाजाला प्रकाशवाटा दाखवणाऱया काही निवडक व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘तरूण भारत सन्मान’ प्रदान केला जाणार आहे. यासाठी जिल्हय़ातील गौरवप्राप्त व्यक्ती व संस्थांची निवड जाहीर करण्यात आली. यात 10 जणांचा समावेश आहे.

 हा सोहळा शहरातील जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेषांक प्रकाशन, तरूण भारत सन्मान वितरण सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता तर स्नेहमेळावा सायंकाळी 5.30 ते 8 वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्यान या ‘तरूण भारत सन्मान पुरस्कारा’चे वितरण त्या-त्या तालुक्यात केले जाणार आहे.

              ‘तरूण भारत सन्मानासाठी निवडलेल्या व्यक्ती संस्था

1) संकेत संजय चाळके- रत्नागिरी, 2) सौ. वैशाली अभिजित खाडीलकर, अभिजित खाडीलकर, 3) प्रतीक्षा विशेष शाळा- विलवडे ता. लांजा, 4) सुभाष महिपत परब-निवेखुर्द, ता. संगमेश्वर, 5) त्रिवेणी लोकसंचालित साधन केंद्र, जैतापूर, ता. राजापूर, 6) सांजसोबत, चिपळूण, 7) गुलाम हुसैन तांडेल, शृंगारतळी, ता. गुहागर, 8) प्रेरणा प्रदीप दहिवलकर, वेरळ, ता. खेड, 9) डॉ. प्रसाद अवधूत करमरकर, दापोली, 10) डॉ. आशिष प्रकाश जाधव, मंडणगड.

– संकेत संजय चाळके, कुवारबाव-रत्नागिरी.

दिव्यांगांना मार्गदर्शन, त्यांचे पुनर्वसन आणि त्यांनाही अव्यंगांच्या बरोबरीने जीवनाचा आनंद लुटण्यासाठी सक्षम करण्याचे शिवधनुष्य चाळके यांनी पेलले आहे. या कार्यामध्ये अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेत त्याला एका चळवळीचे स्वरुप देण्यात व याद्वारे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचा प्रकाश पसरवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

– प्रतीक्षा विशेष शाळा, विलवडे-लांजा.

समाजामध्ये अनेकदा दुय्यम स्थान दिल्या जाणाऱया अंध, मतिमंद व अन्यप्रकारे दिव्यांग बालकांना शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन व त्याद्वारे आत्मविळप्स प्रदान करत त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग निर्माण करण्यासाठी प्रतीक्षा विशेष शाळा निरंतर प्रयत्नशील आहे.

– त्रिवेणी लोकसंचालित साधन केंद्र, जैतापूर.

एक महिला सक्षम झाली की, अवघे कुटुंब सक्षम होते, हे जाणून परिसरातील 21 पेक्षा अधिक गावांमध्ये बचत गटांची निर्मिती, या गटांचे कार्य उल्लेखनीय व्हावे, यासाठी मार्गदर्शन व पाठबळ देण्याचे काम त्रिवेणी साधन केंद्र करीत आहे.  याद्वारे अडीच हजारांहून अधिक महिलांचे संघटन व त्यांच्या हातांना बळ देण्याचे खूप मोठे कार्य सुरू आहे.

– सांजसोबत, चिपळूण.

निराधार वृध्दांच्या जीवनामध्ये आनंद अन् समाधानाचे असंख्य क्षण निर्माण करण्यासाठी सांजसोबत संस्था कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी अत्यंत पारदर्शक व संवेदनशीलपणे सुरु असलेल्या कार्यामध्ये समाजातील असंख्य हात सहभागी करून घेण्यातही ही संस्था यशस्वी झाली आहे.

गुलाम हुसैन तांडेल, शृंगारतळीगुहागर.

अवघा समाज व अनेकदा रक्ताच्या नात्यानेही पाठ फिरवलेली असताना आपण पुढाकार घेत अनेकांची ‘जीवनयात्रा’ अखंड ठेवण्यासाठी शृंगारतळीतील समाजसेवक गुलाम हुसैन तांडेल यांची अविरत धडपड सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, त्यांच्या निवास-भोजनाची व्यवस्था, वेळप्रसंगी आर्थिक आधार देण्यात त्यांनी कोणतीही कसूर सोडली नाही.

सौ. वैशाली खाडीलकर, रत्नागिरी.

रत्नागिरीतील अभिजित आणि वैशाली खाडीलकर हे दांपत्य रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांसाठी ‘जीवनदायिने’ बनले आहे. पती-पत्नीने आजपर्यंत तब्बल 60 वेळा रक्तदान केले आहे.

डॉ. आशिष प्रकाश जाधव, मंडणगड.

मंडणगडसारख्या सर्वार्थाने दुर्लक्षित असलेल्या तालुक्यात मंडणगड शहराच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मातोश्री हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. आशिष प्रकाश जाधव यांनी एक डॉक्टर व अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात पुढे करणारा कार्यकर्ता म्हणून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.

सुभाष महिपत परबनिवेखुर्द,

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द-परबवाडी येथील सुभाष उर्फ नाना परब हे आज वयाच्या साठीत तरुणांना लाजवेल असे समाजसेवेचे कार्य करत आहेत. नोकरी सांभाळत समाजसेवेच्या तळमळीतून ते अनेकांसाठी आधार बनले आहेत.

डॉ. प्रसाद अवधूत करमरकर, दापोली.

 जेव्हा कोरोना आपल्या उच्चस्तरावर होता तेव्हा दापोली तालुक्यातील गव्हे येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रसाद अवधूत करमरकर हे गावोगाव जाऊन कोरोनाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करत होते. कोरोनाची भीती लोकांच्या मनातून घालवण्यासाठी त्यांनी कधीही कोरोनाचा रुग्ण तपासताना पीपीई कीट देखील वापरले नाही. कोरोना काळात एकही दिवस त्यांनी आपला दवाखाना बंद ठेवला नाही. कोरोनाचा आलेला प्रत्येक रुग्ण त्यांनी तपासला व बरा केला. यामुळे ते खरेखुरे कोरोना योद्धे बनले आहेत

प्रेरणा प्रदीप दहिवलकर, वेरळ.

संघर्ष अनेक लोकांच्या वाटय़ाला येतात. पण त्या संघर्षातूनही घाबरून न जाता जे धैर्याने तोंड देतात तेच ठरतात यशाचे मानकरी. इतिहासाची पाने त्यांच्याकडे चालत येतात. अन् सुवर्णअक्षरात यशोगाथाच लिहितात. सहजीवन शिक्षण संस्था संचलित आय. सी. एस. महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर असलेल्या श्रीमती प्रेरणा प्रदीप दहिवलकर यांनी कोकणातल्या देवालयांवर संशोधन करून इतिहासाची पाने लिहिली आहेत. नशिबी वैधव्य आलेले असतानाही संकटावर मात करत चतुर्थ श्रेणीतून पीएचडी करणाऱया महाराष्ट्रातील ‘त्या’ पहिल्यावहिल्या कर्मचारी ठरल्या आहेत.

Related Stories

रत्नागिरीच्या लेखिकेचे पुस्तक स्वायत्त महाविद्यालयात

Patil_p

कोकणातील माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवणार

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत शाळांना पालकांच्या प्रतिसादाची प्रतिक्षा

Abhijeet Shinde

चिपळुणात दोन मित्रांचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

Patil_p

कणकवलीत दोन दुकाने आगीत बेचिराख

NIKHIL_N

चिपळुणात बँकेचे एटीएम फोडणारा अटकेत

Patil_p
error: Content is protected !!