तरुण भारत

धामणे (एस.) गावात टस्कर हत्तीचा धुमाकूळ

गेल्या पाच दिवसांपासून हत्ती ठाण मांडून : पिकांचे केले मोठय़ा प्रमाणात नुकसान : शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण

वार्ताहर /किणये

Advertisements

बेळगाव-चंदगड सीमेवर असणाऱया बेळगाव तालुक्यातील धामणे (एस.) या गावात टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला आहे. गेल्या पाच दिवसांपासून हत्ती ठाण मांडून असल्याने शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या टस्कर हत्तीने भात, ऊस व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वनखात्याचे अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र वनखात्याला अपयश आले आहे.

मंगळवारी रात्रीपर्यंत सदर हत्ती धामणे (एस.) गावाजवळील शिवारातच होता. ढोल व इतर वाद्यांचा गजर करून त्या हत्तीला डोंगर भागात हुसकावून लावण्यासाठी गावकरी पाच दिवस प्रयत्न करीत आहेत. पण हत्ती काही केल्या जागा सोडत नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

टस्कर हत्ती पार्ले चंदगड या डोंगर भागातून आला आहे. शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्यान हत्तीने धामणे (एस.) गावाजवळील शेत-शिवारामध्ये प्रवेश केला. सायंकाळी सहाच्या दरम्यान एका शेतकऱयाच्या घराच्या पाठीमागील परसात तो आला. हे पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. गावात सर्वत्र आरडाओरडा झाला.  ग्रामस्थ एकत्र जमा झाले. त्यांनी विविध प्रकारच्या साहित्यांचा वापर करून मोठा आवाज केला. त्यामुळे सदर हत्ती गावाजवळच असलेल्या उसाच्या पिकात गेला.

वनखात्याच्या अधिकाऱयांनी सोमवारी व मंगळवारी हत्तीला हुसकावून लावण्यासाठी बरीच धडपड केली. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही.

सुमारे सहा ते सात एकरातील पिकांचे हत्तीने नासधूस केली आहे. शेतात ठेवण्यात आलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीला उचलून उलटून टाकण्याचा प्रयत्न सदर हत्ती करीत होता. हे पाहून शिवारात काम करणाऱया महिला भयभीत होऊन घरी आल्या.

एका शेतकऱयाने भात पिकाची मळणी करून भात पोत्यांमध्ये भरून ठेवले होते. हत्ती त्या खळय़ावर आला आणि भरून ठेवलेली भाताची पोती विस्कटून टाकत होता. हे पाहून शेतकऱयांना जणू धडकीच भरली.

गुंडू गोविंद चौकुळकर, शिवाजी धाकलू गावडे, महादेव लक्ष्मण पाटील, भरमा धाकलू गावडे, प्रभाकर गावडे, गावडू हाजगुळकर, जानकू वाडेकर आदी शेतकऱयांच्या ऊस, भात व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे.

सदर टस्कर हत्ती हा मोठा असून तो जात नसल्याने ग्रामस्थांना मोठी चिंता लागून राहिली आहे. ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पाऊस झाला. या पावसात पिकांचे नुकसान झाले. शेतशिवारात पाणी साचून हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली. यात आता हत्तीची भर पडली आहे. या टस्कर हत्तीसह चंदगड-पार्ले डोंगरात अजूनही दोन हत्ती असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. वनखात्याचे अधिकारी शिवानंद मगदूम, रमेश एस. जी., जी. रजपूत आदी अधिकारी हत्तीला डोंगरात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सरकारने नुकसान भरपाई द्यावी : गावडू हाजगुळकर

आम्हा धामणे (एस.) गावातील शेतकऱयांना नेहमीच जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतोय. गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा प्रवेश होऊ लागला आहे. यावर्षी शुक्रवारपासून टस्कर हत्तीने गावात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आमचे जगणे मुश्कील झाले आहे. आमच्या शेतातील भात पिकाचे हत्तीने नुकसान केले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी.

वनखात्याने या हत्तीचा बंदोबस्त करावा : जानकू वाडेकर

आमचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतात बऱयापैकी ऊस बहरून आला होता. त्याची तोडणी करणार होतो. मात्र, ऐन तोडणीच्या, सुगीच्या हंगामातच हत्ती दाखल झाला असून शेतातील ऊस पिकाची हत्तीने नासधूस केली आहे. वनखात्याने या हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी आमची मागणी आहे.

Related Stories

आम्हालाही जगू द्या;मजुरांची आर्त हाक

Amit Kulkarni

सिद्धेश्वर पालखी महोत्सव भक्तीमय वातावरणात

Patil_p

पद्मभूषण डॉ.पद्माकर दुभाषी यांचे निधन

Patil_p

किणये पारायण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ

Patil_p

वसतीगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्न विषबाधा

sachin_m

एसकेई सोसायटीची जनकल्याण ट्रस्टला 5 लाखांची मदत

Rohan_P
error: Content is protected !!