तरुण भारत

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा हिंस्त्र प्राण्यांशी सामना

हुळंद-तळावडे गावच्या विद्यार्थ्यांना जोखीम पत्करून कणकुंबीला जावे लागते : दररोज करावा लागतो 16 कि.मी. पायी प्रवास : रस्ता घनदाट जंगलातून जात असल्याने प्रचंड गैरसोय

सुनील चिगुळकर /कणकुंबी

Advertisements

देशात आजादी का अमृतमहोत्सव साजरा करत असताना काही खेडय़ांमध्ये आजही माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून पायपीट करावी लागते. कच्चे रस्ते, वाहतुकीचा अभाव आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर, अशा परिस्थितीमधून कणकुंबी भागातील विद्यार्थी जोखीम पत्करून माध्यमिक शिक्षण घेत आहेत. कणकुंबीपासून 9 कि.मी.वरील हुळंद आणि 8 कि.मी.वरील तळावडे गावच्या विद्यार्थ्यांना आपण कोणत्या युगात वावरत आहोत, हा प्रश्न पडला आहे.

हुळंद, तळावडे, मान, हदीकोप्प, गवळीवाडा, चिगुळे, बेटणे, पारवाड आदी गावांतील विद्यार्थ्यांना दररोज हिंस्त्र प्राण्यांचा वावर असलेल्या भागातून मार्ग काढावा लागतो. हा भाग मूलभूत सोयी सुविधांपासून आजही वंचित आहे. हुळंद, सडा, तळावडे, आमगाव आदी गावांना पक्के रस्ते नाहीत. वाहतुकीची कोणतीही सोय नाही. अशा परिस्थितीत सातवीनंतर माध्यमिक शिक्षणासाठी 8 ते 9 कि.मी. अंतरावरील कणकुंबीला दररोज पायी प्रवास करून यावे लागते. या गावांना मुख्य रस्त्यापासून जाण्यासाठी चांगले रस्तेही नाहीत, वाहनांची सोय नाही व सुरक्षितताही नाही. अशा परिस्थितीत हुळंद व तळावडे गावचे विद्यार्थी दररोज 18 कि. मी. प्रवास करतात.

घनदाट जंगलातून कच्च्या रस्त्याने प्रवास करताना वाटेत कधी अस्वल, कधी गवीरेडे, कधी लांडगे तर कधी वाघ आदी हिंस्त्र प्राणी अधूनमधून दृष्टीस पडतात. अशा वेळी कोणत्याही क्षणी काहीही घडण्याची शक्मयता असते. जीव मुठीत घेऊन ही बालके माध्यमिक शिक्षण घेतात. सद्यस्थितीत जंगली प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शेतीवाडीकडे जाणारे रस्ते बंद पडले आहेत. गावांना जोडणाऱया जंगलातील पायवाटा बंद झालेल्या आहेत. केवळ मुख्य रस्त्यानेच ये-जा करणारे नागरिक पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांना मात्र कोणताच पर्याय नाही.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दररोज सकाळी 7.30 वाजता किंवा 8 च्या आत घर सोडावे लागते. दोन तासांचा अथक प्रवास करून विद्यार्थी शाळेत येतात. एवढे अंतर चालल्यानंतर त्यांची अभ्यासाकडे लक्ष देण्याची मानसिकता तयार होईल का, हा अनुत्तरीय प्रश्न आहे. पाठीवर दप्तराचे ओझे, पावसाळय़ात एका हाताने छत्री सांभाळत, मुसळधार पावसातून वाट काढताना विद्यार्थ्यांची दमछाक होते. संध्याकाळी 4.30 वा. शाळा सुटल्यानंतर पुन्हा दोन तासांचा प्रवास करुन ते कसेबसे घर गाठतात. दमून भागून गेल्यानंतर अभ्यास करण्याची त्यांची तयारी नसते. विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी केवळ रोज चार तासांचा प्रवास करून शाळेत हजेरी मात्र लावावी लागते. प्राथमिक स्तरावर प्रत्येक गावात अपुऱया शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 या भागातील काही शाळांमध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून शिक्षकच नाहीत. तेव्हा वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करतात. केवळ सलाईनवर म्हणजे हंगामी अतिथी शिक्षकांवर शाळा सुरू आहेत. सरकारी आदेशाप्रमाणे केवळ तीन-चार महिन्यांसाठी अतिथी शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करण्यासाठी दुर्गम भागात पाठविले जातात. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडत आहेत. माध्यमिक शिक्षणानंतर पुढे आपला निभाव लागत नाही म्हणून पुढच्यादृष्टीने गोवा गाठतात.

या भागातील सर्व विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शासनाने वाहतुकीची सोय केली तर या विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची मानसिक नकारात्मकता दूर होणार आहे. सरकारने हिंस्त्र प्राण्यांपासून या विद्यार्थ्यांना संरक्षण मिळावे यासाठी वाहनांची सोय करावी, अशी मागणी शिक्षणप्रेमी नागरिक, पालक वर्गातून तसेच विद्यार्थी वर्गातून होत आहे. परंतु शासनाला जाग कधी येणार? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे.

 प्रशासनाने विद्यार्थ्यांची सोय करावी  

आठवडय़ातून एकदा-दोनदा तळावडे व हुळंद गावच्या विद्यार्थ्यांना वाटेत एखाद-दुसरे हिंस्त्र प्राणी आडवे येतात. अशावेळी सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आरडाओरड करतात तेव्हा ते प्राणी बाजूला जातात. काही अंतर गेल्यानंतर सर्व विद्यार्थी एकत्रित पुन्हा प्रवास सुरू करतात. तळावड-कणकुंबीदरम्यान वाघाची वेस नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी वाघांचे अधूनमधून दर्शन होत असते.

 मागील आठवडय़ात तळावडे गावच्या विद्यार्थ्यांना वाघाचे दर्शन झाले होते. हुळंद गावच्या विद्यार्थ्यांना तर अस्वल, गवीरेडे, बिबटय़ा, डुक्कर, लांडगे असे अनेक प्राणी नित्याचेच झालेत. प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नाही. अखेर काळजावर दगड ठेऊन पालकवर्ग आपल्या पाल्यांना शाळेला पाठवतात. आपल्याला कमीत कमी दहावीपर्यंत तरी शिक्षण घेता यावे, या आशेपोटी हे विद्यार्थी येत असतात. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे व झाडांच्या फांद्यांमुळे एखादा प्राणी अचानकपणे समोर आला तर विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडते. किमान रस्त्याच्या दुतर्फा असलेली झुडपे हटवून रस्ता मोकळा केल्यास विद्यार्थ्यांना आपले संरक्षण करता येईल.

तळावडे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

तळावडे गावातून जवळपास 25 ते 30 विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी कणकुंबीला जंगलमय रस्त्याने ये-जा करतात. गेल्या पंधरा-वीस दिवसात झालेले हाल यापूर्वी विद्यार्थ्यांनी कधीही उपभोगले नाहीत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने मुरुमऐवजी माती टाकून सर्वांची पंचाईत करून ठेवली आहे. हा रस्ता ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. यावषी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आमदार फंडातून 3 लाख रुपये खर्च करून मुरुम टाकण्याऐवजी कंत्राटदाराने केवळ लाल माती टाकून दुरुस्ती केली.

परंतु गेले पंधरा दिवस सततच्या पावसामुळे चिखल होऊन रस्त्यावरून विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून चालणे मुश्कील होऊन बसले. गुडघाभर चिखलातून चालण्यापेक्षा रस्त्याच्या कडेने किंवा जंगल बाजूने किंवा वेळप्रसंगी जंगलातून विद्यार्थ्यांनी पंधरा-वीस दिवस प्रवास केला. पूर्वीचा रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ तळावडे गावच्या विद्यार्थ्यांवर आली. विद्यार्थीवर्गातून रस्त्याच्या कंत्राटदाराचा तीव्र निषेध करण्यात आला. अशा प्रकारचे कंत्राट घेऊन नागरिकांची गैरसोय करू नये, अशा तीव्र प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. रस्त्यावर मातीऐवजी मुरुम टाकला असता तर विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती. परंतु केवळ माती टाकून विद्यार्थ्यांचे आणि प्रवासीवर्गाचे पंधरा-वीस दिवस हाल करण्यात आले.

मुलींच्या वसतिगृहाची मागणी

तळावडे, हुळंद व इतर गावांतील विद्यार्थ्यांना या ना त्या कारणाने नेहमी संकटाशी सामना करून माध्यमिक शिक्षण घ्यावे लागत आहे. विशेषतः या भागात सद्यस्थितीत मुलांच्यापेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. असे असताना गेल्या पाच-सहा वर्षांपासून कणकुंबी भागात मुलींसाठी वसतिगृह मंजूर करण्यात यावे, यासाठी अनेकवेळा अर्ज-विनंत्या करूनसुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. कणकुंबी भागात विद्यार्थिनींसाठी वसतिगृह झाले तर या भागातील दुर्गम गावांतील जवळपास 50 ते 60 विद्यार्थिनी वसतिगृहात राहून शिक्षण घेऊ शकतात. परंतु ‘आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था कणकुंबी भागातील शालेय विद्यार्थ्यांची झाली आहे. ना रस्ते, ना वाहतुकीची सोय, ना वसतिगृह अशा बिकट अवस्थेत विद्यार्थी अडकून पडले आहेत, असेच म्हणावे लागेल.

आम्हाला शिकण्यासाठी सोयीसुविधा कोण मिळवून देणार?

 तळावडे ते कणकुंबी हे एकूण 16 कि. मी. अंतर दररोज चालत यावे लागते. सकाळी 7.30 वाजता घर सोडतो. दिड-दोन तास सलग चालल्यावर थकवा येतो. परंतु शाळेच्या आवारात आल्यानंतर थकवा आला म्हणून निवांत बसता येत नाही. जंगली प्राण्यांच्या तावडीतून कधी एकदा शाळेत येतो आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर कधी एकदा घरी पोहोचतो, असे होते. जंगल भागातून ये-जा करताना जीवात जीव नसतो. यासाठी सरकारने मुलींसाठी वसतिगृहाची सोय केली तर कणकुंबीला राहून शिक्षण घेता आले असते. मात्र, आम्हाला खूप शिकायची इच्छा आहे, पण यासाठी सोयीसुविधा कोण मिळवून देणार कोण जाणे? 

नूतन निंगाप्पा सलाम (तळावडे)

…तर मात्र केवळ सरकारच जबाबदार असेल!

 कणकुंबी भागातील सर्वात दुर्लक्षित हुळंद गाव आहे, असे म्हटले तर त्यात गैर नाही. कारण आमच्या गावातील लोक आजही मूलभूत गरजा आणि सुविधांपासून वंचित आहेत. गावाला अद्यापही पक्का रस्ता नाही. पावसाळय़ात महिनाभर वीज नसते. गावात सातवीपर्यंत शाळा आहे, पण शिक्षक नाहीत. पूर्वी आमच्या गावातील जवळपास दहा-पंधरा मुले कणकुंबीला हायस्कूलमध्ये शिकत होती. परंतु दिवसेंदिवस जंगली प्राण्यांच्या उपद्रवांमुळे किंवा माणसावरील हल्ल्यांमुळे पाहुण्यांच्या गावी राहून किमान माध्यमिक शिक्षण घेत आहेत. आजमितीस आम्ही केवळ चार-पाच मुलीच दररोज जीवाची पर्वा न करता माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कणकुंबीला येत आहोत. अशा वेळी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात आमचे बरे-वाईट झाले तर मात्र या घटनेला केवळ सरकारच जबाबदार असेल.                                             

कु. सारिका बाबू गावडे ( हुळंद )

Related Stories

राजर्षी शाहू महाराज जयंती निलजी येथे साजरी

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांबा बनला पार्किंगतळ

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक येथे घुमला शिवरायांचा जयजयकार

Amit Kulkarni

बाहेर फिरणाऱयांवर हवाई डोळय़ाची नजर

Rohan_P

सिद्धेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

Omkar B

शेतकऱयांचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!