तरुण भारत

मडगावच्या हॉटेल दामोदर रेसिडेन्सीला आग

सोमवारी मध्यरात्रीनंतरची दुर्घटना : रेडिमेड गार्मेन्टस्ची सहा दुकाने खाक,पोलिसांचा तत्परतेमुळे लहान मुलांचा जीव वाचला

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

मडगावच्या आनाफोंत गार्डनजवळ असलेल्या हॉटेल दामोदर रेसिडेन्सीला सोमवारी रात्री 1.40च्या दरम्यान आग लागण्याची घटना घडली. या आगीत सहा रेडिमेड गार्मेन्टस्ची दुकाने तसेच एक ख्रिसमस सजावटीचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे 2.50 कोटीं रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मडगाव पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हॉटेलमध्ये अडकलेल्या पर्यटकांची व खास करून लहान मुलांची वेळीच सुटका केल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ती लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री 1.40 च्या दरम्यान ही आग लागली. त्यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत थोडासा विलंब झाला. तोपर्यंत हॉटेल दामोदर रेसिन्डेन्सीच्या तळमजल्यावर असलेली रेडिमेड गार्मेन्टस्ची सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या दुकानात ख्रिसमस सणाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले व संपूर्ण सामानाची अक्षरशः राख झाली.

क्षणात झाले सारे काही जळून खाक

आगीत जळून खाक झालेल्या रेडिमेड गार्मेन्टस दुकानापैकी एकाच व्यक्तीची चार दुकाने तर अन्य दोघांची दोन दुकाने होती. त्यात एक दुकान महिलांसाठीच्या कपडय़ाचे होते. ही सर्व दुकाने तळमजल्यावर होती तर पहिल्या मजल्यावर ख्रिसमस सजावटीचे दुकान हल्लीच थाटण्यात आले होते. सर्व दुकाने अवघ्या काही वेळेत जळून राख होत असल्याचे दृष्य दुकानमालकांना पहावे लागले.

अग्निशामक दलाने वाचविली दोन कोटीची मालमत्ता

मडगाव अग्निशामक दलाने घटनास्थळी भेट देत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. पण, आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग वेळीच नियंत्रणात येऊ शकली नाही. आगीचे रौद्र रूप पाहून वेर्णा व कुडचडेहून अतिरिक्त पाण्याचे बंब मागविण्यात आले. रात्री 1.40 वा. लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी दलाला सकाळचे 6 वाजले. दलाने सुमारे दोन कोटी रूपयांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविली.

पर्यटकांचे जीव सापडले धोक्यात

आगीच्या ज्वाळा हॉटेल दामोदर रेसिडेन्सीच्या दुसऱया, तिसऱया व चौथ्या मजल्यापर्यंत पोचल्याने हॉटेलच्या खोल्यांत झोपलेल्या पर्यटकांचा जीव धोक्यात आला होता. गाड झोपेत असलेल्या पर्यटकांना जेव्हा आगीची धग जाणवू लागली व खोल्यांमध्ये जेव्हा धूर भरला आणि पर्यटक गुदमरू लागले, तेव्हा त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्याच वेळी हॉटेलचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. त्यात रात्रीची वेळ नेमक्या कुठल्या मार्गाने बाहेर पडायचे हे कळणे देखील पर्यटकांना कठीण झाले होते.

सर्वांना सुरक्षितरित्या वाचविण्यात यश

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हॉटेलात प्रवेश करून खोल्यांनी अडकून पडलेल्या पर्यटकांची सुटका करण्याचे काम हाती घेतले. रात्रीच्या अंधारात मोबाईल फोनची लाईट व अन्य साधनांचा उपयोग करून पोलिसांनी सर्वात अगोदर लहान मुलांची सुटका करण्यावर भर दिला. त्यानंतर सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सोमवारी हॉटेल दामोदर रेसिडेन्सीचे 60 टक्के बुकिंग झाले होते व बहुतेक सर्व खोल्यांनी लोक झोपले होते. यात शहरातील एका प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टराच्या कुंटुंबातील सदस्याचा विवाह सोहळा होता. त्यासाठी त्याचे नातेवाईक आले होते. त्यांचाही मुक्काम याच हॉटेलात होता.

Related Stories

बुधवारी 136 कोरोनाबधित

Patil_p

गोव्याला आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही

Amit Kulkarni

‘मुजरा संगीत रंगभूमीला’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

सांगेतील राजकीय समीकरणांत वेगाने बदल

Omkar B

मिकी पाशेको पुढील आठवडय़ात काँग्रेसमध्ये

Patil_p

पहिल्या सोनार डोमची मुख्यमंत्र्याहस्ते उद्घाटन

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!